Religious Rules : सूर्यास्तानंतर केस आणि नखं कापू नये म्हणतात, जाणून घ्या त्यामागील शास्त्रीय कारण...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 05:11 PM2022-08-03T17:11:04+5:302022-08-03T17:11:40+5:30
Religious Rules : नखं कापणे आणि केस कापणे हा शारीरिक स्वच्छतेचा एक भाग, पण त्याचीही वेळ मर्यादा पूर्वजांनी आखून दिली होती. पण का आणि कशासाठी? वाचा.
हिंदू धर्मात अनेक रूढी-प्रथा पिढीदर पिढी पाळल्या जातात. कालपरत्वे काही नियम शिथिल होतात तर काही नियम काटेकोरपणे पाळले जातात. त्याच नियमांपैकी एक नियम म्हणजे सूर्यास्तानंतर केस आणि नखं कापू नयेत. पण का? ते जाणून घेऊ.
बालपणी आपल्याला छोट्या मोठ्या सवयींची शिस्त लावण्याचे खाते विशेषतः आई नाहीतर आजीकडे असे. सोमवारी, शनिवारी केस धुवू नये, सायंकाळी केर काढू नये, तेल मीठ सायंकाळी विकत आणू नये, सूर्यास्तानंतर कोणाला पैसे देऊ नये. अशा अनेक नियमांचे आपण जमेल तसे, जमेल तेव्हा पालन करतो. यापैकीच एक सवय म्हणजे सायंकाळनंतर नखं आणि केस कापू नये.
काय आहे त्यामागचे कारण? जाणून घेऊ.
सांयकाळी दिवेलागणीची वेळ ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ मानली जाते. तिच्या स्वागतासाठी आपण संध्याकाळ होण्याआधी घर आवरतो, केर काढून स्वच्छ करतो. अशा वेळी कापलेली नखं घरात टाकणे किंवा संध्याकाळी केस कापायला जाणे हा लक्ष्मी मातेचा अपमान समजला जातो. तिची नाराजी ओढवली जाऊ नये म्हणून सायंकाळी या गोष्टी करू नयेत असे त्यामागचे धार्मिक कारण आहे. तर शास्त्रीय दृष्ट्या तसे करणे अयोग्य का, तेही पाहू.
शास्त्रीय कारण :
रात्री केस आणि नखे न कापण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. पूर्वी दिव्याच्या अल्प प्रकाशात जमिनीवर पडलेली नखं, गुंतूळ, कापलेले केस दिसत नसत. भारतीय बैठकीनुसार जेवायला खाली बसताना ते जेवणात येऊ नये, त्यामुळे रोगराई पसरू नये, त्यामुळे सायंकाळी या गोष्टी टाळल्या जात असत. मग तुम्ही म्हणाल, आता तर घराघरात सायंकाळीसुद्धा भरपूर प्रकाश असतो, मग आता हा नियम मोडल्यास काय हरकत आहे? तर प्रश्न पुन्हा स्वच्छतेचा आहे. केस किंवा नखं कापल्यानंतर स्वच्छ अंघोळ करणे महत्त्वाचे असते. सायंकाळी केस किंवा नखं कापल्यावर अंघोळीचा कंटाळा केला तर आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यापेक्षा या दोन्ही गोष्टी सकाळच्या वेळी करणे इष्ट ठरते!