विष्णूभक्त नाकापासून कपाळापर्यंत उभे गंध का लावतात, त्यामागे आहे 'हे' कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:06 PM2021-06-15T17:06:19+5:302021-06-15T17:06:40+5:30
शिवभक्त भस्मलेपन करतात आणि गंधाची आडवी बोटे कपाळावर उमटवतात, तर विष्णूभक्त गंधाची उभी बोटे उमटवतात.
विष्णूभक्तांच्या कपाळावर आपण नेहमी उभे गंध पाहतो. हे गंध सामान्य गंधासारखे उभ्या रेषेत नसून इंग्रजीतील व्ही अक्षरासारखे असते. केवळ कपाळावर नाही, तर ते लोक आपल्या भुजांवर, छातीवर आणि पाठीवरदेखील असे गंध लावतात. पण का? त्याची ही सविस्तर माहिती...
हिंदू परंपरेनुसार कपाळ मोकळे ठेवणे अशुभ मानले जाते. कोणत्याही प्रकारचे असो, पण कपाळावर गंध लावणे हे संस्कृतीचे चिन्ह मानले जाते. तसेच कपाळावरील, दोन भुवयांच्या मध्य भागाचे ते पूजन असेही मानले जाते. शिवभक्त भस्मलेपन करतात आणि गंधाची आडवी बोटे कपाळावर उमटवतात, तर विष्णूभक्त गंधाची उभी बोटे उमटवतात.
वैष्णव भक्तीत गंधलेपनासाठी गोपीचंदनच वापरले जाते.
गोपीचंदनाची उत्पत्ती कृष्णकथेत सापडते. कृष्णाच्या देहाला झालेला दाह गोपिकांच्या पायदळी तुडवल्या गेलेल्या मातीच्या लेपाने शांत झाला. तो लेप गोपीचंदन म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक फायदे पाहता आजही त्या विशिष्ट प्रकारच्या मातीपासून गोपीचंदनाची निर्मिती केली जाते. ही माती द्वारकेजवळच आढळते. भगवान गोपालकृष्णांनी कृष्णावतार समाप्त केला, तेव्हा गोपिकांनीदेखील यमुनेत आपला देह ठेवला. त्या नदीतटावरची माती गोपीचंदन बनवण्यासाठी वापरली जाते. कृष्णभक्तीचा अंश त्या मातीत मिसळलेला असल्यामुळे ती माती भाळी लावली जाते आणि आजही विष्णू भक्ती गोपीचंदनाचा तिलक आपल्या कपाळावर शोभेने मिरवतात.
गोपीचंदन लावण्याची विष्णू भक्तांची वेगवळीच परंपरा आहे. ती म्हणजे दोन भुवयांच्या मध्यापासून कपाळाच्या शेवटापर्यंत ऊर्ध्वदिशेने चंदनलेपन केले जाते. ही त्यांची ओळख आहे. या खुणेवरून विष्णुभक्त ओळखता यावे, एवढीच त्यामागील सद्भावना. त्याचबरोबर दोन भुवयांमधील गंधलेपन आपल्याला सातत्याने विष्णुभक्तीचा आठव करून देते आणि आपला भालप्रदेश शीतल व शांत ठेवते.
- अनेक शास्त्रात वर्णन केल्यानुसार गोपीचंदन लावणाऱ्या व्यक्तीला मरणोत्तर वैकुंठधाम प्राप्त होते.
- गोपीचंदन लावणारी व्यक्ती वाममार्गाकडे जात नाही. कारण कपाळावर लावलेले गंध वाईट विचारांपासून मनाला परावृत्त करते.
- गोपीचंदन लावून कृष्णभक्ती किंवा विष्णूभक्ती करणाऱ्या भक्ताला राजसूय यज्ञाचे किंवा अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते.
- गोपीचंदन लावणारी व्यक्ती सांसारिक सुखापासून अलिप्त होत पारमार्थिक सुखाची अनुभुती घेते.
- वैष्णव सांप्रदायाने परदेशातील लोकांनाही विष्णू भक्तीची गोडी लावल्याचे दिसते. हरे राम हरे कृष्णा या संस्थेअंतर्गत कृष्ण भक्तीचा मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार होत असल्याचे दिसून येते.