संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 12:28 PM2020-12-05T12:28:26+5:302020-12-05T12:28:54+5:30

ज्ञानेशवरांचे थोरले बंधू व सद्गुरुनाथ निवृत्ती यांचा हा अभंग फार महत्त्वाचा आहे. यात ते आपला नाथपंथीय वारसा सांगत आहेत. पण नाथपंथातील हटयोगापेक्षा गुरुभक्ती, शिवशक्तीऐक्य, सर्व जाति जमातींना प्रवेश व ईश्वरावर नि:सीम व निर्हेतुक प्रेम हे विशेष निवृत्तीनाथांना त्यांच्या गुरुंकडून मिळाले.

Saint Dnyaneshwar had taken yoga lessons before Namasmarana! | संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

संत ज्ञानेश्वरांनी नामस्मरणाआधी घेतले होते योगसाधनेचे धडे!

googlenewsNext

ज्ञानेश्वर महाराज हे खरे नाथपंथीय संतश्रेष्ठ होत. हा पंथ आदिनाथ शिब, उमानाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तिनाथ या परंपरेने ज्ञाननाथ म्हणजे ज्ञानेश्वरांपर्यंत येऊन पोहोचला. एका गुहेमध्ये निवृत्तीनाथ गेले असताना, त्यांच्यावर गहिनीनाथांनी कृपा केली आणि हा नाथपंथाचा धागा ज्ञानेश्वरांकडून वाढत गेला. ज्ञानेश्वर, सत्यामलनाथ, शिवदिननाथ, केसरीनाथपासून तो आताच्या स्वरूपानंद व माधवनाथ यांच्यापर्यंत प्रसारित झाला. नाथपंथ हा खरे पाहता योगसंप्रदाय. ज्ञानेश्वरांच्या आपेगाव येथील घराण्यावर नाथपंथाचा प्रभाव होता.

परंतु, या ठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित होतो, की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना जो उपदेश केला, तो कोणता होता? योगमार्गाचा की नामस्मरणाचा? योग व भक्ती हे मार्ग थोडे भिन्न आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सहाव्या अध्यायात योगमार्ग व कुंडलिनीचे उत्थापन यांचे मोठे काव्यमय वर्णन केले आहे. त्यांचे अनेक अभंगही योगपर आहेत.

हेही वाचा : पुनश्च पांडुरंग भेटीचा आनंद आणि वारकरी झाले भजनात दंग!

म्हणून ज्ञानेश्वरांना व निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी जो उपदेश दिला, तो योगमार्गाचा की भक्तिमार्गाचा, या प्रश्नाचे उत्तर निवृत्तीनाथांनी लिहिलेल्या अभंगातून शोधण्याचा प्रयत्न करू. 

आदिनाथ उमाबीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहस्थिती।
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गयनीनाथा।
विरक्तीचे पात्र अन्वयाचे सुख, देऊनि सम्यक अनन्यता।
निवृत्ती गयनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्णनामे।

ज्ञानेशवरांचे थोरले बंधू व सद्गुरुनाथ निवृत्ती यांचा हा अभंग फार महत्त्वाचा आहे. यात ते आपला नाथपंथीय वारसा सांगत आहेत. पण नाथपंथातील हटयोगापेक्षा गुरुभक्ती, शिवशक्तीऐक्य, सर्व जाति जमातींना प्रवेश व ईश्वरावर नि:सीम व निर्हेतुक प्रेम हे विशेष निवृत्तीनाथांना त्यांच्या गुरुंकडून मिळाले. गोरक्षनाथांनाही मच्छिंद्रनाथांकडून प्रेममुद्रा मिळाली. असे निवृत्तीनाथ सांगतात. हाच धागा गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना देऊन तो बळकट करण्यास सांगितले. निवृत्तीनाथ स्वत:च म्हणतात की, आमचे कुळ हे पावन कृष्णनामे।

या ठिकाणी हे ध्यानात घेतले पाहिजे की, नाथपंथातील एक थोर नाथ मच्छिंद्र हे विष्णूचे अवतार होते. तेव्हा विष्णूची म्हणजे कृष्णाची, म्हणजेच विठ्ठलाची उपासना परिपुष्ट झाली, असे म्हणावयास हरकत नाही. योगमार्गापेक्षा हा मार्ग सर्वसमान्यांना साधा व सरळ वाटणारा आहे. निवृत्तीनाथांनी या प्रममार्गाचा उल्लेख आपल्या अभंगात अनेक ठिकाणी केला आहे. नाम मुखी सदा तोचि पै भाग्याचा, रामकृष्णमंत्र जनासी उद्धार आणिक साचार मार्ग नाही. प्रत्य विष्णुमूर्ती वाट पाहे नित्य, अशी अनेक उदाहरणे देता येतील. शिवाय पंढरी, चंद्रभागा, पुंडलीक, नंदाचा बाळ, गोपाळांमध्ये खेळणारे कृष्णरूप, मेघसावळा कृष्ण असे उल्लेख निवृत्तीनाथ करतात.

हेही वाचा :दैवत जागृत असते, की आपण? 

Web Title: Saint Dnyaneshwar had taken yoga lessons before Namasmarana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.