Rishi Panchami 2023: ऋषिपंचमीला कलावती आई तसेच मत्स्येंद्रनाथ यांची जयंती असते; या तपस्वीच्या जीवनाचा धावता आढावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 05:02 PM2023-09-19T17:02:10+5:302023-09-19T17:02:55+5:30

Rishi Panchami 2o23: ऋषिपंचमी हा सण ऋषी मुनींचे स्मरण करून त्यांच्यासमोर विनम्रपणे नतमस्तक होण्याचा आहे. पाहूया त्यांचे योगदान... 

Rishi Panchami 2023: Rishi Panchami marks the birth anniversary of Mother Kalavati as well as Matsyendranath; A quick review of the life of this ascetic! | Rishi Panchami 2023: ऋषिपंचमीला कलावती आई तसेच मत्स्येंद्रनाथ यांची जयंती असते; या तपस्वीच्या जीवनाचा धावता आढावा!

Rishi Panchami 2023: ऋषिपंचमीला कलावती आई तसेच मत्स्येंद्रनाथ यांची जयंती असते; या तपस्वीच्या जीवनाचा धावता आढावा!

googlenewsNext

>> रोहन विजय उपळेकर

२० सप्टेंबर रोजी ऋषी पंचमी आहे. भारतीय संस्कृती ही ऋषिसंस्कृती आहे. म्हणून आपल्या वैभवसंपन्न व एकमेवाद्वितीय संस्कृतीचे प्रणेते व संवर्धक असणा-या ऋषी-मुनींचे आपण प्रेमादरपूर्वक स्मरण करून, त्यांनी घालून दिलेल्या हितकर व श्रेयस्कर मार्गावरून चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सृष्टी उत्पत्ती करताना भगवान ब्रह्मदेवांनी सुरुवातीला आपल्या या सात पुत्रांना निर्माण करून त्यांना पुढे उत्तम संतती निर्माण करण्याची आज्ञा केली. मरीचि, अत्रि, आंगिरस, पुलह, पुलस्त्य, क्रतु व वसिष्ठ हेच ते सात प्रथम ब्रह्मपुत्र सप्तर्षी होत. यांच्यापासूनच पुढे सर्व प्रजा निर्माण झाली, म्हणून हे मानववंशाचे मूळ जनक होत. काही ठिकाणी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, विश्वामित्र, कश्यप व जमदग्नि यांनाही सप्तर्षी म्हटले जाते. सप्तर्षी हे तर आपली अजरामर संस्कृती निर्माण करणा-या हजारो महान आत्मज्ञानी, संशोधक, शास्त्रज्ञ आणि बरेच काही असणा-या ऋषींचे केवळ प्रतिनिधी मानलेले आहेत. 

त्यांच्या माध्यमातून आजवरच्या सर्व ऋषींचे सादर स्मरण करायचे आहे आपल्याला. म्हणूनच सप्तर्षी हे आजवरच्या सर्व ऋषींचे, चरक-सुश्रुतादी, वामदेव-व्यासादी, पाणिनी-पतंजली, याज्ञवल्क्य-कश्यपादी सर्व महानुभावांचे उपलक्षण आहे. त्यामुळे नावांच्या वादात न पडता आपण कृतज्ञतेने या सर्वच महान ऋषींचे स्मरण करू या.

या ऋषींनीच सुरुवातीला आपली देवदत्त अलौकिक प्रज्ञा वापरून विविध प्रयोग करून ही पृथ्वी राहण्या-खाण्यायोग्य केली, मानववंशाचे सर्वतोपरि भले कसे होईल ? याचा सूक्ष्म विचार करून नियम बनवले व अभ्युदय-नि:श्रेयसरूपी धर्म व अध्यात्मशास्त्र श्रृति-स्मृतींच्या रूपाने प्रचलित केले. या सर्व ऋषींचे आपल्यावर अत्यंत मोठे उपकार आहेत, हे आपण कधीच विसरता कामा नये. त्यांनी जर कष्ट केले नसते तर आज मनुष्य व इतर प्राण्यांमध्ये काहीच भेद नसता, असे मला मनापासून वाटते. सध्या समाजाची व मानवाची चालू असलेली अवनती पाहिली की हे फार जाणवते. जेव्हा आम्ही आमच्या अतिशहाणपणाने ऋषींचा अपमान करून, त्यांनी घालून दिलेले अत्यंत योग्य असे आदर्श, मागासलेपणाच्या नावाखाली पायदळी तुडवायला सुरुवात केली, कसलाही विचार न करता त्यांची टिंगलटवाळी करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच आमची भयंकर अवनती सुरू झाली हे सत्य नाकारता येणार नाही. 

