Ram Navami 2024: शीघ्र रामकृपेसाठी रामनवमीच्या मुहूर्तावर दिलेल्या दहापैकी कोणताही एक मंत्र सुरू करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:29 AM2024-04-15T11:29:26+5:302024-04-15T11:30:23+5:30
Ram Navami 2024: यंदा १७ एप्रिल रोजी राम नवमी आहे, त्या मुहूर्तावर राम नाम सुरू करायचे की आतापसून प्रत्येक क्षण रामनामात घालवायचा ते तुम्हीच ठरवा!
आपल्या आयुष्यात राम उरलेला नाही, अर्थात आयुष्याला अर्थ उरलेला नाही, काही ध्येय राहिले नाही, जगण्याची आशा राहिली नाही, अशा वेळेस चैतन्यमूर्ती राम नामाचे ध्यान करा आणि राम मंत्राचे पठण करा. ज्या राम नामाने हलाहल प्राशन केलेल्या महादेवाच्या अंगाचा दाह शांत केला, ते रामनाम आपल्या मनालाही निश्चित शांती देईल. म्हणून अत्यंत श्रद्धेने, मन लावून, ध्यान लावून राम नाम घ्या. रामरक्षा हा प्रभावी मंत्र पाठ असेल तर उत्तमच आहे. परंतु रामरक्षा पाठ नसेल, तर ती श्रवण करा. त्या बरोबरीने पुढील १० मंत्रांपैकी एका रामनामाचा जप अवश्य करा.
१. राम हा शब्दच मुळात एक मंत्र आहे. केवळ राम नामाची मात्रा घेतली, तरी इतर पथ्य आपोआप पाळली जातील.
२. 'रां रामाय नम:' हा मंत्र पद, प्रतिष्ठा, लक्ष्मी, पुत्र, आरोग्य प्रदान करेल.
३. 'ॐ रामचंद्राय नम:' हा मंत्र घरातील क्लेश दूर करेल.
४. 'ॐ रामभद्राय नम:' आपल्या कार्यात येणारी विघ्ने दूर करेल.
५. 'ॐ जानकी वल्लभाय स्वाहा' हा मंत्र इप्सित मनोकामना पूर्ण करेल.
६. 'ॐ नमो भगवते रामचंद्राय' हा मंत्र संकटातून मार्ग दाखवेल.
७. 'श्रीराम जय राम, जय-जय राम' हा त्रयोदक्षरी मंत्र आध्यात्म मार्गातील बैठक दृढ करेल.
८. 'ॐ दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमहि तन्नो राम: प्रचोदयात्।' हा श्रीराम गायत्री मंत्र सिद्धी देणारा आहे.
९. 'ॐ हं हनुमते श्री रामचंद्राय नम:।' हा मंत्र भक्त आणि भगवंत दोहोंची कृपादृष्टी मिळवून देणारा ठरेल.
१०. 'ॐ रामाय धनुष्पाणये स्वाहा:' हा मंत्र हितशत्रूवर मात करण्यास सहाय्यक ठरेल.