तोचि साधु ओळखावा.. देव तेथेचि जाणावा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:00 PM2020-07-26T17:00:41+5:302020-07-26T17:00:55+5:30

साधु पुरुष हे दीनवत्सल असतात. ते दीन व्यक्तिंनांही आपल्या जवळ करतात."

That sadhu should be known .. God should know there! | तोचि साधु ओळखावा.. देव तेथेचि जाणावा !

तोचि साधु ओळखावा.. देव तेथेचि जाणावा !

googlenewsNext

 

 श्लोकार्थ-  " जे लोक देवांना, जसे भजतात, तसे देव सुध्दा छाये प्रमाणे त्याचे लोकांना फळ देतात. देव हे कर्माच्या अधीन असतात, मात्र साधु पुरुष हे दीनवत्सल असतात. ते दीन व्यक्तिंनांही आपल्या जवळ करतात."
       
        एकदा भगवान श्रीकृष्णाचे पिताश्री श्री वसुदेवांकडे  नारदमुनींचे आगमन झाले. त्यावेळी श्री वसुदेवांनी नारदांचे साधु मुनी म्हणून स्वागत केले व आपल्या सारखे खरे साधु कसे दीनवत्सल असतात या विनम्र भावनेतून वसुदेवांनी वरील भाष्य केले.
          चातुर्मासास सुरुवात झाली आहे. आजही लोक आपआपल्या परिने चातुर्मासात भजन कीर्तन, पुजा पठण, उपवासादि कर्मे करतात. तथापि यज्ञयागादि कर्मे आता लुप्तप्राय झाली आहेत. 
          फार पुर्वी यज्ञयागादि कर्मे मोठ्या प्रमाणात होतअसत. यज्ञयागाव्दारे वेगवेगळ्या देवांना प्रसन्न केले जायचे. श्री एकनाथी भागवता मध्ये श्रीमद्  भागवताचे अकराव्या स्कंधावर श्री एकनाथ महाराजांनी प्राकृतामध्ये निरुपण केले आहे. ते म्हणतात,
         जे लोक यज्ञाने ज्याप्रकारे अनेक देवांना तृप्त करीत असतात, त्यांना ते देव प्रसन्न होवून तशी फळेही देतात. जर भजत नाहीत तर असंतुष्ट होवून विघ्नेही आणतात. महाराज रुपकाने सांगतात की, सूर्य  जसजसा वर येतो तसतशी माणसाची सावलीही जवळ येते. तसे यज्ञयागादि भजन कर्माने देवही जवळ येतात, प्रसन्न होतात, कृपाही करतात. परंतु सूर्य मावळला की छाया जशी लुप्त होते, तसे मनुष्याकडून  जर अभजन झाले, तर देवांची कृपाही लुप्त होते. अवकृपाही होते.
          ही कथा तर छोट्या देव देवतांची झाली. पण एकनाथ महाराज मोठे विनोदाने मार्मिक भाष्य करणारे संत. ते म्हणतात, हे छोटे देवांचे जाऊ द्या, जो मोठा देव आहे ना ! तो सुध्दा जीव घेतल्याशिवाय प्रसन्न होत नाही. येथे जीव घेणे म्हणजे जीवाने आपली जीवरुप अवस्था संपवून शिवरुप अवस्था प्राप्त केल्याशिवाय कुणालाही देव भेटत नाही. अन् भेटला की तर त्याच्या घरी जन्माला सुध्दा येतो, गर्भवास सोसतो. वसुदेवांचा हा स्वानुभव आहे. भगवान श्रीकृष्णांनी देवकीचे उदरी गर्भवास सोसला. त्यांचे कुळात जन्म घेतला. वसुदेव देवकीचे जन्मोजन्मीचे सुकृत, म्हणूनच देवांची त्यांचेवर प्रसन्नता झाली. या उलट देव अभक्ताचे घरी चुकूनही जात नाही.
                लहान देव असो की की मोठा देव असाे, दोन्ही देव जणु कंडिशनल आहेत.  शर्त आहे भक्तीची. भक्ती नसेल तर मनुष्या विषयी नकारात्मक भावही ठेवतात. परंतु वसुदेव म्हणतात, सत्पुरुष, साधु पुरुष हे अनकंडिशनल प्रेमभाव ठेवतात. दीन वत्सल भाव ठेवतात. दीन म्हणजे जो परिस्थितीने संसारात असहाय आहे, दुःखी आहे, ज्याला दुःखाचे प्राप्त स्थितीत मदतीची खरोखर गरज आहे.  त्याचे दुःखावर फुंकर जरुरी आहे. फुंकर राजनैतिक नाही वत्सल भावनेची फुंकर. जी दुःखाची दग्धता दूर करुन सुखाची शितलता देईल.  वत्सल शब्द वत्स पासून येतो. वत्स म्हणजे बालक. जे असहाय असते त्याचेवर आई जसा वात्सल्य भाव ठेवते, त्याप्रमाणे वात्सल्य भाव दीनाविषयी दिनवत्सल साधु ठेवतात.  भक्त काय अभक्त काय, जोही दीन अाहे, त्याला साधु  जवळ करतात. जवळ करतात अर्थात आपल्या पवित्र, पुण्यमय प्रेम व करुणेच्या शितल छायेने त्यांची दुःख दूर करतात. दुःखाचे मूळच दूर करतात. 
             या ठिकाणी तुकोबारायांचा प्रसिध्द अभंग जुळून येतो.
       जे कां रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपले ॥
        तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥

खरा देव तर तेा आहे जो  दीन वत्सल आहे. जो रंजल्या गांजलेल्यांना आपले मानतो. हे आत्मिय भावनेचे मानने आहे. अनकंडिशनल. कोणतीही अट नाही. वाल्याचा वाल्मिक करण्यात नारदांची कोणतीही अट नव्हती. वाल्या गरीब डाकु. पण गरीबीचे दुःखामुळे डाकु झाला. नारदाचीच हत्या करायला निघाला होता. पण नारदांनी त्याला आपलेसे केले. आपले पावित्र्य वाल्यात ओतले व परम शुध्दीला पोहचविले. डाकु ॠषि झाला.
            म्हणून खरे तेच  महान पुरुष आहेत, साधु आहेत, जे दीन वत्सल असतात, करुणाकर असतात. खरे देवही तेच असतात, जे रंजल्या गांजल्यांचे दुःख दूर  करतात.

-   शं.ना.बेंडे अकोला.

Web Title: That sadhu should be known .. God should know there!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.