ऋषींनी सगळ्याच गोष्टींना एक योग्य मर्यादा घालून दिलेली आहे. ती आपण मोडली की कुटुंबात, समाजात व पर्यायाने मानवजातीत काय उत्पात होतात, हे वेगळे दाखवायची आज गरजच नाही. रोज आपण पाहातोच आहोत उघड्या डोळ्यांनी. म्हणून वेळीच जागे होऊन आपण आपल्या या परमज्ञानी ऋषिमुनींच्या मार्गदर्शनाचे चिंतन मनन करून अखंड सुखी व्हायला पाहिजे. अशी ही भान-जाणीव निर्माण होऊन टिकावी, यासाठीच आजच्या ऋषिपंचमीचे औचित्य आहे.

श्रीनाथ संप्रदायातील प्रथम नाथयोगी, साक्षात् कविनारायणांचे अवतार असणा-या भगवान श्री मत्स्येंद्रनाथ महाराजांचा जन्म हा आजच्याच पावन तिथीला झालेला आहे. याच तिथीला शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराजांनी पूर्वसूचना देऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. श्रीसंत गजानन महाराज हे राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या परंपरेतील थोर अवतारी विभूतिमत्त्व होते. त्यांचे शेगांव येथील समाधी मंदिर संस्थान हे भारतातील काही मोजक्या आदर्श संस्थानांपैकी एक आहे. श्री दासगणू महाराजांनी रचलेल्या 'श्रीगजानन विजय' या त्यांच्या प्रासादिक चरित्रग्रंथाचे अतर्क्य अनुभव आजही असंख्य भाविकभक्तांना नेहमीच येत असतात.

ऋषिपंचमीचे आणखी एक विशेष म्हणजे, बेळगांव येथील थोर विभूती, श्रीसंत कलावती आई यांचा जन्मदिन याच तिथीला असतो. श्री कलावती आईंनी लाखो लोकांना भजनमार्गाचे पथिक बनवून फार मोठा भक्तिप्रसार केलेला आहे. आजही त्यांच्या जगभर पसरलेल्या हरिमंदिर शाखांमार्फत मोठ्या प्रमाणावर उपासना चालते. त्यांच्या शिष्या विशालाक्षी यांनी लिहिलेले "परमपूज्य आई" हे त्यांचे चरित्र परमार्थ मार्गावर चालू इच्छिणा-या भक्तांसाठी निरंतर मार्गदर्शक आहे. प्रत्येक साधकाने या चरित्राचे वारंवार मनन-चिंतन करावे इतके ते विशेष आहे. परमार्थ अंगी मुरावा असे ज्याला वाटते, त्याने अशी दिव्य संतचरित्रे नित्यवाचनातच ठेवली पाहिजेत.

आजच्या पावन दिनी सर्व ऋषिमुनींच्या व संत मंडळींच्या श्रीचरणीं विनम्रतापूर्वक दंडवत घालून आपण त्यांचे कृतज्ञता-स्मरण करू या व त्यांना अभिप्रेत असणा-या आदर्श जीवनपद्धतीनुसार आचरण करण्याचा मन:पूर्वक संकल्प करून तसे निष्ठेने वागू या. हीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली ठरेल !

भ्रमणभाष - 8888904481

Web Title: Rishi Panchami 2023: Rishi Panchami marks the birth anniversary of Mother Kalavati as well as Matsyendranath; A quick review of the life of this ascetic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.