ध्यान करताना नको ते विचार मनात येतात; तेव्हा काय करायचं?... श्री शिवकृपानंद स्वामींनी दिला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 10:01 AM2021-08-05T10:01:33+5:302021-08-05T10:06:31+5:30
Sadguru Shri Shivkripananda Swami : सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आत्महत्या रोखण्याची ताकदही ध्यानधारणेत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. स्वामीजींनी नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली.
कोरोनाचं संकट, नकारात्मक वातावरण, अनिश्चितता, भीती अशा काळात ध्यानधारणा, योगासनं मनाला आधार देऊ शकतात. पण, ध्यानधारणा नव्याने सुरू करणाऱ्यांना एक प्रश्न कायम सतावतो. अनेक वेळा ध्यान करायला बसलं, की आपल्या मनात अनेक विचार यायला लागतात. बरेच प्रयत्न करूनही ते विचार डोक्यातून जात नाहीत. कारण कुणीच आपले विचार थांबवू शकत नाही. मग ध्यान करताना नेमकं काय करायला हवं? ते नेमकं कसं करावं?, हे अनेकांना समजत नाही. या विषयाबाबत सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामी यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आत्महत्या रोखण्याची ताकदही ध्यानधारणेत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. स्वामीजींनी नुकतीच लोकमत कार्यालयाला भेट दिली.
लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामी यांची मुलाखत घेतली आहे. त्याच मुलाखतीचा हा सारांश...
प्रश्न - आपल्याला सद्गुरू म्हणावं की गुरू म्हणावं?
उत्तर - साधारण आपल्याला ज्ञान देतो तो गुरू असतो. ज्ञान अनेक जण देतात. त्यामुळे अनेक जण गुरू असतात. परंतु, सद्गुरू एकच असतो, असं माझं मत आहे.
प्रश्न - ध्यान करताना नेमकं काय करायचं?
उत्तर - काहीजण ध्यान करायला बसतात. मात्र ध्यान करत असताना त्यांच्या मनात अनेक विचार येतात. हे विचार थांबवण्याचा प्रयत्न ते करतात. मात्र असं करू नका. कुणीही आपले विचार थांबवू शकत नाही. विचार येतात, त्यांना येऊ द्या. ते नंतर आपोआप बंद होतील.
प्रश्न - ध्यान करत असताना नको त्या गोष्टी मनात येतात, असं का होतं?
उत्तर - विहिरीत शांत आणि स्वच्छ पाणी असतं. पण विहीर स्वच्छ करायला घेतली तर त्याच विहिरीतून खूप घाण निघते. अनेक विविध जून्या वस्तू सापडतात. लोक ध्यानातून विचारांना रोखतात ती खूप मोठी चूक आहे. विचार येऊ द्या. काहीच हरकत नाही.
प्रश्न - योगाचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे ध्यान आणि योग यात नेमका फरक काय?
उत्तर - योगासन हा काही योग नाही. योगाचे आता व्यावसायीकरण झालं आहे. अनेक वेळा जे लोक योग शिकवतात त्यांच्याकडे काहीच ज्ञान नसल्याचे दिसून येतं. मात्र ते व्यवसायासाठी योग शिकवतात. पोट भरण्यासाठी योग शिकवतात.
प्रश्न - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून मंदिरं बंद आहे. यावर तुम्ही काय सांगाल?
उत्तर - कोरोनाकाळात माणुसकीचा देव समोर आला. कोरोनाने दोन गोष्टी शिकवल्या.
पहिली म्हणजे, सर्व मनुष्य समान आहेत आणि दूसरी म्हणजे सकारात्मक विचार. ध्यान तुम्हाला पॉझिटिव्ह बनवतं.
प्रश्न - शेतकरी आत्महत्या करतात. त्यांना आत्महत्या करण्यापासून ध्यान परावृत्त करू शकतं का?
उत्तर - नक्कीच. ध्यान आत्महत्या करण्यापासून रोखू शकतं. कारण जे लोक ध्यान करतात त्यांना कधीच एकटं असं वाटत नाही. ध्यान करणारे कितीही दूर गेले तरी त्यांना एकटं वाटत नाही. त्यामुळे रोज ३० मिनिटं ध्यान केल्यानं positive enegry मिळेल. त्यामुळे आत्महत्येचा विचार येणार नाही.
प्रश्न - तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल?
उत्तर - तरुणांनी देखील ध्यान केलं पाहिजे. सुरुवातील जास्त वेळ जमणार नाही. मात्र हळूहळू सर्व होईल. आज माझ्याकडे काम करणारे सर्व तरुण आहेत. वाहन चालकांपासून माझ्याकडे तरुण आहेत. तरुणांकडे जास्त ज्ञान असतं आणि हे आपल्याला मानायला हवं.
प्रश्न - ध्यान नेमकं कसं करायचं?
उत्तर - ध्यान करणाऱ्यांच्या सान्निध्यात आपण राहिलो तर आपोआप ध्यान होतं. ध्यान मंत्रावर आधारित असतं. उजवा हात डोक्याच्या मध्यभागी ठेवा आणि डोळे बंद करा. ३० मिनिटं ध्यान करा.
मंत्र - मी एक पवित्र आत्मा आहे, मी एक शुद्ध आत्मा आहे!
प्रार्थना - हे परमात्मा, कृपया मला आत्मसाधना प्रदान करा!
मंत्र आणि प्रार्थना मनात म्हणत राहा!
(या मुलाखतीचा व्हिडिओ आणि सविस्तर मुलाखत लवकरच...)