Ramraksha Stotra: संस्कृतमध्ये रामरक्षा म्हणायला अडचण येतेय? आता म्हणा मराठीत रामरक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:03 AM2024-02-05T10:03:28+5:302024-02-05T10:03:43+5:30
Ramraksha Marathi Stotra: रामरक्षा हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींनी लिहिले आहे, त्याचा हा सुंदर भावानुवाद आवर्जून वाचावा आणि पाठ करावा!
श्री रामरक्षा हे स्तोत्र आहे आणि तोच मंत्रदेखील आहे. देवाधिदेव महादेव यांनी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन हे स्तोत्र सांगितले आणि बुधकौशिक ऋषींनी जाग येताच ते सांगितले तसे लिहून काढले. महादेवाकडून हे प्रासादिक शब्द आल्यामुळे या स्तोत्राला मंत्राचे रूप प्राप्त झाले. यात प्रभू श्रीरामाचे, त्याच्या कार्याचे आणि चरित्राचे सुंदर वर्णन केले आहे. अध्यात्मिक दृष्ट्या या स्तोत्राला सर्वांग सुरक्षेचे कवच म्हटले आहे. तर संस्कृत भाषेच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर अनुष्टुप छंदात रचलेले हे काव्य, रोज म्हटले तर भाषाशुद्धी होते, उच्चार स्पष्ट होतात आणि आत्मविश्वास वाढतो. मात्र अनेकांना हे स्तोत्र संस्कृतात असल्याने अवघड वाटते. अशा लोकांनाही या स्तोत्राचा रसस्वाद घेता यावा, म्हणून पुण्याच्या अनिता करंदीकर यांनी श्री रामरक्षा स्तोत्राचे मराठी रूपांतर केले आहे. कोरोना काळात त्यांनी आपल्या मुलीसाठी ही रचना केली होती, या शब्दातून श्रीराम चरित्र उलगडत असल्याने लोकांची या कवनाला पसंती मिळाली. आपण कोणी भाषांतरकार किंवा संस्कृत जाणकार नाही तर केवळ उपासक आहोत, असे अनिता ताई नम्रपणे नमूद करतात. म्हणूनच की काय, या काव्यातही ती आत्मीयता उतरली आहे. त्यामुळे हे स्तोत्र आता मराठीतही आपल्याला म्हणता येईल. स्तोत्र रचना पुढीलप्रमाणे आहे-
श्री रामरक्षा स्तोत्र!!
श्रीरामरक्षा हे स्तोत्र
ज्यात असती अनेक मंत्र
बुधकौशिकांनी रचिले
सीतारामास प्रार्थिले ।।१।।
अनुष्टुप छंदात गायिले
जे त्यांच्या हृदयीं स्फुरले
रक्षील राम आपुल्या भक्ता
स्त्रोताचे या पठण करता ।।२।।
राम आणि शक्ती सीता
या स्तोत्राची असे देवता
राम हृदयीचे द्वार उघडते
हनुमंताची किल्ली फिरविता ।।३।।
रामजपाचा ध्यास धरावा
प्रभूचरणांच्या प्राप्ती करिता
श्रीरामाचे ध्यान करावे
चित्ती त्याचे रूप धरावे।।४।।
अजानुबाहू जे सीतापती
धनुष्यबाण धरिले हाती
पद्मासनी बद्ध असती
पितांबर परिधान करती ।।५।।
नवकमलासम त्यांचे नयन
प्रसन्न सुंदर ज्यांचे वदन
वामांगी सीता प्रसन्न
न्याहाळती तिज रामलोचन ।।६।।
मेघवर्ण सतेज कांती
नाना भूषणे अंगी झळकती
