Rituals: नाम:स्मरणासाठी जप माळेव्यतिरिक्त अन्य साधनांचा उपयोग करणे योग्य की अयोग्य? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 07:00 AM2024-07-29T07:00:00+5:302024-07-29T07:00:02+5:30

Rituals: नाम:स्मरण करा असे संतांनी देखील सांगितले आहे, पण त्यासाठी आधुनिक यांत्रिक उपकरण वापरणे योग्य ठरते का? जाणून घेऊ.

Rituals: Is it right or wrong to use tools other than chanting beads for remembrance? Read on! | Rituals: नाम:स्मरणासाठी जप माळेव्यतिरिक्त अन्य साधनांचा उपयोग करणे योग्य की अयोग्य? वाचा!

Rituals: नाम:स्मरणासाठी जप माळेव्यतिरिक्त अन्य साधनांचा उपयोग करणे योग्य की अयोग्य? वाचा!

>> अस्मिता दीक्षित (ज्योतिष अभ्यासक)

अध्यात्मातील पहिले पाऊल म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण. आज २१ वर्ष पोथी वाचूनही महाराज समजले नाहीत इतके हे अध्यात्म कठीण आहे असे मला वाटते. माझ्या सासूबाई एकदा घरी आल्या आणि म्हणाल्या अग, पोथी वाचतेस आनंदच आहे, पण जप ? तो कुठवर आलाय? त्याची सुरवात कर. काही दिवसांनी अक्षय तृतीया होती. मी त्यांना म्हंटले तेव्हापासून करते .त्या हसल्या आणि म्हणाल्या आज आपण बोलत आहोत ना? ज्या क्षणी जप करावा हा विचार मनात आलाय तोच मुहूर्त.वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज काय? मला पटले.

दुपारी जेवण झाले आणि मग म्हंटले चला जप करुया. मग मनात विचार आला चहा पिऊन करूया म्हणजे अगदी फ्रेश वाटेल. त्यानंतर घरातील कामवाली बाई आली तिला चार गोष्टी ,कामे सांगण्यात वेळ गेला. तेव्हड्यात बाहेरील एक काम आठवले म्हंटले ते आधी करून आले पाहिजे. संध्याकाळी स्वयपाक आणि प्राण गेला तरी चालेल पण TV वरच्या मालिका पहिल्याच पाहिजेत. रात्री झाली आणि चक्क झोपलेही. पण झोप लागेना काहीतरी राहून गेल्याची मनाला चुटपूट लागली. मग आठवले..जप राहिला. सासुबाईना सांगितले आहे करीन आजपासून. अगदी महाराजांवर जणू काही उपकार केले अश्या थाटात उठून माळ घेतली आणि जप केला . केला कसला अर्धवट झोपेत जांभया देत कसा तरी उरकला. पण युरेका, आपण अगदी जगावेगळे काहीतरी केले ह्या आनंदात झोपले.

दुसर्‍या दिवशी सासुबाईचा फोन ,काय ग ? त्या बोलायच्या आधीच माझे जपाचे प्रगतीपुस्तक तयार होते. होहो झाला कि. त्या अंतर्यामी होत्या, समजलं त्यांना काय ते. मग आता तुला काहीतरी बक्षीस द्यायला हवे. दुसर्‍या दिवशी त्या आल्या आणि त्यांनी मला जपाचा बोटात घालायचा COUNTER दिला. भाजी आणायला जाताना ,मालिका बघताना घालत जा हा COUNTER तोच तुला जपाची आठवण करून देईल. मी त्याना नमस्कार केला पण मनातून खजील झाले. त्यांच्याकडे बघायची सुद्धा लाज वाटली आणि आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली.पण तो दिवस माझ्या आयुष्यातील TURNING POINT होता.

श्रीगजानन विजय पारायण चालूच होते. कधी एक अध्याय तर कधी ३, ७ कधी ९ तर कधी संपूर्ण पोथी. मी माझ्या वाचनाला कधीही कसलेही निर्बंध घातले नाहीत . ऐकावे जनाचे करावे मनाचे . आजही मी माझे सर्व घर ,व्यवसाय सांभाळून पोथी वाचते. आज इतकेच वाचायचे असे काहीही नाही. पण हो, जे वाचीन ते मनापासून आणि श्रद्धेने. महाराज माझी मोरंब्याची बरणीच आहेत .त्यांना समजते मी मनापासून वाचते. वाचन आणि त्यानंतर जो अध्याय वाचला त्यावर मनन आणि चिंतन . नुसतेच वाचन उपयोगाचे नाही त्यात महाराजांनी दिलेला उपदेश अंगी बाणला, प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणला तर त्या पोथी वाचनाला अर्थ आहे नाहीतर ते एक पुस्तक वाचण्यापलीकडे काहीही नाही असे माझे मत आहे. बघा पटतंय का. 

