जिवंतपणी मृत्यूचा अनुभव कसा असतो, हे संत नामदेव महाराजांनी अभंगात सांगितले आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 05:27 PM2021-07-14T17:27:09+5:302021-07-14T17:27:29+5:30
नामदेव म्हणतात की आपले सद्गुरु विसोबा खेचर यांच्याकडून देहात असतानाच मरण्याची विद्या शिकून त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला आहे.
असे म्हणतात, की मृत्यनंतरही इच्छा शिल्लक असतील, तर पुन्हा जन्म आणि जिवंत असताना इच्छा संपल्या तर मोक्ष मिळतो. मात्र आपल्या इच्छांची यादी एवढी मोठी असते की एका जन्मात काही ती पूर्ण होत नाही. परंतु संतांनी त्या इच्छांना, वासनांना मुरड घातली, म्हणूनच ते जन्म मरणाचा फेरा संपवून मोक्ष पदाला पोहोचू शकले. हे ज्ञान त्यांना कसे अवगत झाले, याबद्दल खुलासा करताना संत नामदेव एके ठिकाणी लिहितात-
मनुष्यशरीराची घटक असणारी पंचतत्त्वे विघटित होणे म्हणजेच शरीर मृत होणे. नामदेव म्हणतात की आपले सद्गुरु विसोबा खेचर यांच्याकडून देहात असतानाच मरण्याची विद्या शिकून त्यांनी मृत्यूवर विजय मिळवला आहे.
आपप तेज वायू पृथिवी गगन,
मेले ते कवण पंचामध्ये।।
आम्हा मरण नाही मरशील काई,
आत्मवस्तु पाही श्रीगुरुमुखे।।
जिताची मरण आलेसे हाता,
मरण बोलता लाज नये।।
खेचर विसा म्हणे आम्हा मरण नाही,
कैसे मरण पाही आले नाम्या।।
देहाची पाच तत्त्वे जेव्हा मूळ पाच तत्त्वात अर्थात पंचमहाभूतात परत जाऊन मिळतात तेव्हा माणसाला मरण येते. तथापि मी मृत्यूपलिकडे गेलो आहे. मला कसे काय मरण येईल? गुरुदत्त नामाने मला आपले आत्मस्वरूप उमजले आहे. मी तर जिवंतपणेच मरायला शिकलो आहे. त्यामुळे आता मला मरणाची भीती वाटत नाही. आम्ही आमचे मरण स्वत:च पाहिले आहे. तेव्हा आमच्यासाठी मरण उरलेच नाही.
अशी स्थिती प्राप्त होणे सर्वसामान्य माणसासाठी कठीण असले तरी अशक्य नाही. यासाठी संत उपाय सुचवतात,
विषय उपेक्षूनि, अनुभव लक्षूनि,
आत्मपदी वस रे, मानस नारायण भज रे।।
विषयातून आपली सुटका होणार नसली, तरी अलिप्त नक्कीच होता येईल. त्यासाठी मन भगवंत नामात गुंतवायला हवे. एकदा प्रभुपदाची गोडी लागली, की इतर विषय त्यासमोर गौण वाटू लागतील व आपल्यालाही मृत्यूचे भय राहणार नाही.