जटा शोभती ज्याच्या शिरी
असा राम धरावा अंतरी ।।७।।
चरित्र सुदंर रघुनाथचे
शतकोटी श्लोकात गायिले
एकच अक्षर याचे धरिले
महापातक नाश पाविले ।।८।।
जानकी लक्ष्मणा सहित
नीलकमल वर्ण श्याम
तो जटा मुकुट मंडीत
भजावा राजीव नेत्र राम ।।९।।
खड्ग चाप बाण करी
निशाचरांचा नाश करी
अजन्मा जन्मास आला
जगद् रक्षणा धरेवरी ।।१०।।
रामरक्षा सूज्ञ पठती
पापे हरिती इच्छा पुरती
राघवाने शिर रक्षावे
कपाळ रक्षो दाशरथी ।।११।।
दृष्टी राखो कौसल्यात्मज
विश्वामित्रप्रियाने श्रुती
यज्ञराक्षका रक्षी नासिका
मुख रक्षी सौमित्र सखा ।।१२।।
सकल विद्यानिधी राम
रक्षा करी तो जिव्हा मम
भरत वंदी ज्याचे चरण
कंठाचे तो करील रक्षण ।।१३।।
दिव्य आयुधे ज्याच्या करी
खांद्यांचे मम रक्षण करी
शिवधनुष्य भंगले ज्याने
मम बाहू रक्षावे त्याने ।।१४।।
सीता पतीने कृपा करावी
रक्षावे मम कर हे दोन्ही
जिंकले जमदग्नींच्या सुता
माझे हृदय रक्षी आता ।।१५।।
खर असुराचा केला भंग
रक्षण करो मधले अंग
जांबुवंता दिला आसरा
नाभी माझी रक्षण करा ।।१६।।
सुग्रीवाचा असे ईश्वर
रक्षो माझी तो कंबर
श्रीराम प्रभु हनुमंताचे
रक्षण करोत मम जांघांचे ।।१७।।
रघुकुलात जो असे उत्तम
रक्षो मांड्या दोन्ही मम
राक्षसकुलसंहारकरा
विनवितो जोडून करा ।।१८।।
सेतू बांधला समुद्रावरी
मम गुडघ्यांचे रक्षण करी
दशमुखांतका हीच विनवणी
रक्षा मम पोटऱ्या दोन्ही ।।१९।।
बिभीषणासी वैभव दिले
रक्षण करी उभय पाऊले
सुखविसी तू सर्व जगाला
रक्षी मम या शरीरा सकला ।।२०।।
स्तोत्र प्रभावी हे रामासम
पुण्यात्मा जो करील पठण
लाभे आयु सुख सपुत
विजय आणि विनय खचित ।।२१।।
त्रिलोकी करिती संचार
दुष्ट अधम जे दुराचार
पडत नाही त्यांची नजर
नाम घेती जे वारंवार ।।२२।।
राम म्हणा वा रामभद्र
अथवा जपावा रामचंद्र
त्या नरा ना लागे पाप
भोगी मोक्ष सुख आपोआप ।।२३।।
राममंत्र जिंकी जगत
नामे अभिमंत्रुन ताईत
कंठी धारण करी जो नित
सर्व सिद्धी त्या हस्तगत ।। २४।।
ह्याचे नाम वज्रपंजर
नित्य स्मरण करील जो नर
होईल त्याची आज्ञा पालन
लाभेल विजय होई कल्याण ।।२५।।
अशी रामरक्षा कथिली
शिवशंभोंने स्वप्नी येऊनी
बुधकौशिक महाऋषींनी
पहाटेस ठेविली लिहोनी।।२६।।
श्रीराम बगीचा कल्पतरूनचा
विनाश करी जो आपत्तींचा
श्रीराम त्रैलोक्य मनोहर
प्रभूचरणांवर आमुचे शीर।।२७।।
सुंदर सुकुमार तरुण
महाबली जो कमलनायन
वल्कले अन मृगाजीन
केली ज्याने परिधान
कंद मूळ फळ भक्षिती
ब्रह्मचर्य तप आचारती
जितेंद्रिय हे दशरथनंदन
श्रीराम लक्ष्मण भ्राते दोन ।। २८।।
शरणागतांस देती अभय
श्रेष्ठ धनुर्धर भ्राते उभय
जे राघसकुल संहारक
ते असोत आमचे रक्षक ।।२९।।
धनुष्य सज्ज बाण हाती
