Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 09:21 AM2024-10-10T09:21:51+5:302024-10-10T09:26:07+5:30

Ratan Tata : उच्चविद्याविभूषित आणि धनसंपन्न असणारे उद्योगपती रतन टाटा यांच्यावर दोन्ही देवी कशामुळे कृपावंत होत्या ते जाणून घेऊ. 

Ratan Tata: 'This' is the reason behind Saraswati and Lakshmi's continued dominance over Ratan Tata! | Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!

Ratan Tata : रतन टाटांवर सरस्वती आणि लक्ष्मीचा वरदहस्त कायम असण्यामागे होते 'हे' कारण!

आजचा दिवस उजाडला तोच, वाईट बातमी घेऊन! गेल्या दोन दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात होते आणि बातमी खरी ठरली, निधनवार्ता (Ratan Tata Death)आली! त्यांच्या जाण्यामुळे प्रत्येक भारतीयाला हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आपणही आपल्या क्षेत्रात उत्तुंग शिखर कसे गाठायचे हे त्यांच्या कर्तृत्त्वातून शिकण्यासारखे आहे. आपल्याला त्यांचे यश दिसते, पण त्यामागे त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत पाहणेही गरजेचे आहे. तेव्हाच तर त्यांच्यावर लक्ष्मी आणि सरस्वती कृपावंत झाल्या. शक्तीची आणि शारदेची उपासना त्यांनी कशी केली, हे त्यांच्या अनुभवाचे बोल त्यांच्याच शब्दात ऐकू आणि बोध घेऊ! 

रतन टाटा सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला वाटते, आपल्याला 'ड्रीम जॉब' मिळावा. परंतु, उद्योजक रतन टाटा म्हणतात, 'ड्रीम जॉब' वगैरे संकल्पना अस्तित्त्वात नसते. आवडीचे काम मिळूनही, त्याला अनुकूल स्थिती मिळेल असे नाही, अनुकूल स्थिती मिळाली, परंतु काम आवडीचे मिळेलच असे नाही. अशा परिस्थितीत आपली मनस्थिती तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतली आणि कामात स्वत:ला झोकून दिले, की आवडते, नावडते असे कामाचे स्वरूप राहणारच नाही. हाताला काम मिळाले, तर बुद्धीला चालना मिळत राहील. 

काम न करता जो बसतो, त्याला 'रिकामा' म्हणतात. अशा लोकांना समाजातच काय, तरी घरातही किंमत नसते. अनेक ठिकाणी ठळक अक्षरात पाटीदेखील लिहिलेली असते, 'कामाशिवाय बसू नये.' रिकामे, आळशी, कर्तव्यशून्य लोकांची घरात, कार्यालयात अडगळ होते. याउलट कामसू व्यक्ती प्रत्येकाला आवडते. ज्येष्ठ मंडळीदेखील निवृत्तीनंतर स्वत:मागे रोजची कामे लावून घेतात. बागकाम, भाजीकाम, वाचन, लेखन,मनन, नातवंडांना खेळवणे, शाळेतून ने-आण करणे, इ. यामुळे त्यांचे मन गुंतून राहते आणि वेळ चांगला जातो. 

काही जण रतीब टाकल्यासारखे काम करतात. अशा लोकांना आपल्या कामात कधीच रस वाटत नाही. उलट लोकांचे काम किती श्रेष्ठ, आपले कनिष्ठ अशी तुलना करण्यात ते वेळ वाया घालवतात. त्यापेक्षा, कामाची शैली बदलली, तर रोजचेच रटाळ काम आनंददायी वाटू लागते. 

गृहिणींनाही कामाचा कंटाळा येतो, परंतु त्या आपल्या स्वयंपाकगृहाला प्रयोगशाळा बनवतात आणि साधी फोडणीची पोळी आणि शिळा भातसुद्धा 'माणिकमोती' म्हणत पेश करतात.  रोज तेच धान्य, तेच मसाले, त्याच भाज्या, तरी त्याला वेगवेगळे वळण देऊन जेवणाची लज्जत वाढवण्याचे कसब त्यांनी अंगिकारले असते. आपणही आपल्या कार्यशैलीत बदल करून रोजच्या कामाची लज्जत  पाहिजे. 

आपल्या कामाकडे तुम्ही कसे पाहता, कसे लेखता, कसे करता, यावर कामाची प्रत ठरते. कोणतेही काम कमी नाही, फक्त तुमच्या कार्यपद्धतीवर त्या कामाची गुणवत्ता ठरत असते.

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर एकदा म्हणाल्या होत्या, `सूरात मी पक्की झाले, ते माझ्या आईमुळे. प्रत्येक गोष्ट अचूक झाली पाहिजे, असा तिचा नेहमीच आग्रह असे. साधा केर काढायचा असेल, तरीदेखील तो इतका स्वच्छ काढावा, की कोणालाही त्या कामाचेदेखील कौतुक वाटले पाहिजे.'

आपण अनेकदा आपली कामे दुसऱ्यांवर सोपवून निर्धास्त होतो. का? तर, आपल्याला खात्री असते, संबंधित व्यक्ती कामात चुकणार नाही, आपले नुकसान होणार नाही. मग, संबंधित व्यक्ती जर ते काम अचूक करत असेल, तर आपण का नाही? हा प्रश्न सतत, स्वत:ला विचारत राहा. आपले काम आनंदाने करा. नाचत-गात राहा.. मग बघा, आयुष्य कधीच कंटाळवाणे वाटणार नाही... कधीच नाही!

Web Title: Ratan Tata: 'This' is the reason behind Saraswati and Lakshmi's continued dominance over Ratan Tata!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.