'असा' मोलाचा सल्ला देणारे साधू महाराज आपल्यालाही भेटत राहिले पाहिजे!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 06:25 PM2021-09-28T18:25:07+5:302021-09-28T18:25:30+5:30
क्रोधाचा एक क्षण सावरता आला, तर पश्चात्तापाचे असंख्य क्षण टाळता येतात.
असे म्हणतात, की राग येत असेल तर मनातल्या मनात १०० आकडे मोजा आणि रागाच्या भरात एखादी कृती करणार असाल, तर १००० आकडे मोजा. थोडक्यात रागाच्या क्षणी प्रतिक्रिया देण्याआधी दोन क्षण थांबा...त्यामुळे परिस्थिती बदलेल, राग निवळेल आणि हातून चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत.
स्वातंत्र्यपूर्व काळातली ही गोष्ट आहे. एक तरुण आपल्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून परदेशातील खलाशाची नोकरी पत्करतो. बायको आणि आपले कुटुंब मागे ठेवून परदेश गाठतो. खूप मेहनत घेतो. वेळच्या वेळी घरी पैसे पाठवतो. पत्र, टेलिफोन या माध्यमातून घरच्यांची चौकशी करतो. असे करत जवळपास १५ वर्षे उलटतात. आपल्या परिश्रमातून तो बऱ्यापैकी श्रीमंत माणूस बनतो. आणि एक दिवस जहाजातून प्रवास करत तो मायदेशी परतण्याचे ठरवतो.
त्या प्रवासात त्याला एक साधू भेटतात. हा त्यांना आपली यशोगाथा ऐकवतो. त्यावर साधू त्याचे कौतुक करत म्हणतात, 'तुझे यश टिकून राहावे असे वाटत असेल तर एक सल्ला देतो, तो आयुष्यभर लक्षात ठेव. कितीही राग आला तरी दोन क्षण थांब आणि मगच व्यक्त हो!'
यशासाठी १५ वर्षे झटलेला तो तरुण खांदे उडवत साधूबाबाला देखल्या देवा दंडवत घालतो. प्रवास पूर्ण होतो. वायूवेगाने तो घरी पोहोचतो. आई वडिलांची भेट घेतो. बायको झोपली आहे कळल्यावर, दबकत पावले टाकत खोलीत जातो आणि तिथे पाहतो तर काय, आपली बायको परपुरुषाबरोबर झोपली आहे. क्षणात विचारांचे चक्र उलट्या दिशेने फिरू लागते. आपल्या कुटुंबासाठी आपण झटलो आणि आपल्या अपरोक्ष आपल्या बायकोने दुसऱ्या पुरुषाशी.... आणि आई वडिलांना काहीच हरकत नाही? रागाच्या भरात तो दरवाज्याला टेकू म्हणून ठेवलेला दगड उचलतो आणि तो दगड त्या दोघांच्या डोक्यात घालणार, तोच त्याला साधू बाबांचे शब्द आठवतात आणि तो दोन क्षण थांबतो. दोन पावले मागे सरकतो. त्याच्या धक्याने कपाटावर आघात होतो आणि त्या आवाजाने त्याची बायको आणि तो पुरुष उठतो.
बायको आश्चर्यचकित होऊन आनंदाने नवऱ्याला मिठी मारते आणि तो पुरुषही धावत येऊन आलिंगन देतो. रागाच्या भरात तो तरुण त्या दोघांना दूर करतो. तेवढ्यात त्या पुरूषाची पगडी खाली पडते आणि मोठे केस सुटतात. ते पाहून तरुण आश्चर्यचकित होतो, कारण पगडी घातलेली व्यक्ती पुरुष नसून कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी पुरुषाचा वेष घेतलेली त्याची सख्खी धाकटी बहीण असते.
तो तरुण त्या दोघींचे पाय धरून क्षमा मागतो आणि आपल्या अपराधी मनाची कबुली देतो व त्याचवेळेस मनोमन साधूबाबांचे आभार मानतो. ते दोन क्षण तो थांबला नसता, तर त्याच्या उज्वल भविष्याचे क्षणात मातेरे झाले असते. पण त्याने साधूबाबांची शिकवण अंमलात आणली, त्यामुळे त्याचे मोठे नुकसान टळले. यासाठीच म्हणतात, क्रोधाचा एक क्षण सावरता आला, तर पश्चात्तापाचे असंख्य क्षण टाळता येतात.