अनेक धर्मिक ग्रंथांचे माझे वाचन चालू होते आणि त्यात मी रमत होते. पण जप ? अधेमध्ये करत होते पण इतका नाही . करावासा वाटतच नाही असेही काही नव्हते पण होत नव्हता हे मात्र निर्विवाद सत्य होते.

म्हणतात न आयुष्यात प्रत्येक गोष्टींची वेळ ठरलेली असते. माझा मुलगा तेव्हा शाळेत जात होता आणि एक दिवस अचानक १०० वरून एकदम १०४ ताप भरला आणि कमीच होत नव्हता . माझा धीर सुटत चालला होता , सगळे जण होते घरात पण मन अस्थिर झाले आणि का कोण जाणे महाराजांच्या समोर उभी राहिले, मनात खूप बोलायचे होते पण शब्द फुटेना . जपाची माळ घेतली आणि आयुष्यात कधीही इतके काहीही मनापासून केले नव्हते तितक्या मनापासून श्री गजानन जय गजानन हा जप सुरु केला. काहीही कुणाशी बोलले नाही सर्व लक्ष जपावर केंद्रित केले. पहाटे ४ वाजता ताप उतरला आणि त्या दिवसापासून पुन्हा आला नाही. डोळ्यातून अश्रू वाहू लागले ,आजही मला तो दिवस आठवतो. महाराजांच्या समोर पुन्हा उभी राहिले. मला काहीच बोलायला लागले नाही त्यांना माझ्या मनातले सर्व समजले होते. दु:ख गळयापर्यंत आल्याशिवाय देव दिसत नाही, त्याची आठवण सुद्धा होत नाही. अध्यात्मात SHORTCUT नाहीत आणि सहज तर काहीच नाही हे आज समजले. अहंकार गळून पडल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही .श्रद्धेचा , भक्तीचा अगदी कस लागतो आणि महाराज सारखी परीक्षा पाहतात .सगळे पेपर एकापेक्षा एक कठीण असतात .पण खरा भक्त त्यांच्या सगळ्या परीक्षांवर खरा उतरतो . 
त्या दिवशी मला जपाचे महत्व समजले. त्या दिवसापासून आजवर जप सोडला नाही. कुणी सांगून जप होत नसतो . सासुबाईनी मार्ग दाखवला पण त्यावर चालायचे  होते मात्र माझे मलाच. पण ह्या प्रसंगानंतर मागे वळून पहिले नाही.

कालांतराने जप कसा करावा ह्यावर बरेच वाचन आणि माझे स्वतःचेही लिखाण झाले. जपाचे महत्व मनात खोलवर रुजले. पूर्वी मी COUNTER घेवून जप करत असे .मग कधी माळ घेत असे . मी कधीही संकल्प सोडून जप केला नाही आणि केलेला जप कधी मोजलाही नाही. मनुष्य हा स्वार्थी आहे, मला काहीही देवाकडून नको असे होत नसते. आपण प्रापंचिक साधीसुधी माणसे ,इच्छा , आकांक्षा न संपणार्या आहेत. मीपण स्वार्थीच आहे कि. मला शांत मरण हवय तेही त्यांच्याच सेवेत असताना.

अनेक लेख वाचून मी ह्या निर्णयाला आले कि जप हि सुद्धा एक सर्वश्रेष्ठ सेवा आहे. प्रत्येक जण जप ,पारायण ,प्रदक्षिणा अश्या अनेक उपचारातून आपल्या गुरूंची ,आराध्याची सेवा करत असतोच ,पण जप म्हणजे मुखातून सदैव त्याचे नाम आणि ते नाम तुम्हाला आपल्या गुरूंच्या अधिक समीप नेते. जितका वेळ जप तितका वेळ तोंड बंद, म्हणजे त्या वेळात आपण कुणाशी बोलणार नाही आणि कुणी आपल्याशी . म्हणजे पहा ना कितीतरी कर्म वाचली आपली. मुखातून फक्त गुरूंचे नामस्मरण . सगळ्या आजारांवर एकच औषध आहे... नाम.

