Ram Navami 2024: उत्तम राजकारणी असूनही योग्य वयात पदत्याग करण्याचे औदार्य दशरथाकडे होते; वाचा रामकथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 04:37 PM2024-04-13T16:37:11+5:302024-04-13T16:37:40+5:30
Ram Navami 2024: अयोध्येचा राज्यकारभार उत्तम रित्या चालवण्याचे सामर्थ्य दशरथाकडे होते, तरी त्याने वयोमर्यादा लक्षात घेऊन केलेला त्याग महत्त्वपूर्ण ठरतो, कसा ते पहा!
>>डॉ. भूषण फडके
भरत आणि शत्रृघ्नचे केकय देशात म्हणजे भरताच्या आजोळी उत्तम स्वागत झाले. भरत-शतृघ्न केकयदेशात आनंदात होते पण त्यांना अयोध्येची, आपल्या माता-पित्यांची आणि बंधू श्रीराम-लक्ष्मणांची सदोदित आठवण होत असे.
दशरथ राजा आता वृद्धापकाळाकडे झुकत होते. सर्वगुणसंपन्न श्रीरामाला राज्याभिषेक करावा असे दशरथाला वाटले. त्यांनी हा विचार वशिष्ठ, मंत्रिगण आणि प्रजेला सांगितला. सर्वांना अतिशय आनंद झाला.
आपण वृद्ध झालो आहोत, आता राज्यपद त्यागून योग्य पुत्राला राज्याभिषेक करण्याचा राजा दशरथाचा निर्णय प्रजेला फार आवडतो. खरे तर सत्तेचा मोह अनेकांना सोडवत नाही. पण, राजा दशरथ त्यातले नव्हते. योग्य वेळ येताच योग्य उत्तराधिकारी निवडून आपण निवृत्त होणे अशी त्यागी वृत्ती प्रजाजनांचा आवडली होती आणि त्याचेच गुणगान प्रजा गात होती.
रामाला युवराजपदाचा अभिषेक होणार ही बातमी मंथरा या कैकयीच्या दासीला कळते. रामाला होणारा युवराजपदाचा अभिषेक कैकयीसाठी घातक आहे, असे मंथरा सांगण्याचा प्रयत्न करते. पण कैकयीचे रामावर पुत्रवत प्रेम असते. म्हणून ती मंथरेचे म्हणने नाकारते. मंथरा ही अतिशय कपटी आणि बुद्धीभेद करण्यात वाकबगार असते. ती कैकयीस म्हणते, “राम राजा झाल्यावर कौसल्या राजमाता होईल आणि तुला तिचे दास्यत्व पत्करावे लागेल.” पुढे ती म्हणते, “तू दशरथ महाराजांची आवडती राणी असूनदेखील तुला ही बातमी न सांगण्यात त्यांच्या मनात कपट आहे.” ही मात्रा बरोबर लागू पडते. कैकयी मंथरेच्या कह्यात जाते.
राजा दशरथ कैकयीला रामाच्या युवराजपदाच्या अभिषेकपदाची बातमी देण्यास येतात तेव्हा ती क्रोधागारात असते आणि राजाला वचनात अडकवून दोन वर मागते. एका वराने भरतास राज्य आणि दुसऱ्या वराने रामास चौदा वर्ष वनवास! आपल्या आजूबाजूला मंथरेसारखे बुद्धीभेद करणारे असतात, पण त्यांच्या कह्यात जाणे आपण टाळावयास हवे. श्रीरामांना ही हकीकत कळताच पितृवचन पूर्ण करण्यासाठी ते वनात जाण्याचा निश्चय करतात. ही बातमी माता कौसल्येस कळताच ती दु:खी होते. माझ्या दैवात वनवास आहे, असे राम म्हणतात. हे ऐकताच लक्ष्मण संतापतो आणि दैवापेक्षा पुरुषार्थ श्रेष्ठ आहे असे विचार मांडतो. श्रीराम लक्ष्मणाची समजूत घालतात पण लक्ष्मणासह सीताही रामांसोबत वनवासात जाण्याचा निश्चय करते.
वनवासात जाण्यासाठी श्रीराम आणि लक्ष्मण वल्कले धारण करतात, हे पाहिल्यावर राजा दशरथाला मूर्च्छा येते. सुमित्रा लक्ष्मणाला राम सीतेची काळजी घेण्याचा उपदेश करते. मंत्री सुमंत रथ सिद्ध करतो आणि हे पाहताच दशरथ राजा जमिनीवर कोसळतो. श्रीरामांची आणि निषादराजगुहांची श्रुंगवेरपूर येथे भेट होते. निषादराजाच्या नावेतून गंगा पार करून श्रीराम भारद्वाज ऋषींच्या आश्रमात येतात. भारद्वाज ऋषींच्या सल्ल्यानुसार श्रीराम चित्रकूट पर्वतावर आहेत ही बातमी निषादराज कडून सुमंतास कळल्यावर सुमंत जड अंत:करणाने अयोध्येत परत जायला निघतात.
|| बोला सियावर रामचंद्र की जय ||
भ्रमणध्वनी : ९४२२४०९२९८
Email-bmphadke@gmail.com