Sade Sati: आपल्या संपूर्ण आयुष्यात तीनदा साडेसाती येते; यात कोणती फलदायी आणि त्रासदायक जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 11:32 AM2023-05-26T11:32:39+5:302023-05-26T11:33:15+5:30

Sade Sati: बालपण, तारुण्य, वृद्धापकाळ या तीन टप्प्यात आपले आयुष्य विभागले आहे, यात साडेसातीचे प्रयोजन काय? वाचा. 

Sade Sati: Sade Sati occurs three times in our entire life; Find out which ones are fruitful and annoying! | Sade Sati: आपल्या संपूर्ण आयुष्यात तीनदा साडेसाती येते; यात कोणती फलदायी आणि त्रासदायक जाणून घ्या!

Sade Sati: आपल्या संपूर्ण आयुष्यात तीनदा साडेसाती येते; यात कोणती फलदायी आणि त्रासदायक जाणून घ्या!

googlenewsNext

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

ग्रहमालिकेतील सर्वात महत्वाचा ग्रह शनी ,जो शिस्तबद्ध आहे पण त्याला भावना नाहीत असे अजिबात नाही . घरात कुणाचाच धाक नसेल तर आपले आयुष्य आणि कुटुंब दिशाहीन होईल. कुणी तरी हवेच ज्याला आपण उत्तर द्यायला बांधील आहोत . अगदी तसेच शनी महाराज आहेत , त्यांचा धाक आहे म्हणून आपण जरा तरी नीट वागतो असे म्हंटले तर वावगे ठरू नये. पण म्हणून समस्त जनतेने त्यांना जे व्हिलन ठरवले आहे ते मात्र कदापि योग्य नाही. शिस्त कुणालाच नको असते आणि शिस्त लावणारा तर डोळ्यासमोर नको असतो पण ती आहे म्हणून आयुष्याला वळण आहे नाहीतर सगळीकडे अंदाधुंदी अराजकता माजली असती. 

शनी आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे. शनी महादशा किंवा शनी साडेसाती आली कि कुणीतरी जवळचे गेल्यासारखे चेहरे करून बसणाऱ्या लोकांना सांगावेसे वाटते कि तुम्ही भाग्यवान आहात कारण आता तुम्हाला साडेसाती , शनी दशा येते आहे. अजिबात घाबरू नका , शनी घ्यायला नाही तर द्यायलाच येत आहे , आपल्याला घेता आले पाहिजे . शनीला का घाबरायचे ? कारण तो आपले वाईट करणार , मोठे आजार देणार , विलंबाने बरी होणारी दुखणी , मानसिक त्रास देणार , सगळे अडथळे आयुष्यात निर्माण करणार हे आपण अगदी गृहीत धरतो आणि तिथेच चुकतो. 

शनी कुणी परका नाही तर तो आपलाच सखा आहे. शनी आणि गुरु दोघेही अध्यात्माचे , मोक्षाचे ग्रह फक्त त्यांचा मार्ग वेगवेगळा आहे . आता मोक्ष  कुणी पाहिलाय ? हाही एक प्रश्नच आहे . पण असे वागलात तर नरकात जाल आणि तसे वागलात तर मोक्ष मिळेल ह्या धाकाने तरी आपले जीवन वागणे बदलेल नाही का? 

साडेसाती चंद्राला लागते . चंद्र म्हणजेच मन . आपण केलेल्या चुका त्यांची फळे प्राप्त होण्याची वेळ म्हणजेच साडेसातीचा काळ.  आपल्या चुकांचे ओझे आपल्यालाच पेलेनासे होते आणि  म्हणून आपली झोप उडते . निद्रानाश हे साडेसातीचे पहिले पाऊल. शनी महाराज आपल्या चुकांची जाणीव करून देतात त्यातून तुम्ही सुधारलात त्या मान्य केल्यात आणि नीतीने वागलात तर बरे नाहीतर आहेच मग त्यांचा दंड .

