संत श्री रविदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 10:45 AM2020-12-21T10:45:14+5:302020-12-21T10:45:35+5:30

साधु संतांची जात विचारु नये तर त्यांचे ज्ञान जाणावे.

Saint Sri Ravidas | संत श्री रविदास

संत श्री रविदास

googlenewsNext

  पंधराव्या शतकात राजस्थान मध्ये अवतार कार्य करणारे महान संत रविदास यांची आज पुण्यतिथी. संतश्रेष्ठ मीरा व महान योध्दा व श्रेष्ठ राजा राणा सांगाचे गुरु हे संत रविदास होते. संत कबीरजी म्हणतात,  जाती न पुछो साधु की, पुछो साधु का ज्ञान. साधु संतांची जात विचारु नये तर त्यांचे ज्ञान जाणावे. आधी असा काळ होता की  अमुक साधु, अमुक संत हे  कोण्या जातीचे आहेत असे विचारले  जात होते. त्यावरच कबीरजींचा दोहा आहे. मात्र आता हा काळ वेगळाच आला आहे. खरे तर कलियुग प्रभावाने जाती विहिनतेचा प्रभाव येणे सुरुच झाले होते. मात्र वर्तमान राजनैतिक प्रभावाने आम्ही या संताचे जातीचे आहेात अशी मनुष्यात प्रौढी आली आहे.
             संत रविदासांची अभंगवाणी भारतभर प्रसिध्द आहे, त्यांचा हा बोधप्रद दोहा आहे.

       म्रिग मीन भ्रिंग पतंग कुंजर एक दोख बिनास ॥
        पंच दोख असाध जा महि ता की केतक आस 
        माधो अबिदिआ हित कीन ॥ 
        बिबेक दीप मलीन ॥१॥ 

              मृग हरिण, मीन अर्थात मासा, भ्रिंग अर्थात भुंगा, पंतग कीडा व कुंजर म्हणजे हत्ती हे पांच प्राणी पांच विकाराने बाधीत आहेत. जसे मृग हरिण ध्वनी श्रवण विकाराने. असे म्हणतात, पुर्वी हरिण पकडणारे विशिष्ट मधुर ध्वनी काढायचे. त्या ध्वनीला मोहित होऊन हरिण ध्वनीचे दिशेने धावत यायचे. त्यावेळी शिकारी त्याला पकडायचे. मासा हा खाद्याचे लोभात आमिषाला बळी पडून काटयात अडकतो, भुंगा हा फुलाचा गंध घेतो, गंध विषयात गुंततो.
त्यामुळे तो कमळ फुलांत अडकून पडतो. पतंग हा रात्री दुृष्टीने प्रकाश पाहून दिव्यावर झडप घेऊन मृत्युमुखी पडतो, तर हत्ती हा कामुकतेत वेडा होतो. श्रवण, गंध, रस, रुप व स्पर्श हे पाच विषय आहेत. संत रविदास म्हणतात, हे पंच गुण वरील पशु मध्ये तर एक एकच आहे, ज्यापायी त्यांचा नाश होतो. पण मनुष्यामध्ये तर हे पांचही इंद्रिय विकार आहेत. तेव्हा अशा असाध्य विषयांपासून मनुष्याचे जीवनाची आस कशी सुरक्षित, जीवनाविषयीचा बोध कसा सुरक्षीत असेल ?  रविदास म्हणतात, देवा या  अविधि जगण्याने कोणाचे हित झाले ?  विधी म्हणजे परमेश्वराचा कायदा समजणे, परमेश्वराचे कार्य समजणे. त्याला समजून जगणे  ही विधी व त्याला न समजणे ही अविधी. त्यातही मनुष्याचा विवेक दीप मलीन असेल, तर हा विधी समजणे नाही. विवेकाचे प्रकाशातच विधीचे ज्ञान आहे. विवेकाचे जगणेच मनुष्याला कळले नाही  तर मग  बोधाची आशाच नाही राहिली. जीवनात मग अंधार आहे, अधःपातच आहे.
    
                त्रिगद जोनि अचेत समभव पुंन पाप असोच ॥
                मानुखा अवतार दुलभ तिही संगति पोच ॥२॥
               जीअ जंत जहा जहा लगु करम के बसि जाइ ॥
                काल फास अबध लागे कछु न चलै उपाइ ॥३॥

 मनुष्य योनी सोडून उर्वरित त्रिगद जोनि म्हणजे तीन प्रकारच्या योनी, त्या म्हणजे पशु, पक्षी व जीवजंतु ह्या अबोध आहेत, अचेत आहेत. त्यांचेत पुण्य व पाप काय त्याची जाणीव त्यांना नाही. माणूस जन्म, माणसाचा अवतार हा दुर्लभ आहे. त्याचेकडे बोध क्षमता आहे. तरीही  पशुपक्षी वा जीवजंतु प्रमाणे तोही पाप पुण्याविषयी फार सोच ठेवीत नाही , फार सचेत असत नाही.
जीव जंतु कर्म करीत राहतात व काळाचा फाॅंस त्यांचे गळयात अबध, अवश्य पडत राहतो.  ज्याचा काही उपाय नाही.

     रविदास दास उदास तजु भ्रमु तपन तपु गुर गिआन ॥
      भगत जन भै हरन परमानंद करहु निदान ॥४॥

               संत रविदास उदास चित्ताने अर्थात वैराग्य भावाने उपदेश करतात की,  मनुष्याने सांसारिक भ्रम  जाणावा. हे जाणणे म्हणजे तप आहे. या तपाला श्रेष्ठता येते ती गुरुंचे ज्ञानाने. म्हणून सदगुरुला शरण जावे.
               शेवटी रविदास म्हणतात,  कर्माचा फास जो पशु पक्षी वा जीव जंतु यांचे प्रमाणे  माणसाचेही गळ्यात पडतो, त्याचे निदान, त्याचा उपाय म्हणजे भक्त जनांचे भय हरण करणारा परमानंद आहे. ज्याची प्राप्ती गुरुज्ञानामध्ये आहे 


महान संत रविदास यांचे पुण्यस्मरण दिनी त्यांना श्रध्दा नमन !
                                         

- शं.ना.बेंडे पाटील अकोला

Web Title: Saint Sri Ravidas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.