Ramayan: वनवासात चौदा वर्षं न झोपलेल्या लक्ष्मणाची झोप कोणाला मिळाली? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 03:53 PM2024-07-06T15:53:46+5:302024-07-06T15:54:08+5:30
Ramayan: झोप यावी म्हणून आपण निद्रा देवीला आपण शरण जातो, पण लक्ष्मणाच्या बाबतीत घडलं उलटंच; सविस्तर वाचा!
पुराणात अनेक देवी-देवतांचे वर्णन आढळते, त्यापैकी निद्रा देवी देखील एक आहे. नावावरूनच कळते की निद्रा देवी ही झोपेचा आशीर्वाद देणारी देवी आहे. मात्र तिच्या आशीर्वादाने लक्ष्मण १४ वर्षं का झोपू शकला नाही ते जाणून घेऊ!
झोप हा आपल्या दिनचर्येचा एक आवश्यक भाग आहे. चांगल्या झोपेशिवाय चांगल्या आरोग्याची कल्पना करता येत नाही. कोणतीही व्यक्ती जास्त वेळ जागु शकत नाही आणि झोपल्याशिवाय राहू शकत नाही. परंतु रामायणात लक्ष्मणाला १४ वर्षं झोप आली नाही, नव्हे तर त्याने तसा वर मागून घेतला होता आणि त्याची पूर्तताही झाली, कशी? त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी निद्रा देवीचा उगम कसा झाला आणि तिला हे कार्य कसे मिळाले ते पाहू.
निद्रा देवीची उत्पत्ती कथा:
निद्रा देवीच्या उत्पत्तीची कथा मार्कंडेय पुराणात आढळते. त्यात म्हटले आहे, की निद्रा देवीची उत्पत्ती विश्वाच्या निर्मितीपूर्वीच झाली होती. जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये होते आणि सर्वत्र पाणी होते, तेव्हा भगवान विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. याच काळात भगवान विष्णूच्या कानातल्या मळापासून मधु आणि कैटभ नावाच्या दोन राक्षसांचा जन्म झाला, जे ब्रह्मदेवाला खाण्यासाठी धावले.
तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली, परंतु भगवान विष्णू योगनिद्रामध्ये होते. तेव्हा ब्रह्मदेवांनी योगमायेची प्रार्थना केली, त्यामुळे विष्णूंच्या डोळ्यातून निद्रा दूर झाली. यामुळे भगवान विष्णू झोपेतून जागे झाले आणि त्यांनी राक्षसांचा वध करून ब्रह्मदेवाचे प्राण वाचवले. ब्रह्मदेवाच्या मदतीला धावून आलेली ही योगमाया निद्रा देवी म्हणून ओळखली जाऊ लागली.
निद्रा देवी झोपेचे वरदान देते, पण लक्ष्मणाला...
झोप लागावी म्हणून आपण निद्रा देवीची प्रार्थना करतो, पण झोप लागू नये म्हणून लक्ष्मणाने निद्रा देवीची प्रार्थना केली. श्रीरामांबरोबर वनवासात जाताना पहारेकरी म्हणून भूमिका बजवायची हे ठरवूनच तो निघाला होता. कोणतेही संकट वेळ काळ पाहून येत नाही. आपल्या उपस्थितीत श्रीराम आणि सीता माई यांना विश्रान्ति घेता यावी म्हणून त्याने थोडी थोडकी नाही तर १४ वर्ष वनवासात झोप लागणार नाही, हे वरदान मागून घेतले होते.
लक्ष्मणाची चौदा वर्षांची झोप कोणाला मिळाली? तर...
लक्ष्मणाने झोप नाकारली पण त्याच्या वाटणीची झोप कोणाला द्यायची हा विचार करत असताना लक्ष्मणाने देवीला विनंती केली, की माझ्या विरहात माझ्या पत्नीचा निद्रानाश होऊ नये म्हणून माझ्या वाटणीची झोप माझ्या पत्नीला म्हणजेच उर्मिलेला द्या. देवीने तथास्तु म्हटले. आणि तिचा आशीर्वाद फळला. वनवासाच्या पूर्ण प्रवासात लक्ष्मण क्षणभरही झोपला नाही.
निद्रादेवीचा श्लोक :
जर तुम्हाला निद्रानाश झाला असेल किंवा झोपमोड झाली असेल, तर देवीला शरण जाऊन प्रार्थना करायची आणि पुढील मंत्र रोज झोपताना म्हणायचा.
निद्रा देवीचा मंत्र -
अगस्तिर्माघवशचैव मुचुकुन्दे महाबलः
कपिलो मुनिरास्तीक: पंचैते सुखशाायिनः
वाराणस्यां दक्षिणे तु कुक्कुटो नाम वै द्विजः
तस्य स्मरणमात्रेण दु:स्वपन: सुखदो भवेत्