आयुष्यभर आपण सतत दुसर्याला दोष देत असतो , अर्ध आयुष्य आपण दुसर्यांना अक्कल शिकवण्यात आणि कमी लेखण्यात घालवतो .पण आपल्या स्वतःच्या अवगुणांचे काय ? म्हणूनच साडेसाती म्हणजे सिंहावलोकन , आत्मपरीक्षण . आपल्या आत डोकावले तर वेगळ्याच विश्वाचे दर्शन घडेल जे आपल्याला करायला शनीच शिकवतो. शनी जीवनाला वळण लावतो , संकट समयी आपले कोण हे दाखवणारा शनी आहे. आपल्याला जगाची अगदी जवळून ओळख करून देणारा शनी . कष्टाची भाकर किती गोड आहे आणि इतर मार्गाने मिळवलेली लक्ष्मी कशी निषिद्ध आहे ह्याची जाणीव करून देणारा शनीच आहे . 
अहंकार ,मत्सर , सगळ्यांना पाण्यात बघणारी व्यक्ती लक्ष्मीपासून परास्त राहते त्यामुळे साडेसाती आली कि मग एकामागून एक दणके बसायला लागतात . ज्याची कधीही शक्यताही वर्तवली नव्हती त्या गोष्टी प्रत्यक्षात घडायला लागतात आणि झोप उडते . मनोमनी हे सर्व आपल्याच कुकर्माचे फळ आहे ह्याची जाणीव झाली तरी अजूनही शनीवर त्याचे खापर फोडणे मात्र आपले चालूच असते . अररे किती सांगावे , किती बोलावे पण शहाण्याला सुद्धा न कळावे हि खरीच शोकांतिका  म्हणावी .अश्यांना पळता भुई थोडी झाली नाही तरच नवल . चुका करताना आपल्याला शनीची आठवण येत नाही मग आता कश्याला भीती वाटायला हवी . इतका माज आहे ना ? मग भोगायला सुद्धा तयार रहा.

ह्या उलट जे नम्र आहेत त्यांचे आयुष्य शनी एका वेगळ्याच उंचीवर नेतो . परदेशगमन , विवाह , नोकरी , उच्च शिक्षण ,पद ,नवीन वस्तूचा लाभ . एक ना दोन अश्या सर्व गोष्टी शनी प्रदान करतो तोही मुक्त हस्ताने. हे बक्षीस असते चांगले वागल्याचे आणि पुढेही चांगले वागत राहण्याचे. म्हणून शनीला कर्मदाता म्हंटले आहे. जसे कर्म तसे फळ .

आपला आजचा जन्म हे आपले वास्तव असले तरी ह्याही आधी आपण अनेकदा जन्म घेतला आहे  आणि त्या प्रत्येक जन्मात कर्म केले आहे अर्थात चांगले आणि वाईट . त्या सर्वाची फळे भोगण्यासाठी मग पुढील जन्म घेत राहिलो आहोत . म्हणूनच आता ह्या सगळ्याची जाणीव झाल्यावर निदान उरलेला जन्म तरी चांगली कर्म करण्यात घालावूया , काय पटतय का? त्यांनी माझा अपमान केला मग मी आता त्याचा करणार हि शृंखला आपणच मोडली पाहिजे . जावूदे त्याचे कर्म त्याच्यापाशी पण मी नाही माझे कर्म वाढवणार असा विचार करून आपले जीवन चुकीच्या कर्मापासून वाचवू शकतो.

शनी महादशा आली किंवा साडेसाती तर आपण जगणे सोडून देणार का? श्वास घ्यायचा बंद करणार का? नाही ना? उलट शनी दशा साडेसाती आली तर उपासना वाढवावी ,तशीही ती वाढतेच . उत्तम उपासक शनी राहुच्याच दशेत तयार होतात .

