Ravi Pradosh Vrat 2023: रवी प्रदोष व्रत केले असता तुमच्या संसाराला मिळेल सुखाचे कोंदण; वाचा व्रतविधी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 10:36 AM2023-12-09T10:36:33+5:302023-12-09T10:36:54+5:30
Ravi Pradosh Vrat 2023: १० डिसेंबर रोजी रवी प्रदोष आहे, हे व्रत सूर्यास्ताच्या वेळी करायचे असून त्यासंबंधित सविस्तर माहिती जाणून घ्या!
प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य पक्षातील प्रदोषकालयुक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात. प्रदोषकाल हा साधारणपणे सूर्यास्तानंतर तीन घटी असतो. प्रदोष म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या तेरा तत्त्वांचा मेळ असलेली मायाविशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे. किंबहुना या तेरा तत्त्वातील संचित मायामल निरस्त होण्यासाठी प्रदोषव्रताची योजना आहे. ही तिथी ज्या वारी येते त्यानुसार त्या प्रदोषाचे नाव मिळते. जसे की १३ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने रवी प्रदोष आहे.
प्रदोष व्रताचा विधी:
प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करावा. प्रदोषव्रतादिवशी दिवसभर उपवास, शिवाची आराधना, स्तोत्रवाचन आणि प्रदोषकाली शिवपूजा व पारणा (उपासानंतरचे भोजन) असा क्रम असून दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णूपूजन केले जाते. या व्रतासाठी आदिमायेसह साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते. प्रदोषव्रतात उपवास हे मुख्य अंग असते. शास्त्रानुसार कोणताही उपवास आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होत असल्यामुळे आदल्या रात्रीच्या प्रथम प्रहरात अल्पाहार घ्यावा. मुख्य व्रतादिवशी शक्यतो जलोपवास अर्थात पाणी पिऊन करावा. तो प्रकृतीस मानवत नसेल, तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ करावा.
रवी प्रदोष मुहूर्त :
१० डिसेंबर रोजी प्रदोष पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ६.४५ ते रात्री ८.२३ पर्यंत आहे.
या व्रताचे फायदे व त्यासाठी उपाय :
१. यामुळे पती-पत्नीचे नाते मधुर राहते. उत्तम जीवनसाथीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय देखील करू शकता.
२. मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा किंवा पूजेच्या वेळी भोलेनाथांना ओम नमः शिवाय म्हणत बिल्वपत्र अर्पण करा. या उपायाने तुमची जी काही इच्छा असेल ती शिवाच्या कृपेने पूर्ण होईल.
३. जर तुम्हाला कोणताही रोग झाला असेल किंवा एखादी गंभीर समस्या असेल, ज्यावर उपाय उपलब्ध नसेल, तर रवि प्रदोष व्रताच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. संपूर्ण महामृत्युंजय मंत्र खाली दिलेला आहे.
ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ.
४. जर तुम्ही जमीन-संपत्तीशी संबंधित कोर्ट केस किंवा इतर प्रकरणांमुळे त्रस्त असाल तर प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान भोलेनाथांना गंगाजलात अक्षत मिसळून अभिषेक करा. शिवाच्या कृपेने तुमची समस्या दूर होईल.
५. जर तुम्हाला अज्ञात भीती वाटत असेल, शरीर शक्तीहीन वाटत असेल, आत्मविश्वासाची कमतरता असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिव पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय १०८ वेळा जप करावा. मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष किंवा चंदनाच्या माळा वापरा. तुम्हाला लाभ होईल.
६. जर तुमच्या कुटुंबात कलह असेल किंवा सुख-समृद्धी नसेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान शंकराला ज्वारीचे पीठ अर्पण करा. नंतर त्यापासून भाकरी बनवून बैल किंवा गाय वासराला खाऊ घाला. तुमची इच्छा पूर्ण होईल.