जयंती विशेष: महाकालीचे थोर उपासक, स्वामी विवेकानंदांना घडवणारे महागुरु रामकृष्ण परमहंस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:42 IST2025-02-28T12:42:19+5:302025-02-28T12:42:44+5:30
Ramkrishna Paramhans Jayanti 2025: शिवभावाने जीवांची सेवा करावी, असे सांगणारे थोर महाकाली उपासक आणि स्वामी विवेकानंदांना घडवणारी दिव्य विभूती म्हणजेच रामकृष्ण परमहंस. जयंतीनिमित्त काही विशेष गोष्टी जाणून घ्या...

जयंती विशेष: महाकालीचे थोर उपासक, स्वामी विवेकानंदांना घडवणारे महागुरु रामकृष्ण परमहंस
Ramkrishna Paramhans Jayanti 2025: एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगविख्यात सत्पुरुष म्हणजे रामकृष्ण परमहंस. फाल्गुन शुद्ध द्वितीयेला रामकृष्ण परमहंस यांचा जन्म झाला. यंदा ०१ मार्च २०२५ रोजी रामकृष्ण परमहंस यांची जयंती आहे. महाकालीचे थोर उपासक, स्वामी विवेकानंदांना घडवणाऱ्या या अद्भूत विभूतीच्या दिव्य चरित्राचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया...
रामकृष्ण परमहंसांचे मूळ नाव गदाधर चट्टोपाध्याय असे आहे. भारतातील एक संत, आध्यात्मिक गुरू, विचारवंत, तत्त्वज्ञ आणि स्वामी विवेकानंदांचे गुरू अशी त्यांची ओळख आहे. प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रामाणिक निष्ठा असेल, तर ईश्वराचे दर्शन आपल्याला घडू शकते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले, त्यानंतर शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली आराधना सुरू केली. रामकृष्ण परमहंस लहानपणापासूनच काली मातेचे निस्सिम भक्त होते. दिवस-रात्र ते काली मातेच्या पूजनात लीन असत. काली मातेचे दर्शन व्हावे, यासाठी वयाच्या १७ व्या वर्षी कुटुंबाचा त्याग करून आपले सर्वस्व काली मातेच्या चरणी अर्पण केले.
रामकृष्ण ‘परमहंस’ पदाला प्राप्त झाले
रामकृष्ण यांच्या परमहंस या उपाधीबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जातात. वास्तविक पाहता जे आपल्या इंद्रियांवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवतात. ज्या व्यक्तीकडे ज्ञानाचे असीम भांडार आहे, त्यांना ही उपाधी दिली जाते, अशी मान्यता आहे. रामकृष्णांकडे दोन्ही गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांना परमहंस ही उपाधी देण्यात आली. गुरु तोतापुरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गदाधर म्हणजेच रामकृष्ण ‘परमहंस’ पदाला प्राप्त झाले.
चिंतनातून ईश्वर तत्त्व एकच असल्याची अनुभूती
रामकृष्णांनी शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली मातेची आराधना सुरू केली. चिंतनातून त्यांना ईश्वर तत्त्व एकच असल्याची अनुभूती मिळाली. माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक – हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न-भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म. तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते, कोणी वॉटर तर कोणी जल. एक-एका धर्माचे एक-एक मत असते, एक-एक पथ असतो - परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी; जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते!, असे ते म्हणत.
शिवभावाने जीवांची सेवा करावी
रामकृष्णांचा उपदेश अधिकारानुसार असे. मोहात मर्यादेबाहेर गुंतू नये, आपली किमान कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावीत, ईश्वरदर्शन हे जीवनाचे ध्येय मानावे व त्यासाठी पतिपत्नींनी मिळून प्रयत्न करावा, असा उपदेश ते प्रापंचिकांना करीत. सर्वथा त्याग, संन्यासव्रताचा स्वीकार व आध्यात्मिक जीवनाचा आदर्श हा उपदेश त्यांनी अगदी निवडक करूण शिष्यांना केला. कलियुगात सत्यपालन हीच तपश्चर्या, माया टाळावी पण दया टाकू नये, शिवभावाने जीवांची सेवा करावी, निर्विकल्प समाधीपेक्षा सारे विश्व हे परमेश्वराचे रूप हा अनुभाव श्रेष्ठ होय, ज्ञान वा भक्ती किंवा साकार वा निराकार यांतील आपल्याला रुचेल व पचेल ते घ्यावे, अशी त्यांची काही प्रमुख विचारसूत्रे आहेत.
