'हपापाचा माल गपापा' या म्हणीचा साधू बाबांनी शिकवला नेमका अर्थ!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:50 PM2021-07-29T16:50:50+5:302021-07-29T16:50:50+5:30
मेहनतीची कमाई अंगी लागते, वरची कमाई बाहेरचा मार्ग शोधत निघून जाते!
'हपापाचा माल गपापा' ही म्हण आपण बरेचदा ऐकली असेल. या म्हणीचा अर्थ असा, की चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा, संपत्ती तो माणूस उपभोगू शकत नाहीच, तर दुसराच कोणीतरी येऊन तो पैसा घेऊन जातो. तुम्ही म्हणाल, आम्ही तर चांगल्या मार्गाने पैसा कमावतो, तरी कधी कधी दवाखाने, कोर्ट कचेरी, जागेची खरेदी विक्री यात पाण्यासारखा खर्च होतो, असे का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट शेवट्पर्यंत वाचावी लागेल.
एक तरुण मुलगा एका कंपनीत नोकरी करत होता. नोकरीला लागून पाच वर्षे होत आली तरी पगारवाढ होईना. नवीन नोकरी शोधावी तर नोकरीही मिळेना. तो दिवसरात्र पगार वाढीचा विचार करू लागला. त्या विचाराने तो आजारी पडू लागला. अशक्त झाला. ही चिंता त्याला अंतर्बाह्य पोखरू लागली. एक वेळ तर अशी आली की त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले. औषधोपचार झाले. तो तात्पुरता बरा झाला. दवाखान्यातून घरी येतो न येतो तर दुसऱ्या दुखण्याने डोके वर काढले. असे करत जवळपास सहा महिने त्याच्या दवाखान्याच्या वाऱ्या सुरू होत्या आणि त्यात पाण्यासारखा पैसा वाया जात होता.
तो पूर्वीपेक्षा अधिकच कष्टी झाला. त्याला कोणीतरी एका साधू बाबांना भेटायला सांगितले. तरुणाला वाटले, नाहीतरी सध्या दुसरा पर्याय दिसत नाही, त्यांना भेटून पाहू. ते काय म्हणतात हे ऐकून घेऊ. असे ठरवून त्याने साधू बाबांची भेट घेतली आणि त्यांना सगळे वृत्त सविस्तर कथन केले. साधू बाबा म्हणाले, 'तुझा पगार किती?'
तो म्हणाला '२०,०००'
साधू बाबा म्हणाले, 'येत्या महिन्यापासून कंपनीला सांगून तुझा पगार १८,००० करून घे. तुझी सगळी दुखणी थांबतील.'
एवढे बोलून साधू बाबांनी मौन धारण केले. तरुणाला कळेना, दुखण्याचा आणि पगाराचा काय संबंध? पण ते म्हणाले आहेत तर प्रयोग करून पाहावा का? अशा विचाराने त्याने कंपनीला पत्र लिहिले आणि दोन हजारांचे नुकसान पत्करून १८००० पगार घ्यायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य? चार महिन्यात तो तंदरुस्त झाला आणि त्याने येऊन साधू बाबांचे पाय धरले. आपले पूर्वायुष्य परत मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. आणि त्याचवेळेस शंका विचारली, 'साधू बाबा माझ्या पगाराचा आणि आरोग्याचा संबंध कसा जुळवलात ते सांगाल का?'
साधू बाबा हसून म्हणाले, 'लेका, तू तुझ्या कंपनीत १८००० चे काम करत होतास आणि २००० रुपये फुकटचे घेत होतास. तेच पैसे आल्या पावली निघून गेले.जी मेहनतीची कमाई असते तीच अंगी लागते, बाकीची कमाई बाहेरचे मार्ग आपोआप शोधते. म्हणून यापुढे एक तर तू जेवढा पगार घेतोस तेवढी मेहनत कर, नाहीतर जेवढी मेहनत करतोस तेवढाच पगार घे, म्हणजे नसती दुखणी मागे लागणार नाहीत!'