चर्म व्यवसाय करूनही भगवंताची प्राप्ती करता येते, हा आदर्श घालून देणारे संत रोहिदास यांची ५ फेब्रुवारी रोजी जयंती!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 02:38 PM2023-02-04T14:38:04+5:302023-02-04T14:38:20+5:30
माघ पौर्णिमा ही संत रोहिदास यांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते, कोणताही व्यवसाय कमी लेखू नये हे त्यांनी आपल्या कर्मातून दाखवून दिले!
पंधराव्या सोेळाव्या शतकातील रोहिदास हे एक मोठे संत म्हणून ओळखले जातात. हे चर्मकार असून रवीदास, रैदास या नावानेही प्रसिद्ध होते. राजघराण्यातील स्त्री मीराबाई, ही यांची शिष्या असल्यामुळे रोहिदासांची महती वाढली. रोहिदासांनी अनेक पदे लिहिली आहेत. शिखांच्या 'ग्रंथसाहेबा'तही यांची सुमारे चाळीस पदे आहेत. वर्णबाह्य असल्याकारणाने त्यांना लौकिक शिक्षण मिळाले नव्हते, पण साधुसंतांच्या संगतीत ते आत्मज्ञानी झाले. आपल्या व्यवसायास अनुसरून ते एका पद्यात म्हणतात,
ज्यांहा देखो वांहा चामही चाम,
चामके मंदिर बोलत राम।
चामकी गऊ चामका बचडा,
चामही धुने चामही ठाडा।
चामका हाती चामका राजा,
चामके उंटपर चामका बाजा।
कहत रोहिदास सुनो कबीर भाई,
चाम बिना देह किनकी बनाई।।
रोहिदास म्हणतात की, मी चर्मकार असूनही ईश्वराची भक्ती करतो. मला तर जेथे पहावे तेथे चामडे दिसून येते. चामड्याच्याच शरीररूपी मंदिरात राम विराजमान झाला आह़े चामड्याची गाय व वासरूही चामड्याचेच. सर्वत्र चामडेच पसरले आहे. राजा चामड्याचा आणि हत्तीही चामड्याचाच. उंटसुद्धा चामड्याचाच आणि त्याच्यावर ठेवलेले वाद्यही चामड्यानेच मढवले आहे. त्या चर्माशिवाय देह कसा बनणार?
या एका पदात रोहिदास महत्त्वाचा सिद्धान्त सांगत आहेत. मानवी शरीर कोणत्याही जातीचे असले तरी, त्यात अस्थी, मांस, चरबी सर्वत्र सारखीच असते. रक्ताचे प्रकार वेगळे असले तरी, सर्व जातीत ते आढळतात. शरीररचना सर्वांची सारखी असते. मग भेद आला कुठून? कर्मावरून विटाळ मानणे कितपत योग्य आहे? जा प्रश्न चोखोबांनी विचारला होता. परमात्मा या सर्वापलीकडे आहे. हाच सर्व संतांचा निष्कर्ष आहे.