Rath Saptami 2025:संक्राती ते रथसप्तमीच्या संक्रमण काळात 'या' कारणास्तव केले जाते गुप्तदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:05 IST2025-01-18T09:01:01+5:302025-01-18T09:05:01+5:30

Rath Saptami 2025:यंदा १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी मकर संक्रमणाचा काळ आहे, या काळात गुप्त दान करण्याचे महत्त्व जाणून घ्या!

Rath Saptami 2025: Secret donations are made during the transition period from Sankranti to Rath Saptami for this reason! | Rath Saptami 2025:संक्राती ते रथसप्तमीच्या संक्रमण काळात 'या' कारणास्तव केले जाते गुप्तदान!

Rath Saptami 2025:संक्राती ते रथसप्तमीच्या संक्रमण काळात 'या' कारणास्तव केले जाते गुप्तदान!

मकर संक्रांतीला तीळाचा लाडू देऊन आपण आप्त-स्नेह्यांना `तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला' अशी प्रेमळ विनवणी करतो. ही प्रथा फार पूर्वीपासून आहे. काही कारणांनी दुरावलेले संबंध या निमित्ताने पुनश्च जोडले जावेत, नात्यात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा उतरावा हा त्यामागचा आशय. या प्रथेबरोबरच संक्रांतीला आणखी एक प्रथा होती, ती म्हणजे गुप्तदानाची! गुप्तदानाचा मार्ग कोणता? तर तीळगुळाचे लाडू.  हो! तीळाच्या लाडवात बंदा रुपया लपवून ते लाडू गोरगरीबांना, ब्राह्मणांना, मंदिरातील पुजाऱ्यांना अथवा सेवकवर्गाला दान दिले जात असत. 

आपण म्हणू, आर्थिक मदत करायची होती, तर अशा स्वरूपात का? लाडू खायचे, की बंदे रुपये! ते यासाठी, कारण घेणाऱ्याला अनपेक्षित लाभ झाल्याचा आनंद मिळावा आणि देणाऱ्यालाही दानाचे समाधान लाभावे, यासाठी ही शक्कल लढवली जात असे. 

दानापेक्षा गुप्तदानाला महत्त्व अधिक असते. खरे पाहता दान हे नेहमीच गुप्त पद्धतीनेच केले पाहिजे. मात्र, अलीकडच्या काळात दानधर्माचा गाजावाजा केला जातो. देवस्थानांना, संस्थानांना, शाळांना दान केल्यावर तिथल्या भिंतींवर, पंख्यांवर, खुच्र्यांवर नाव कोरले जाते.  तर नवीन पद्धतीनुसार सेल्फी काढून समाज माध्यमांवर प्रसिद्धी मिळवली जाते. परंतु, धर्मशास्त्रानुसार अशा प्रकारे केलेल्या दानातून पुण्य मिळते, परंतु ते दान ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. कारण त्याला 'मी'पणाचा अहंकार चिकटतो आणि जिथे मी असतो, तिथे भगवंत कधीच सहभागी होत नाही. 

दान असे असावे, की या हाताचे त्या हातालाही कळता कामा नये, एवढी गोपनियता दानात असायला हवी. तरच घेणाऱ्याला कमीपणा वाटत नाही आणि देणाऱ्याला अहंकार चिकटत नाही. म्हणून, पूर्वी सण उत्सवाच्या निमित्ताने दानधर्म केले जात असत. तेही गुप्तसुप्त स्वरूपात. संक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळातून बंदे पैसे देणे, ही देखील तशीच एक सुंदर प्रथा! 

आजच्या काळातही असे गुप्तदान करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. विप्रो कंपनीचे मालक अझीम प्रेमजी दर दिवशी बावीस कोटींचे दान करतात. एचसीएलचे मालक शिव नादर, रिलायन्सचे मुकेश अंबानी, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम, फ्लिपकार्टचे मालक आणि भारतातील तरुण दानशूर बिन्नी बन्सल, टाटा समूहाचे मालक रतन टाटा, लेखिका रोहिणी निलकेणी यांचीही नावे भारतातील प्रमुख दानशूर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केली आहेत. कोव्हीड काळातही अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दान करून समाजसेवेला हातभार लावला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, हिंदी सिने अभिनेता सोनू सूद यांचे नाव आवर्जून घेता येईल. 

दानाची भाषा श्रीमंतांना शोभते असे म्हणणे चुकीचे ठरेल. दान करण्यासाठी पैशांची नाही, तर मनाची श्रीमंती लागते. आपल्या घासातला घास काढून देण्यासाठी मनाचे औदार्य असावे लागते. दान कोणीही करू शकते, अगदी आपणही! दान केवळ आर्थिक नाही, तर श्रमदान, रक्तदान, अन्नदान, अवयवदान अशा विविध मार्गांचा अवलंब आपल्याला करता येईल. फक्त त्याला मी पणाचा लवलेश नसावा, तरच ते दान ईश्वरचरणी पोहोचू शकेल.

Web Title: Rath Saptami 2025: Secret donations are made during the transition period from Sankranti to Rath Saptami for this reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.