कपाळाच्या मध्यभागी कुंकुम तिलक किंवा चंदनटिळा लावल्याने संपूर्ण शरीराला होणारे फायदे वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:55 PM2021-05-06T16:55:15+5:302021-05-06T16:55:33+5:30
भूमध्य भाग नेत्रांच्या अत्यंत समीप असल्यामुळे उष्णताशामक चंदनाने नेत्रप्रांत शीतल राहते आणि उष्णताजन्य नेत्रदोष उद्भवत नाहीत. आज्ञाचक्रही सतत संवेदनशील राहते.
कोणतेही धर्मकृत्य करताना कपाळी गंध किंवा कुंकूमतिलक लावावा असा धर्मशास्त्राने सांगितलेला आचार आहे. चंदन हे जंतुघ्न आहे. त्याचप्रमाणे चंदन शीतल आणि उष्णता शामकही आहे. योगशास्त्रात प्रतिपादलेल्या षट चक्रांपैकी 'आज्ञाचक्र भूमध्याचे स्थानी' आहे. त्या भूमध्यावर चंदन लावल्याने आज्ञाचक्र शीतल राहते. तसेच भूमध्य भाग नेत्रांच्या अत्यंत समीप असल्यामुळे उष्णताशामक चंदनाने नेत्रप्रांत शीतल राहते आणि उष्णताजन्य नेत्रदोष उद्भवत नाहीत. आज्ञाचक्रही सतत संवेदनशील राहते.
'भृकुटीमाजी चंद्रामृताचे तळे' असा संतवाङमयात उल्लेख आहे. भृकुटी मध्यात आज्ञाचक्र ही एक अत्यंत संवेदनाक्षम ग्रंथी आहे. ही ग्रंथी ज्याची कमकुवत असते त्याच्यावर अन्य व्यक्तीच्या विचार, विकारांच लहरींचे आक्रमण होत़ या लहरी विद्युत स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्या सहज प्रविष्ट होतात. परंतु चंदन हे काष्ट आहे. वाळल्यावर त्या चंनतिलकाला काष्ठगुण प्राप्त होतात. काष्ठ म्हणजे लाकूड हे विद्युतप्रतिबंधक आहे. म्हणजे ते बॅड कंडक्टर आहे. त्यामुळे दुसऱ्यांचे विद्युत स्वरूपाचे आदळणारे विचार विकार यांना ते प्रतिबंध करते. तसेच दुष्ट दृष्टीदोषालाही प्रतिबंध करून संरक्षण करते. चंदन तिलक धारणेची ही वैज्ञानिक उपपत्ती आहे.
कुंकूमतिलक लावण्याची उपपत्ति
कुंकूमतिलकही भूमध्यस्थानीच लावतात. त्यामुळे वर चंदन तिलकधारणेचे जे लाभ सांगितले, तेच कुंकुमतिलक धारणेलाही लागू पडते.कुंकूसुद्धा जंतुघ्न शीतल आणि रक्तशुद्धीकारक आहे. नेत्राजवळच्या नसा, कपाळावरील नसा यांना त्या रक्तशुद्धी करून शिवाय आतील विषारी कीटाणूंचाही नाश करतात.