Rang Panchmi 2023 : रंगपंचमीला देवांनाही रंग लावायला विसरू नका; देवाशी जोडा भावनिक नाते!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 10:47 AM2023-03-10T10:47:42+5:302023-03-10T10:54:31+5:30
Rang Panchami 2023: रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते, सगळे मतभेद विसरून प्रेमरंगात नाती न्हाऊन निघतात, त्यात देवाचाही समावेश करावा, कारण...
होळीनंतर पाच दिवस रंगतो सोहळा रंगपंचमीचा! या वेळी १२ मार्च रोजी रविवारी रंगपंचमी आहे. सुटीअभावी आपण होळी, धुळवड, रंगपंचमी एकाच दिवशी साजरे करतो, परंतु यंदा योगायोगाने रविवारी रंगपंचमी आली आहे, त्यामुळे रंगांची मजा घेता येणार आहे. रंगपंचमीला आप्तजनांबरोबरच देवांशीही रंगपंचमी खेळली जाते. देवीदेवतांशी रंग खेळल्यामुळे एक भावनिक नाते देवाशी जोडले जाते.
उत्तर भारतात हा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो. तसेच महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि अन्य ठिकाणी या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. परंतु, अलीकडच्या काळात सुटीअभावी होळी, रंगपंचमी पाठोपाठ खेळली जाते. सुटीचा दिवस धुळवड, रंगपंचमीचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
राजस्थानात जैसलमेर येथे एक कृष्णमंदिर आहे. तिथे रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी केली जाते. लोकनृत्याचे आयोजन केले जाते. देवांशी रंगपंचमी खेळली जाते. परंतु कोव्हीडमुळे एकूणच सगळ्या उत्सवांवर विरझण पडले आहे. परंतु, तरीही उत्सवप्रिय लोक त्यातूनही मार्ग काढत सण साजरे करत आहेत.
रंगपंचमीचा उत्सव मुळातच देवतांचा उत्सव होता. श्रीकृष्ण आपल्या गोपिकांबरोबर रंग खेळण्यासाठी मुद्दाम गोकुळात येत असे. त्याच्या रंगात समस्त गोपिका रंगून जात असत. त्यांचा उत्साह पाहून स्वर्गातही रंगोत्सव खेळला जात असे. याच उपचाराचा एक भाग म्हणून आपणही देवीदेवतांशी रंगपंचमी खेळतो.
धुळवड झाल्यावर रंगपंचमीच्या मुहूर्तावर देवांची पूजा करून झाली, की देवांना गुलाल लावून आपणही रंगपंचमी साजरी करूया आणि समाजातील, मनामनातील मतभेद विसरून एकतेचा रंग येऊदे अशी प्रार्थना करूया.