वाचा देवीच्या शक्तिपीठाशी स्थित असलेल्या एका अद्भुत जलकुंडाची माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:03 PM2022-02-03T14:03:48+5:302022-02-03T14:04:51+5:30
पूर्ण देशात देवीची एकूण ५१ शक्तिपीठे आहेत. असे म्हणतात, की ही शक्तिपीठे शीव आणि शक्ती यांचे वसतीस्थान असते. तिथेच अशा चमत्कृती बघायला मिळतात.
हिमाचल प्रदेशात पुराण काळापासून ज्वालादेवीचे मंदिर आहे. तिथे काळानुकाळापासून नऊ मशाली अखंड प्रज्वलित आहेत़. असे म्हणतात, की आजतागायत देवी माता मशालींच्या उजेडात आपला निस्सिम भक्त गोरखनाथ याची वाट पाहत आहे.
सनातन धर्मापासून देवीला शक्तीची देवता म्हणून पुजले जाते. पूर्ण देशात देवीची एकूण ५१ शक्तिपीठे आहेत. असे म्हणतात, की ही शक्तिपीठे शीव आणि शक्ती यांचे वसतीस्थान असते.
या ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे, हिमाचल प्रदेश येथील ज्वालादेवी मंदिर. हे मंदिर हिमाचल प्रदेशच्या कांगाडा जिल्ह्याच्या कालीधर डोंगररांगांमध्ये स्थित आहे. असे म्हणतात, की देवी सतीची जिव्हा अर्थात जीभ इथे पडली होती. तिथे पुराणकाळापासून ९ मशाली अखंडपणे प्रज्वलित आहेत. त्यात चांदीच्या मशालीशी स्थित असलेली देवी महाकाली म्हणून ओळखली जाते. अन्य ८ ज्वालांशी अन्नपूर्णा, चंडी देवी, हिंगलाज, विंध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका आणि अंजी या देवींचे मंदिर आहे.
या मंदिरात ज्वाला देवीचे मंदिर भाविकांसाठी मुख्य आकर्षण केंद्र आहे. तसेच तिथे एक कुंड आहे, त्याचे नाव आहे `गोरख कुंड' (गोरख डिब्बी )या कुंडाचे वैशिष्ट्य असे, की कुंडातले पाणी उकळत असल्याचा भास होतो. वास्तविक, हात लावला असता ते पाणी थंडगार असते. त्या मंदिर परिसरात गोरखनाथांनी वास्तव्य केले होते, म्हणून कुंडाला त्यांचे नाव दिले गेले.
गोरखनाथ इथेच देवीची सेवा करत असत. एकदा गोरखनाथांना भूक लागली होती, तेव्हा त्यांनी देवीला त्या कुंडात पाणी तापायला ठेवण्यास सांगितले. आपण भिक्षा मागण्यासाठी निघून गेले. भिक्षेत मिळालेले धान्य शिजवून देवीला नैवेद्य व आपल्याला भोजन, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, त्यावेळेस गोरखनाथ देवीचा निरोप घेऊन गेले, ते परतलेच नाहीत. देवी आजही पूत्रसमान असलेल्या भक्ताची वाट पाहत आहे. म्हणूनच कुंडातील पाणी उकळत असल्याचा भास होतो. परंतु, खुद्द गोरखनाथ तिथे येईपर्यंत हा केवळ आभासच राहील.
कलियुग संपून सतयुग येईल, तेव्हा गोरखनाथ आणि देवीची पुनश्च भेट होईल, असे म्हटले जाते. अशा अद्भुत मंदिराचा परिसर, कुंड आणि ज्वालादेवीचे दर्शन घेतलेच पाहिजे. ज्वालादेवी माती की जय!