संतकवी दासगणू महाराज यांची आज पुण्यतिथि,साईभक्त अशी त्यांची ओळख; जाणून घेऊया त्यांचे कार्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 07:00 AM2024-11-28T07:00:00+5:302024-11-28T07:00:02+5:30
पोलिस खात्यात नोकरी करून अध्यात्माची वाट धरत परमपदाला पोहोचलेले दासगणू महाराज यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेऊया.
गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज यांची आज २८ नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी आहे. हे मराठी संत, कवी व कीर्तनकार होते. दास गणू महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणून ओळखतात.महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले. १९६२ मध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला तो आजचा दिवस!
दासगणू महाराज साईबाबा यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगस्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा. ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या रूपात पाहत. दासगणू महाराज हेच साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष होते, अशी माहितीही मिळते. त्यांनी लिहिलेली शिर्डी संस्थानाचा महिना वाचण्यासारखा आहे.
प्रपंच परमार्थाची सांगड घालत ते आजच्या तिथीला प्रभुपदाशी लीन कसे झाले त्याचे वर्णन करणारे दासगणू महाराज लिखित काव्य -
कीर्तनातुन दंभावर केला प्रहार ।
केला शुद्ध भक्तीचा प्रसार ।।
सहस्त्रनामाची करुनी ती साधना
केली विष्णुसहस्त्रनामबोधिनी टिका।।
चांगदेव पासष्टी , नारद भक्तसुत्रास गुंफीले भक्तीच्या धाग्यात ।
शांडिल्यसुत्र, गौडपादविवरण।
ईशावास्यास रचलेली ओव्यात ।।
नारदीय किर्तन परंपरेची
राखली आस ।
रचुनी संतांचे अख्यान ।।
ठेविला देह चंद्रभागेच्या तिरी ।
मन असे सदैव आपले गोदातटावरी।।
गायली संत चरित्रे कीर्तनासी ।
आचार्य वर्णिले महाकाव्यासी ।
तत्वज्ञान आचरणुन सांगितले भाष्यग्रंथासी।
नमन करतो आधुनिक महिपती
दासगणुसी सदा वरदकर
असावा आपला माझ्यावरती ।।
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
आज कार्तिक वद्य त्रयोदशी, संतकवी श्री दासगणु महाराज यांची पुण्यतिथी पू.दादांच्या चरणी साष्टांग दंडवत!