नामाची महती खूप आहे. सुरवातीला ते अत्यंत कठीण आहे. करायला सुरवात केली कि सगळे आठवते ..कपाट लावायचे आहे, कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत, तांदूळ संपले आहेत, शेजारणीने हळदीकुंकवाला बोलावले आहे ...एक ना दोन..सगळे करणे सोप्पे पण जप करायला बसूच शकत नाही तेव्हाच ते किती कठीण आहे हे जाणवते. जप म्हणजे चौफेर उधळलेल्या आपल्या मनास एका जागी स्थिर बसवणे, हे ज्याला जमले त्याला सर्व जमले. हे कठीण आहे पण अशक्य नाही आणि ह्यास हवा तो मनाचा निर्धार, दृढनिश्चय . मनच काय आपले शरीर सुद्धा एकाजागी स्थिर राहू शकत नाही. २ क्षण बसलो तरी आपल्याला जग जिंकल्याचा आनंद होतो. मग विचार करा आपले ऋषीमुनी वर्षानुवर्ष किती आणि कसा जप करत असतील. पण एकदा त्याची गोडी लागली कि त्याची मधुर फळे चाखणे हे सौभाग्यच.

माझा जपाचा कालावधी कालांतराने वाढू लागला. आता मी जपासाठी वेळ काढू लागले, जप करण्यात गोडी वाटू लागली आणि महाराजांसोबत गप्पाही वाढू लागल्या. घरातील प्रत्येक गोष्ट आज भाजी आमटी काय केली इथवर आज नवीन चादरी आणल्या इथवर सर्व गप्पा महाराजांशी होत होत्या त्या आजतागायत आहेतच. जसजसा वेळ गेला तसे कुठ्लेही जपाचे साधन न घेता जप होवू लागला. घरातील नित्याची कामे जसे झाडांना पाणी घालणे, केर काढणे , कपड्यांच्या घड्या घालणे ई करताना मनात जप होवू लागला. जप मोजून अहंकार येतो आणि मी इतका जप केला ह्यातच आपण अडकून राहतो म्हणून मी जप कधीच मोजत नाही. जप करा हे कुणी कुणावर लादू शकत नाही तो आपणहून झाला तर त्यात अर्थ आहे.

जप हा आपल्या आत्मिक समाधानासाठी , आनंदासाठी आणि अर्थात गुरुसेवेसाठी करायचा. महाराजंची सेवा करतानाचा आनंद अवर्णनीय असाच असतो त्यासाठी त्यांच्याशी मी अमुक एक केले आता मला अमुक एक द्या असे होत नाही, किबहुना ते करणेही उचित नाही. महाराजांकडे काहीच मागायची गरज नाही ते वेळ आली कि सगळे देणार आपल्याला अर्थात आपल्याला पेलेल तेच. आपण जप केल्यावर आपल्या मनाला कसे वाटते ,आपला दिवस कसा जातो ,त्यातून किती उर्जा सकारात्मकता मिळते, किती उत्चाहाने आपण आपल्या कामाला लागतो त्याचा अभ्यास करा म्हणजे समजेल कि जपाचा प्रत्येक्ष दिसून न येणारा पण होत असणारा सकारात्मक परिणाम जाणवल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच महाराजांना कुठल्याही अटींमध्ये अडकवण्यापेक्षा आपण आपला नित्याचा जप करत राहावा. माझा स्वतःचा अनुभव आहे कि ध्यानी मनी नसतानाही सर्व गोष्टी होत राहतात.

जप कसा करावा ? कुठल्या माळेवर करावा ? रुद्राक्षाच्या कि तुळशीच्या कि स्फटिकाच्या ? कुठल्या समयी करावा ? सकाळी का संध्याकाळी ?अंघोळ करूनच करावा ? 
बस ,ट्रेन मध्ये करावा ? एकाच आसनावर एकाच ठरलेल्या जागी बसून करावा का ? काहीही न खातापिता करावा कि कसे ?जपासाठी कुठले आसन घ्यावे ?ह्या आणि अश्या कित्येक न संपणार्‍या प्रश्नांत आपण फक्त गुरफटत राहतो आणि जप मात्र करायचा राहूनच जातो.वरील सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे कश्यातही अडकून न पडता श्वासागणिक जप करा . श्वास घेताना घेवू का कसा घेवू , कितीवेळा घेवू , कुठे बसून घेवू हे विचारतो का आपण कुणाला? अगदी तस्सेच श्वासागणिक जप करा ,करत राहा आणि बघा काय अद्भुत चमत्कार करतील महाराज आपल्या आयुष्यात.म्हणतात ना , केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.

