उद्या विवाह पंचमीला वाचा सीता स्वयंवराची कथा, दूर होतील तुमच्या वैवाहिक जीवनाच्या व्यथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 12:27 PM2021-12-07T12:27:55+5:302021-12-07T12:28:19+5:30
बुधवार, ०८ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पंचमीचा दिवस विवाह पंचमी या नावे साजरा केला जातो. कारण या दिवशी प्रभू श्रीराम आणि सीतामाईचा विवाह झाला होता. या दिवशी सीता स्वयंवराच्या कथेचे पठण केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. चला करूया सीता स्वयंवराच्या प्रसंगाची उजळणी!
श्रीरामाचे चरित्र वारंवार वाचावे एवढी त्या रामकथेत गोडी आहे. त्यात सर्व नात्यांमध्ये असलेल्या उत्कट प्रेमाचे दर्शन घडते. विशेषतः राम सीतेच्या सहजीवनाचे. लोकांच्या त्यांच्या चरित्रात उणिवा दिसतात, परंतु राम सीतेचे परस्पर प्रेम आणि एकमेकांवरील दृढ विश्वास, एकमेकांना समजून घेण्याची क्षमता आणि पती पत्नी असूनही जपलेलं प्रेमाचं, मैत्रीचं नातं. आजच्या काळात त्यांच्या नात्याचा आदर्श सर्वांनी ठेवायला हवा. म्हणूनच विवाह पंचमीच्या औचित्याने राम सीतेच्या विवाहाच्या प्रसंगाची उजळणी करू. कारण, या कथेच्या केवळ श्रवणाने किंवा पठणाने आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. आपणही भक्तिभावे या कथेचा एक दुवा होऊया.
सीता स्वयंवराची गोष्ट :
रामायणानुसार भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्येचा राजा दशरथ यांच्या पोटी झाला होता. माता सीतेचा जन्म मिथिलाचा राजा जनक याच्या पोटी झाला. म्हणूनच तिला जानकी असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार, नांगरणी करताना माता सीता राजा जनकाला शेतात सापडली. तिला जनकाने पोटच्या मुलीसारखी वाढवली. तिचे पालन पोषण केले.
एकदा सीतेने खेळता खेळता शिवधनुष्य उचलले होते. ते धनुष्य जनकाला परशुरामाने दिले होते. ते दृश्य पाहून राजा जनकाला धक्का बसला कारण हे धनुष्य उचलण्याची क्षमता फक्त परशुरामांकडेच होती. माता सीतेचे हे गुण पाहून राजा जनकाने तिच्या स्वयंवराच्या वेळी अट घातली की जो कोणी हे धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा जोडेल त्याच्याशीच सीतेचा विवाह लावून दिला जाईल.
ही घोषणा ऐकून विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणासह सीता स्वयंवरात पोहोचले. तिथे आलेले सर्व राजपुत्र आणि राजे ते धनुष्य उचलू शकले नाहीत. राजा जनक हताश होऊ लागला की 'माझ्या मुलीच्या पात्रतेचा कोणी नाही का?
त्यानंतर प्रभू श्रीराम यांना संधी देण्यात आली. त्यांनी उठून गुरूंना, उपस्थितांना आणि धनुष्याला नमस्कार केला आणि नंतर ते धनुष्य एका झटक्यात उचलले आणि त्याची प्रत्यंचा लावली.धनुष्य ताणले गेले आणि तुटले. तेव्हा खूप मोठा आवाज झाला. ही वार्ता कळताच परशुराम संतप्त झाले. परंतु श्रीरामांच्या ठायी साक्षात विष्णू आणि माता सीतेमध्ये लक्ष्मीला पाहिले आणि त्यांना विवाहासाठी आशीर्वाद दिला. विवाह निर्विघ्नपणे आणि आनंदाने पार पडला.
त्यानंतर या दोहोंच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आल्या परंतु त्यांचे परस्परावरील प्रेम आणि विश्वास तसूभरही ढळला नाही. एक राजा या भूमिकेतून श्रीरामांनी घेतलेल्या निर्णयाचा सीतामातेने सदैव आदर केला आणि पती भूमिकेतून श्रीरामांनी सीतेवर अनेक आरोप होऊनही आयुष्यभर एकपत्नी व्रत अंगिकारले. यावरून त्यांचे अतूट नाते लक्षात येते. म्हणून विवाह पंचमीला त्यांचा आदर्श ठेवून विश्वासाने आणि एकमेकांना आदर देऊन संसार करावा हा संस्कार आपल्या संस्कृतीने घालून दिला आहे.