RathaSaptami 2024: रथसप्तमीला दिलेले उपाय करा, सौंदर्य, आयुर्मान आणि धनसंपत्ती मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 12:08 PM2024-02-15T12:08:10+5:302024-02-15T12:09:04+5:30
RathaSaptami 2024: ज्योतिष शास्त्रानुसार रथसप्तमीला भगवान सूर्यनारायणाची सकाळी पूजा करतात. ती कशी करायची आणि त्यामुळे कोणकोणते लाभ होतात ते जाणून घ्या!
यावर्षी १६ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात या व्रताचे विशेष महत्त्व आहे. माघ शुद्ध सप्तमीचा दिवस रथसप्तमी नावाने साजरा केला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचे खूप महत्त्व आहे. ही तिथी सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी अचला सप्तमीचे आरोग्यदायी व्रत केले जाते, याला रथ सप्तमी व्रत असेही म्हणतात. रथ सप्तमीचे व्रत करणाऱ्या भाविकांना सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. सूर्यदेव त्यांना आरोग्य, सौभाग्य, संतती आणि सौंदर्य प्राप्त करतात.
माघी सप्तमीला अचला सप्तमी तसेच रथ सप्तमी असेही म्हणतात. नाव कोणतेही द्या, मात्र हा दिवस सूर्य उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. जे लोक या दिवसापासून सूर्याची उपासना करतात, त्यांची शक्ती, युक्ती, भक्ती वाढीस लागते.
रथ सप्तमी पूजन पद्धत
>> सकाळी लवकर उठा, आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
>>स्नानानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे
>>शक्य असल्यास नदी किंवा तलावात स्नान करून सूर्यदेवाची पूजा करावी.
>>अर्घ्य देताना सूर्य मंत्राचा जप करा
>>नदीच्या काठावर सूर्याची अष्टकोनी मूर्ती बनवून मध्यभागी स्थापना करून शिव-पार्वतीची पूजा करावी.
>>पूजेनंतर त्या प्रतीक रुपी देवतांची माती घरी आणली जाते आणि देवाजवळ ठेवली जाते.
>>पूजेनंतर ब्राह्मण तसेच गरीब व्यक्तीला दान करा.
वरील कामांबरोबर पुढील गोष्टी आठवणीने करा:
>>माघ शुक्ल पक्षाच्या सप्तमीला, सूर्योदयाच्या वेळी केसांवरून स्नान करा. मनात काही किल्मिष असेल तर ते दूर सारून सूर्यदेवाला शरण जा.
>>सूर्य देवाला तीळ आणि पाण्याचे अर्घ्य द्या.
>>संतती प्राप्तीसाठी सुर्यउपासना सुरु करा आणि रथसप्तमीला सूर्यदेवाला खीरीचा नैवेद्य अर्पण करा.
>>जर तुम्हाला त्वचेच्या कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल किंवा केसांची मुळे मजबूत करायची असतील तर या दिवशी नदीत केलेले स्नान आणि जोडीला सूर्योपासना फायदेशीर ठरते.