वेळ कमी आहे आपल्याकडे .आपले एकेक पाऊल मृत्यूच्या दिशेने असताना नुसता विचार करण्यात वेळ घालवणे परवडणारे नाही हो आपल्याला .विचार करणे सोडून जपास प्रारंभ करा तोही आत्ता ह्या क्षणाला ...जप आपल्याला सद्गुरूंच्या समीप नेतो. तो आनंद खचितच निर्भेळ आहे. अमुक एका ग्रहाचा जप करायचा असेल तर तो निश्चित संकल्प करून माळेवर करायला लागतो कारण तिथे मोजमाप आले. पण आपल्या सद्गुरूंचा , कुलदेवतेचा जप करताना मोजमाप कश्याला ? त्यांच्या प्रेमासाठी ,सेवेसाठी आणि भक्तीसाठी आपण जप करतो. आपण जप केला असेही म्हणणे हा एक अहंकाच आहे . त्यामुळे “ महाराजांनी माझ्याकडून आज जपरूपी सेवा करून घेतली ”असे म्हणणे अधिक उचित ठरेल. 

सर्व जमेल पण जप नाही ह्यावरूनच तो किती कठीण आहे ते समजेल. नामस्मरणात सर्वात महत्वाचे आहे ते " समर्पण " .माझ्या मागील लेखातून मी लिहिलेली गोष्ट कदाचित आपल्यापैकी कुणी वाचली नसेल म्हणून पुन्हा लिहिते.

एक गृहस्थ इतका जप करत कि त्यांच्या हातावर हात ठेवला तरी त्यांच्या मनात चाललेला जप ऐकू येई. काय वर्णावी अश्या भक्ताच्या भक्तीची थोरवी आणि त्यांच्या सद्गुरु चरणाशी असलेली त्यांची निष्ठा. संपूर्ण शरणागत होवून अंतर्मनाने केलेला जप त्यांच्यापर्यंत जाणारच ह्यात दुमत नाही. अखंड नामस्मरण आपला जन्म सार्थकी लावणारच आणि सद्गती देणारच. 

मी अनेक ठिकाणी जपाबद्दल विचारलेले प्रश्न वाचते तेव्हा वाटते , आपले आपण ठरवावे . एखादा गरीब माणूस असेल आणि त्याला जप करायचा असेल आणि त्याच्याकडे आसन नसेल तर त्याने जप करायचा नाही का? असे नसते .प्रत्येक्ष महाराजांची इच्छा असेल तर अजून काय हवे ? अहो जपासाठी कुठल्याही बाह्य सोपस्कारांची गरजच नाही. जप करावासा वाटत आहे ते सर्वात महत्वाचे. दिवसभर अत्यंत कष्ट करून घाम गळून रस्त्यावरील मजूर दगड डोक्याशी घेवून एका क्षणात शांत झोपतात आणि आपण मऊमऊ गादिवर सुद्धा कूस बदलत राहतो. कालांतराने मनाला जपाची सवय लागते आणि पुढे ह्याचेच रुपांतर साधनेत होते. चराचरात भरलेल्या ह्या शक्ती आपल्या अवकलनाच्याही बाहेर आहेत, जप करुया हा विचार मनात यायलाही त्यांची कृपा लागते आणि ज्यास हि कृपा लाभली त्याने कुठलाही अन्य विचार न करता जपास प्रारंभ करावा आणि आपल्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा अनुभवत राहावा.

टीप: आजकाल तरुण पिढीत बर्‍यापैकी व्यसने , सैरभैर वागणे , वडीलधार्‍यांचा मान न राखणे आणि पैसे खर्च करणे ह्या गोष्टी बहुतांश पाहायला मिळतात. म्हणून घरात नामस्मरण केले तर वास्तूतील उर्जा सकारात्मक राहते. मुलांना लहानपणापासूनच जपाची सवय लावावी. आपण केलेले पुण्य मुलांच्याही कामी येणारच. महाराजांवर विश्वास ठेवावा आणि जप करत राहावा. जपाचा परिणाम आपल्या स्वतःवर तर होतोच पण वास्तू शुद्ध पवित्र राहते ,संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम जाणवल्याखेरीज रहात नाही. अनुभव घेवून बघा आणि कळवा. 

Web Title: Rituals: Is it right or wrong to use tools other than chanting beads for remembrance? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.