रामकृष्णांना झाले कालीमातेचे दर्शन
मला भातभाकरीची विद्या नको, ईश्वरदर्शन होईल अशी विद्या हवी, अशी रामकृष्णांची इच्छा होती. तरुण वयात दक्षिणेश्वर येथे राहून त्यांनी कालीमातेची उपासना केली. १८४३ साली पितृनिधनानंतर परिवाराचा भार त्यांचे थोरले भाऊ रामकुमार यांनी स्वीकारला. या घटनेचा रामकृष्णांच्या मनावर खोल परिणाम झाला. १८५५ साली राणी रासमणी यांनी दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना केली. रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी बनले. १८५६ साली रामकुमारांच्या मृत्यूनंतर रामकृष्णांनी त्यांची जागा घेतली. रामकुमारांच्या मृत्यूनंतर रामकृष्णांची भावतन्मयता आणखी वाढली. कालीस ते आई व विश्वजननी भावाने पाहू लागले. या काळात ते देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी व्याकूळ झाले. रामकृष्ण परमहंस यांची ईश्वरभक्ती उत्कट होत चालली होती. मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली ते रात्री जात आणि ध्यानधारणा करीत. रात्र व दिवस यांचे भान हरपत असे. आई, दर्शन दे, असा आक्रोश ते करत असत. अशा वेळी तहानभुकेची वा अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध त्यांना राहत नसे. अखेर एके दिवशी आवेगाच्या भरात गाभाऱ्यातील कालीमातेचे खड्ग घेतले व ते मानेवर चालवणार, एवढ्यात जगन्मातेचे दर्शन त्यांना झाले. यानंतरचे त्यांचे सारे दैनंदिन जीवन ईश्वरानुभवाच्या प्रकाशात उजळून निघाले.
गुरुदेव मला तुम्ही देव दाखवा नाहीतर मी तुमचे पाय सोडणारच नाही!
रामकृष्ण परमहंस यांचा सर्वांत लाडका विद्यार्थी म्हणजे स्वामी विवेकानंद अर्थात बालपणीचा नरेंद्र! नरेंद्रवर त्यांचा अपार जीव होता. परंतु नरेंद्र हा विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ बुद्धिमत्तेचा असल्यामुळे चमत्कारांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. त्याने गुरुदेवांना सांगितले, 'मला देव पाहायचा आहे!' रामकृष्ण फक्त हसून विषय टाळत असत. एकदा नरेंद्र त्यांच्या पायाशी लोळण घेत म्हणाला, 'गुरुदेव आज मला तुम्ही देव दाखवा नाहीतर मी तुमचे पाय सोडणारच नाही!' त्याचा हट्ट पाहून रामकृष्णांनी दिव्य अनुभूति देण्याचे ठरवले. रामकृष्णांचा स्पर्श होताच क्षणात त्याची समाधी लागली. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कितीतरी वेळ तो समाधी अवस्थेत होता. विश्वशक्तीची प्रचिती आल्यावर नरेंद्र समाधीतून बाहेर आला.
नरेंद्रचा झाला स्वामी विवेकानंद
नरेंद्र ते स्वामी विवेकानंद हा प्रवास केवळ आणि केवळ रामकृष्ण परमहंस यांच्या कृपेमुळेच शक्य झाला. रामकृष्णांनी विवेकानंदांना जगाला ज्ञानाची दीक्षा देण्यास पात्र बनवले. स्वामी विवेकानंद यांनी हिंदू संस्कृतीचा डंका परदेशात वाजवला. जगभर रामकृष्ण मिशनची स्थापना करून देवाची आणि देव तत्त्वाची लोकांना प्रचिती दिली. रामकृष्ण मिशन या संस्थेच्या देश-विदेशांतील शंभरावरील शाखांच्या द्वारा रामकृष्णांचा आध्यात्मिक संदेश जगात सर्वदूर पसरलेला आहे. रामकृष्ण अखेरचे सात-आठ महिने घशाच्या कर्करोगाने आजारी होते. कलकत्त्यामधील काशीपूरच्या उद्यानगृहात त्यांनी महासमाधी घेतली.