Safala Ekadashi 2022: सफला एकादशीनिमित्त भगवान विष्णूंचा जप करताना 'या' गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 07:00 AM2022-12-19T07:00:00+5:302022-12-19T07:00:01+5:30
Safala Ekadashi 2022: अनेक जण एकादशीचा उपास करतात, ज्यांना ते शक्य नाही ते उपासना करतात. त्या उपासनेचा एक भाग म्हणजे जप. जाणून घ्या त्याचे नियम!
'जप'तो, त्याला भगवंत 'जपतो', असे म्हणतात. भगवंताच्या नाम:स्मरणाचे जीभेला आणि मनाला वळण लागावे, म्हणून जप केला जातो. भगवंताच्या नामाचा पुनरुच्चार आणि मन एकाग्र करायला लावणे, हा त्यामागील विचार असतो. जप केल्यामुळे आचारही शुद्ध होतो.
जपाची सवय का लावावी, याचे उत्तर शोधायचे, तर संत सोयरोबानाथ यांच्या अभंगाच्या ओळी आठवतात,
हरिभजनाविण काळ घालवू नको रे,
अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे।।
चांगल्या गोष्टी आपोआप घडत नाहीत, त्या घडवाव्या लागतात. तशाच चांगल्या सवयी आपोआप लागत नाहीत, त्या लावाव्या लागतात. प्रापंचिक माणसाच्या मुखात नाम:स्मरण सहजासहजी येत नाही, ते जाणीवपूर्वक घ्यावे लागते. ती सवय लावण्याचे माध्यम म्हणजे 'जप.' जपाच्या माळेत १०८ मणी असतात. त्या संख्येगणिक नाम घेत असताना किमान एखादवेळेस तरी मनापासून नाम निघावे, हा उद्देश असतो.
जप कसा करावा?
जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या पेरावर माळ धरून अंगठ्याने तिचे मणी आपल्याकडे ओढायचे असतात. माळेतील मण्यांची झीज होऊ नये, म्हणून ते आपटणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मेरूमणी येताच माला विरुद्ध बाजूने मोजण्यास सुरू करावी.
एका व्यक्तीची माळ दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये. माळ जपण्यापूर्वी आणि वापरून झाल्यावर माळेला नमस्कार करावा. पवित्र ठिकाणी जपमाळ ठेवावी. शक्यतो एखाद्या कापडी पिशवीतून किंवा डबीतून जपमाळ ठेवावी. जपमाळेची संख्या एकाएक न वाढवता, क्रमाक्रमाने वाढवावी. मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. शुद्ध मनाने नाम:स्मरण घ्यावे. जप करताना मन शांत व्हावे, यासाठी शांत परिसराची निवड करावी. सुखासनात बसून डोळे मिटून जप करावा.
आपल्याला एक वाईट खोड असते, ती म्हणजे नाम:स्मरण सुरू करताच जपमाळेकडे पाहण्याची. जेमतेम दहा मणी ओलांडून होत नाही, तो आपले लक्ष जपमाळेकडे जाते. याचा अर्थ, आपले मन नाम:स्मरणात नसून केवळ सोपस्कारात अडकले आहे. जपसाधनेचा संबंध पाप-पुण्याशी नसून, आपल्या आचार-विचारांशी निगडित आहे. म्हणून त्या सरावाला 'जपसाधना' म्हटले जाते. ज्याप्रमाणे एखादे सुभाषित, श्लोक, कविता, गाणे पाठ होण्यासाठी आपण शंभर वेळा घोकमपट्टी करतो, तसेच भगवंन्नाम मुखोद्गत होण्यासाठी १०८ संख्या सुनिश्चित केली आहे. जपसाधनेत एवढ्यावर थांबणे अपेक्षित नसून, ही सुुरुवात आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे आपणही संख्येत अडकून न राहता, मेरुमणी हाताला लागेपर्यंत अखंड नाम:स्मरण घेत राहावे.
ऊँ नमो भगवते वासुदेवाय.