Ram Navami 2023: मारिचचा वध श्रीरामांच्या हातूनच घडावा यामागे नियतीचे कोणते प्रयोजन होते? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 07:00 AM2023-03-24T07:00:00+5:302023-03-24T07:00:02+5:30
Ram Navami 2023: श्रीरामांनी राष्ट्रकार्याचे ब्रीद घेतले होते, धर्म संस्कृतीच्या आड येणाऱ्यांचा वध हा श्रीरामाचा पवित्रच होतो, म्हणून तर...
>>डॉ. भूषण फडके
चारही राजकुमार आता रांगायला लागले. राजा दशरथ आणि तिन्ही राण्या त्यांच्या बाललीलांमध्ये दंग रंगून जात. रामाचे आणि राजकुमारांचे बालपण संपूच नये असे दशरथाला वाटत होते पण आता राजकुमार सहा वर्षांचे झाले. त्या काळच्या शिरस्त्याप्रमाणे राम आणि भावंडे गुरुग्रही शिक्षणासाठी गेली. महर्षी वशिष्ठांनी त्यांना शस्त्र विद्या, राज्यशास्त्राचे शिक्षण दिले. सर्व राजकुमार शस्त्रविद्येत पारंगत झालेत पण त्यांना धनुर्विद्या जास्त प्रिय होती. गुरुगृहातील शिक्षण पूर्ण करून प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येला आले.
एक दिवस राजसभेमध्ये राजा दशरथ, गुरु वशिष्ठ आणि मंत्रीगण आपापल्या स्थानावर विराजमान होते. तेवढ्यात द्वारपालाने ‘महर्षी विश्वामित्र’ आल्याची वर्दी दिली. दशरथ राजा अतिशय विनयाने आणि नम्रतेने विश्वामित्र ऋषींना राज्यसभेत येण्याचे प्रयोजन विचारतात आणि राजा, आपली मनोकामना मी पूर्ण असे वाचन देतात.
तेव्हा विश्वामित्र ऋषी सांगतात, हे राजा माझ्या यज्ञकर्मात मारीच आणि सुबाहु हे राक्षस विघ्ने आणीत आहेत. तू तुझा ‘श्रीराम’ नावाच्या जेष्ठ पुत्राला माझ्या सहाय्यार्थ पाठव. राजा दशरथ विश्वामित्रांना म्हणाले, "महर्षी, माझा राम अजून लहान आहे. तो शस्त्रविद्या शिकला तरी कोणत्याही युद्धापासून तो अनभिज्ञ आहे. तो केवळ १५ वर्षांचा आहे." राजा दशरथाचे बोलणे ऐकताच विश्वामित्र संतापून राजाला त्याच्या वचनाची आठवण करून देतात. दशरथाचे गुरु वशिष्ठ राजाला विश्वामित्रांच्या समवेत पाठवण्याचा सल्ला देतात.
खरं तर, पूर्वाश्रमी महर्षी विश्वामित्र आणि महर्षी वशिष्ठांचे आपापसात वैर होते. पण राक्षसांचा त्रास ही 'राष्ट्रीय आपत्ती'. त्याविरुद्ध लढण्यास दोन ऋषी एक झाले. विश्वामित्र शस्त्रविद्येत ते पारंगत होते. त्यांनी मनात आणले असते तर मारिच सुबाहूला ते सहजच दग्ध करू शकत होते, पण भविष्यात श्रीरामांना जो पराक्रम करावयाचा होता, त्याची रंगीत तालीम विश्वामित्रांना रामाकडून करून घ्यायची होती हे वशिष्ठ जाणून होते. योग्य वेळेस योग्य जबाबदारी देणे आणि योग्य मार्गदर्शनात ती पूर्ण करून घेणे आवश्यक आहे हेच वशिष्ठांना दशरथास सांगायचे आहे म्हणूनच ते रामाला विश्वमित्रांसमवेत पाठविण्यास सांगतात.लक्ष्मणही श्रीरामांसमवेत जातो.
विश्वामित्रांच्या सिद्धाश्रमाला जात असतांना मार्गात त्राटिकावनातून जातो. मार्गात त्राटिका राक्षशिण राम-लक्ष्मणावर आक्रमण करते. स्त्री म्हणून या राक्षशिणीस कसे मारावे? असा प्रश्न श्रीरामास पडतो पण ही राक्षशिण नीतिभ्रष्ट आहे. एखाद्या चांगल्या कामात संकटे येतातच त्राटका असेच संकट आहे. असे संकट समूळ नष्ट केल्याशिवाय ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही. राष्ट्ररक्षण हे श्रीरामाचे ध्येय आहे. त्या ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर करणे क्रमप्राप्त आहे म्हणून विश्वामित्र रामास त्राटिकारुपी संकटाला दूर करण्याचा म्हणजेच तिचा वध करण्याची आज्ञा देतात. श्रीराम त्राटीकेचा वध करतात. विश्वामित्रांसह राम-लक्ष्मण सिद्धाश्रमात येतात आणि यज्ञरक्षणास सिद्ध होतात. यज्ञात विध्वंस करणाऱ्या सुबाहूचा आग्नेयस्त्राने श्रीराम वध करतात तर मानवास्त्राने मारीचाला समुद्रात बुडवतात.
मारिच सुबाहूच्या नाशानंतर विश्वामित्र श्रीरामांस मिथीलानरेश जनकाच्या दरबारात असणाऱ्या शिवधनुष्य आणि जानकीच्या विवाहाच्या पणाबद्दल माहिती देतात आणि ते शिवधनुष्य पाहण्यास मिथिलेस चलावे अशी विनंती करतात.
भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८
Email-bmphadke@gmail.com