Relationship Tips: जोडीदारापैकी कोणी एक खूपच तापट असेल तर उपाय काय? साधूबाबांनी दिले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:28 IST2025-02-21T13:27:48+5:302025-02-21T13:28:15+5:30

Relationship Tips: राग लोभ प्रत्येक नात्यात असतातच, पण लोभ नसून नुसताच राग राग होत असेल तर त्या नात्यात कोणा एकाची घुसमट होते, त्यावर उपाय सांगणारी बोधकथा!

Relationship Tips: What is the solution if one of the partners is too agressive? Sadhu Baba gave the answer! | Relationship Tips: जोडीदारापैकी कोणी एक खूपच तापट असेल तर उपाय काय? साधूबाबांनी दिले उत्तर!

Relationship Tips: जोडीदारापैकी कोणी एक खूपच तापट असेल तर उपाय काय? साधूबाबांनी दिले उत्तर!

काही गोष्टी, मुद्दे सोदाहरण सांगितले की लगेच कळतात, पटतात. म्हणून पूर्वी आजी आजोबा नातवंडांना इसापनीतीच्या गोष्टी सांगत असत. त्यात संवाद प्राण्यांच्या तोंडी असले तरी घटना मानवी जीवनाशी निगडित असत. त्यातून खूप छान शिकवण मिळत असे. आज अशीच एक बोधकथा आपण जाणून घेणार आहोत. 

फार पूर्वी एक वृद्ध साधू हिमालयाच्या डोंगरात राहत होते. ते अत्यंत विद्वान होते आणि त्याच्या बुद्धिमत्तेची कीर्ती दूरवर पसरली होती. एके दिवशी एक स्त्री त्यांच्याकडे आली आणि रडायला लागली, "बाबा, माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, पण जेव्हापासून तो युद्धातून परतला तेव्हापासून तो माझ्याशी नीट बोलतही नाही."

"युद्धातल्या हाणामारीमुळे त्याचा स्वभाव बदलला असेल" , साधूंनी सांगितले. 

"असू शकते, पण लोक म्हणतात की तुम्ही दिलेली औषधी वनस्पती माणसात बदल घडवू शकते, कृपया मला ती औषधी द्या." , महिलेने विनवणी केली.

साधूंनी थोडावेळ विचार केला आणि मग म्हणाले, "देवी, मी तुला ती औषधी नक्कीच दिली असती, पण ती बनवण्यासाठी एक गोष्ट लागेल, जी आज माझ्याकडे नाही."

“तुम्हाला काय लागेल ते सांगा मी घेऊन येईन.”, ती स्त्री म्हणाली.

“मला वाघाच्या मिशीचे केस हवे आहेत,” साधूंनी सांगितलं. 

पुढचा मागचा विचार न करता दुसऱ्याच दिवशी ती महिला वाघाच्या शोधात जंगलात निघाली, खूप शोधाशोध केल्यावर तिला नदीच्या काठावर वाघ दिसला, वाघाने तिला पाहताच डरकाळी फोडली, ती महिला घाबरली आणि धावत पळत आपल्या घरी आली. 

पुढचे काही दिवस असे घडत राहीले, ती बाई हिंमत दाखवून वाघाजवळ जाई आणि घाबरून परत येई. जसजसे महिने उलटले तसतसे वाघाला महिलेच्या येण्याची सवय झाली आणि आता तो तिला पाहिल्यावर घाबरवण्याचा थांबला. आता बाईंनीही वाघासाठी मांस आणायला सुरुवात केली आणि वाघ मोठ्या चवीने खाऊ लागला. त्यांची मैत्री वाढू लागली आणि आता ती महिलाही वाघाला थोपटायला लागली. मग एके दिवशी तिने हिंमत दाखवून वाघाच्या मिशीचे केसही काढले.

क्षणाचाही विलंब न करता ती साधुंकडे पोहोचली आणि म्हणाली, "बाबा, मी वाघाच्या मिशीचे केस आणले आहेत."

"खूप छान." असे म्हणत साधूंनी केस अग्नीत टाकले.

"अहो बाबा, हे काय आहे, हे केस मिळविण्यासाठी मी किती प्रयत्न केले आणि तुम्ही ते जाळून टाकले ? आता माझी औषधी वनस्पती कशी तयार होणार?" बाई घाबरून म्हणाल्या.

"आता तुम्हाला औषधी वनस्पतींची गरज नाही." साधू म्हणाले, ''जरा विचार करा, तुम्ही वाघाला कसे काबूत आणले….जर भयंकर प्राण्याला संयमाने आणि प्रेमाने काबूत ठेवता येते, तर माणसाला काबूत आणता येत नाही का? जा, वाघाला जसे मित्र बनवले तशी तुझ्या नवऱ्याची प्रेमाची भावना जागृत कर.”

बाईला साधूंचे म्हणणे समजले आणि तिला तिची जडीबुटी मिळाली...! 

या बोधकथेतून शिकण्यासारखी गोष्ट हीच की जोडीदारापैकी कोणी एक तापट असेल तर दुसऱ्याला संयमाने घ्यावे लागते आणि प्रेमाने व सबुरीने त्यांना आपलेसे करावे, हेच स्वभावावरचे औषध समजावे. 

Web Title: Relationship Tips: What is the solution if one of the partners is too agressive? Sadhu Baba gave the answer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.