Ramayana: मॉरिशसला ओळख मिळाली ती रामायणातील मारीच राक्षसावरून; वाचा अन्वयार्थ!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:05 AM2024-02-26T11:05:36+5:302024-02-26T11:05:55+5:30
Ramayana: रामायणातील मारीचाचं मॉरिशस 'कनेक्शन'?; थेट गूगल अर्थच्या आधारे मांडलं लॉजिक जाणून घेऊ.
रामायण महाभारत हे दोन असे महान ग्रंथ आहेत, की हजारो वर्षांनंतरही त्यावर अभ्यासकांचा सातत्याने अभ्यास सुरु आहे. त्यातून दर दिवशी नवनवीन माहिती ऐकायला वाचायला मिळते. अशातच अलीकडे एक व्हिडीओ पाहण्यात आला, त्यात तत्परा अहोरात्रा नामक युवतीने एक युक्तिवाद मांडला आहे. त्यानुसार आजचा नामांकित व तारांकित देश मॉरिशस हा रामायणातील मारीच राक्षसाच्या नावावरून ओळखला जातो असा दावा तिने केला आहे. यासाठी तिने भौगोलिक माहितीचा आधार घेतला आहे, तो कसा ते पहा!
वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम, सीता माई आणि लक्ष्मण दंडकारण्यातून जात असताना नाशिकमधील पंचवटी येथे मुक्कामी होते. त्यावेळेस सीतेला एक सुवर्णमृग दिसले. ते सोन्याचे हरीण आपल्या जवळ असावे, आपण त्याचा सांभाळ करावा असे तिला वाटले म्हणून तिने रामाला त्याला पकडून आणण्यास सांगितले. सुवर्ण मृग हा प्रकारच मुळात अस्तित्वात नसतो, हे माहीत असूनही सीतेचे मन राखण्यासाठी राम जाऊ लागले असता, लक्ष्मणाने त्यांना सावध करत म्हटले, 'हा नक्कीच कोणी राक्षस असावा. त्याचा पाठलाग करत फार दूर जाऊ नका.'
हे ऐकून राम म्हणाले, 'हो मी लक्षात ठेवतो तू सीतेची काळजी घे मी आलोच!' असे म्हणून राम त्याला पकडण्यास निघाले. ते हरीण म्हणजे प्रत्यक्षात रावणाचा दूत मारीच राक्षस होता. तो रामाची ख्याती ओळखून होता. रावणाच्या जाचाला कंटाळून त्याने रामाच्या हाती मरण पत्करावे या हेतूने हे सोंग धारण केले. तो रामाला आपल्या पाठोपाठ दूर घेऊन गेला आणि तिथून लक्ष्मण आणि सीतेला आवाज देऊ लागला. ती हाक ऐकलल्यावर रामाची खात्री पटली की हा प्रत्यक्षात कोणी राक्षस आहे. त्याला ठार मारण्यासाठी रामाने धनुष्यावर बाण चढवला आणि क्षणार्धात मारीच घायाळ होऊन रामांच्या चरणाशी आला. त्याने रामाकडे मुक्ती मागितली. त्याने प्राण सोडले.
त्याच वेळेस सीतेच्या सांगण्यावरून लक्ष्मण रामाचा शोध घेत तिथे पोहोचला. मारिचला यमलोकी पाठवण्यासाठी रामाने मारीचचा उचललेला देह दूरवर फेकताना, सीता एकटी आणि संकटात असेल या काळजीने दक्षिण दिशेला यमलोकी जाऊन पडण्याऐवजी अलीकडच्या देशात पडला. तो देह रामाच्या बाणाने पवित्र झाला आणि त्या मृत देहावरून त्या देशाला मारीच देश अर्थात आजचा मॉरिशस देश अशी ओळख मिळाली.
हे सर्व कथन करताना तत्परा अहोपात्रा यांनी गुगल अर्थची मदत घेतली व भौगोलिक दृष्ट्या नाशिक वरून फेकलेला मारीचचा मृतदेह मॉरिशसच्या दिशेने कसा जाऊन पडला, हे सांगितले आहे.
यात तथ्य किती आणि कसे याचा अभ्यास जाणकार करतीलच, परंतु अशा चर्चेमुळे धर्मग्रंथांचा अभ्यास होत राहतो आणि नव्या पिढीचे कुतूहल जागृत होते, ही जमेची बाजू!