Ganesh Mahotsav: उत्खननात प्रकट झाली उजव्या सोंडेची गणेश मूर्ती, अमरावतीतील वायगावात वाड्याचे झाले मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 09:08 AM2022-09-01T09:08:14+5:302022-09-01T09:09:42+5:30
Ganesh Mahotsav: महाराष्ट्रात उजव्या सोंडेच्या गणेश मूर्ती दोनच. त्यापैकी मुंबईतील सिद्धिविनायक ही स्थापन केलेली, तर वायगावची सिद्धिविनायक गणेश मूर्ती ही वाड्याची पायाभरणी करताना उत्खननात सापडलेली. इंगोले यांच्या याच वाड्यात मूर्ती स्थापित करून त्याचे मंदिर करण्यात आले.
- मनीष तसरे
अमरावती : महाराष्ट्रात उजव्या सोंडेच्या गणेश मूर्ती दोनच. त्यापैकी मुंबईतील सिद्धिविनायक ही स्थापन केलेली, तर वायगावची सिद्धिविनायक गणेश मूर्ती ही वाड्याची पायाभरणी करताना उत्खननात सापडलेली. इंगोले यांच्या याच वाड्यात मूर्ती स्थापित करून त्याचे मंदिर करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने येथे भाविकांची गर्दी होत आहे. अज्ञातवासात असलेल्या पांडवांनी येथे भेट दिल्याची आख्यायिका आहे.
अमरावती-परतवाडा मार्गापासून वलगावनंतर एक मैल अंतरावर वायगाव हे इंगोलेंचे गाव. १८६५च्या सुमारास परंपरागत वतनदार इंगोले यांच्या वाड्याच्या बांधकामासाठी पाया खोदत असताना सुबक गणेशमूर्ती आढळून आली. उजव्या सोंडेचा हा गणपती पंचक्रोशीत नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्धीस आला. २०१२ मध्ये आळंदीचे रामचंद्रबाबा बोदे यांच्या हस्ते कळस स्थापना झाली.
पारंपरिक दिंडीने विसर्जन
साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात गणेश विसर्जनाची मिरवणूक पौर्णिमेला पारंपरिक वारकरी दिंडीने काढली जाते. पालखी, घोडे यांच्या समावेशाने दिंडी देखणी होते. यानिमित्त नागरिक, विशेषत: सासुरवाशीण मुली आवर्जून हजर राहतात, असे संस्थानचे अध्यक्ष विलासराव इंगोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
४० किलो चांदीचे छत उजव्या सोंडेच्या आसनस्थ सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर ४० किलोचे चांदीचे छत आहे. मूर्ती एकदंत, पायावर पद्म, शंख चिन्हांकित आहे. आजूबाजूला रिद्धी-सिद्धी आहेत.
सूर्यकिरणे थेट मूर्तीवर सूर्यप्रकाशाचा पहिला कवडसा सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर पडावा, अशी वाड्याची बांधणी करण्यात आली होती. मंदिराचा जीर्णोद्धार करताना ही बाब लक्षात ठेवून बांधकाम झाले आहे.