अक्षय भाते जवळी असती
रक्षण करी लक्ष्मणा रामा
मार्ग सदैव दाखवा आम्हा ।।३०।।
अंगी कवच हाती खड्ग
चाप बाण धरूनी सिद्ध
लक्ष्मणासह करि जो गमन
मनोरथ राम करो रक्षण ।।३१।।
दाशरथी राम महाबली
पुरुष पूर्ण ककुस्य कुळी
रघूत्तम लक्ष्मणाचा भ्राता
ज्याची कौसल्या असे माता ।।३२।।
वेद जाणतो जो यज्ञनेश
पुराणातील उत्तम पुरुष
जानकी वल्लभ असे श्रीमान
पराक्रमी जो रणी महान ।।३३।।
महेश सांगती पार्वतीला
श्रद्धेने घेती जो नामाला
अश्वमेधाहुनी अधिक
पुण्य मिळे मम भक्ताला ।।३४।।
दूर्वादलांसम सावळा राम
कमलनय जो कटी पितांबर
घेती त्याचे दिव्य नाम
भवसागर ते करतील पार ।३५।।
लक्ष्मणाग्रज राम रघुवर
सीता पती हा असे सुंदर
ब्राम्हण प्रिय अति धार्मिक
काकुस्थगुण निधी
दयासागर ।।३६।।
राजस सत्यवचनी दशरथसुत
सावळा शांत रघुनंदन
रघुकुल तिलक देई आनंद
रावणारीस असो वंदन।।३७।।
राम आणि रामभद्र
वेधस आणि रामचंद्र
रघुनाथ सियावर नाथ
नमन तुज चरणा लाऊन हात।।३८।।
श्रीराम राम रघुनंदन राम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम
श्रीराम राम रणवीर राम राम
श्रीराम राम शरण तुज राम राम।।३९।।
श्रीरामचंद्र चरण मनी स्मरावे
श्रीरामचंद्र चरण वदनी वदावे
श्रीरामचंद्र चरणी मस्तक टेकवावे
श्रीरामचंद्र चरणासी शरण जावे।।४०।।
माता राम मम पिता रामचंद्र
स्वामी राम प्रिय सखा रामचंद्र
सर्वस्व माझे दयाळू रामचंद्र
तुजविणा न कुणा मी जाणतो रामचंद्र।।४१।।
उजव्यास ज्याच्या शेषावतार
वामांगी असे जानकी सुकुमार
पुढे मारुती उभा जोडोनी कर
रघुनंदनाला असो नमस्कार।।४२।।
लोकप्रिय राम रणात वीर
राजीवनेत्र तो रघुवंश नाथ
करुणाकर असे कारुण्यरूप
त्यासी शरण मी जोडोनी हात।।४३।।
मनोवेगी जो पवना समान
जितेंद्रिय तो अति बुद्धिमान
वायुतनय जो वानरवीर
श्रीराम दूतासी आलो शरण।।४४।।
कवीराज कोकीळ जणू बनून
राम राम हे अक्षर मधुर
कवनरुपी शाखेसी गाई बसून
तया वाल्मिकींना माझे नमन।।४५।।
हरण करी जो आपदा
देई सर्व संपदा
सकल जनांच्या आनंदा
श्रीराम नमन सदा ।।४६।।
राम राम सदा गर्जा
भाजून टाका भवबीजा
तुम्हास लाभे सुखसंपदा
वाटेल यमदूता भय सदा।।४७।।
राम हा राजमणी सदा विजयी होतो
रमापती रामास मी नित्य भजतो
रामाने राक्षस वधले अनेक
नमस्कार रामासी माझे कितीक
रामाहुनी दुजा कुणी नाही थोर
रामाचा दास मी झुकवितो शीर
रामच्या ठायी चित्त निरंतर
श्रीराम माझा करी रे उद्धार।।४८।।
हे मनोरमे सदा जप राम राम
सहस्रतुल्य हे एकच नाम
रामाचे नाम हे किती महान
शिव सांगती पार्वती देई ध्यान ।४९।।
बुधकौशिककांनी रचलेले
रामरक्षास्तोत्र पूर्ण झाले.
।। श्रीसीता रामचंद्रार्पणमस्तु ।।