काही गोष्टी लक्ष्यात ठेवण्यासारख्या आहेत त्या म्हणजे  गोचरीचा शनी मूळ शनीवरून किंवा समोरून जाताना त्रासदायक परिस्थिती असते अनेक आव्हाने समोर येत राहतात . शनी जर पत्रिकेत षष्ठ स्थानात असेल तर विलंबी आजार होतात आणि ते तुम्हाला अगदी स्मशानापर्यंत नेतात . पण षष्ठ स्थान हे रोजच्या कर्माचे स्थान आहे आणि शनी तुमच्या कर्माचा हिशोब ठेवणारा त्यामुळे तुम्ही रोजचे कर्म उत्तम केलेत तर शनीचा दुष्परिणाम कमी होयील असा उदात्त विचार का नाही करत आपण. घरातील समाजातील आबाल वृद्धांची सेवा , उपासना , आपण बरे आपले काम बरे , दान ह्यासारख्या गोष्टी आपले आयुष्य सुकर करतात .सर्वात मुख्य म्हणजे आपला अहंकार , त्याच्यावर अंकुश ठेवता आला पाहिजे. म्हंटले आहेच अहंकारं बलं दर्पं, कामं क्रोधं च संश्रिताः . अहंकार हा सर्वार्थाने विनाशास कारणीभूत ठरतो. 

शनी केतू , शनी चंद्र , शनी राहू , शनी मंगळ , शनी रवी ह्या युती पत्रिकेत काहीतरी परिणाम करणारच ते आपले प्रारब्ध आहे पण म्हणून आपण जगायचे सोडून देत नाही ना . शनी महाराज आपल्या निकट आहेत आणि त्यांची आपल्या प्रत्येक कृतीवर पूर्ण दृष्टी आहे ह्याचा विसर पडू दिला नाही तर अनेक अनर्थ टळतील, नाही का?

सगळे आहे पण मनाची शांतता नाही , झोप नाही हि अवस्था शनीच करू शकतो . म्हणूनच वृद्धांची सेवा ,चतुर्थ श्रेणीतील लोकांना भूतदया दाखवणे ह्यात सातत्य बाळगावे . सर्वप्रथम मी काय तो एकता शहाणा आणि इतर मूर्ख असे वागणे सोडून द्यावे . कुणाच्याही व्यंगावर किंवा आर्थिक स्थितीवर हसू नये , कुणालाही कमी लेखू नये कारण पुढील वळणावर आपल्या आयुष्यात काय आहे हे आपल्याला सुद्धा माहित नाही . 

1 .अहंकारं त्यागावा 
2 .मंगळवारी मारुतीचे दर्शन घ्यावे .
3 .मंदिरात शनी किंवा मारुतीच्या चेहऱ्याकडे न बघता चरणा कडे बघून नतमस्तक व्हावे 
4 .कणकेचा दिवा ( 11 शनिवार चढते आणि 11 शनिवार उतरते ) मारुतीच्या मंदिरात लावावा.
5 .ओं शं शनैश्चराय नमः जप करावा
6. एका मातीच्या पणतीत तेल भरून घ्यावे आणि त्यात आपला चेहरा एक मिनिट न्याहालावा . नंतर ते तेल मारुतीच्या मंदिरात समई असते त्यात घालावे . आपली पिडा त्यात जळेल . तिथे जाऊन चुकूनही मारुतीच्या डोक्यावर ते तेल ओतू नये. 
7. हनुमान चालीसा नित्य पठण करावे 
8. वागण्यातील ताठा सोडून द्यावा .
9. अपंग , वृद्ध मंडळी ह्यांची सेवा करावी .
10. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. 

शनी हेच अंतिम सत्य आहे हे विसरून चालणार नाही . आपल्या सर्वांवर शनी महाराजांची असीम कृपा राहूदे हीच प्रार्थना . 
ओं शं शनैश्चराय नमः

Web Title: Sade Sati: Sade Sati occurs three times in our entire life; Find out which ones are fruitful and annoying!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.