रथसप्तमीच्या आदल्या दिवशी गॅस शेगडी किंवा चुलीचे पूजन का केले जाते व रथसप्तमी साजरी कशी करतात ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 03:40 PM2022-02-05T15:40:51+5:302022-02-05T15:41:33+5:30

७ फेब्रुवारी रथसप्तमी! हा सूर्याचा सण. त्याच्यासाठी छानसा नैवेद्य दाखवून त्याची पूजा करावी यासाठी हा व्रत विधी!

Read on why gas stove is worshiped on the day before Rath Saptami and read how it celebrated! | रथसप्तमीच्या आदल्या दिवशी गॅस शेगडी किंवा चुलीचे पूजन का केले जाते व रथसप्तमी साजरी कशी करतात ते वाचा!

रथसप्तमीच्या आदल्या दिवशी गॅस शेगडी किंवा चुलीचे पूजन का केले जाते व रथसप्तमी साजरी कशी करतात ते वाचा!

googlenewsNext

माघ शुक्ल सप्तमीला 'रथसप्तमी' असे विशेष नाव आहे. या दिवसाला धर्मकार्यात तसेच सूर्योपासनेत अतिशय महत्त्व आहे.' ७ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे. व्रतासाठी ही सप्तमी अरुणोदयव्यापिनी घ्यावी' असे धर्मधुरिणांनी लिहून ठेवले आहे.  या सप्तमीला आपल्याकडे रथसप्तमी असे नाव आहे. भारतात विविध प्रांतात ती जयंती सप्तमी, विधान सप्तमी, विशेष सप्तमी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला महासप्तमी म्हणून गौरवले गेले आहे. सूर्यापासक मंडळींमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते. 

रथसप्तमी पूजेचा विधी 

व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त अर्थात एक वेळ जेवून राहावे. सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा. या विधीनंतर स्वत:च्या घराच्या अंगणात रक्तचंदनाचे गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढावे. त्या चित्राचे 'ध्येय: सदा सवितृमंडल मध्यवर्ती' या मंत्राने ध्यान करावे. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. शेणीच्या विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा. शेवटी सात रुईची पाने, सात प्रकारचे धान्य, सात बोरे वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे. ब्राह्मणभोजन घालावे. स्त्रिायांनी संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ करावा. दुर्धर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झाले. 

कालानुरूप बदल 

आजच्या काळात हे व्रत करताना काही अडचणी येऊ शकतात. त्यावर मार्ग सुचवताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर धर्मबोध या ग्रंथात माहिती देतात- सध्याच्या काळात प्रत्येकालाच जलाशयात स्नान करणे किंवा वाहत्या पाण्यात दिवा सोडणे शक्य नाही. अशावेळी बादलीतील पाण्यालाच आपण वास्तव्यास असलेल्या राज्यातील एखादी नदी समजून स्नान करावे. शुचिर्भूत झाल्यावर पाण्याने भरलेला नवीन टब किंवा परात गच्चीत नेऊन तिच्यामध्ये तेवता दिवा सोडावा. तसेच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर वा झाडाच्या बुंध्याशी ठेवून प्रज्वलित करावा. 

पूर्वी 'चूल' अस्तित्वात असताना गोवऱ्यांवर खीर शिजवणे शक्य होते.आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅसची शेगडी आदल्या रात्री स्वच्छ धुऊनपुसून लख्ख करावी. सकाळी तिची पूजा करावी. नंतर त्यातल्या त्यात नव्या स्टीलच्या वा पितळेच्या भांड्यात ही खीर शिजवावी. ब्राह्मणाला किंवा परिचितांपैकी कोणालाही जेवणासाठी निमंत्रण द्यावे. कामाचा दिवस असल्यास डब्यातून खीर, पुऱ्या भाजी बरोबर घेऊन जाऊन आपल्या सहकाऱ्यांना प्रसाद म्हणून द्याव्यात. यापैकी काहीही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजण्यापूर्वी यथाशक्त गायत्री मंत्राचा जप, सूर्याचे ध्यान, नामस्मरण, अर्घ्य देणे सर्वांनाच शक्य आहे. खीर करून तिचा नैवेद्या मात्र जरूर दाखवावा. रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणांचे गोड खिरीसह स्वागत करणे आपले कर्तव्यच आहे. हे कर्तव्यकर्म 'धर्म' म्हणून शक्य तेवढे केले पाहिजे.

Web Title: Read on why gas stove is worshiped on the day before Rath Saptami and read how it celebrated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.