संत ज्ञानेश्वरांचे कनिष्ठ बंधू सोपानदेव यांचा समाधी दिन; सासवड येथे आहे समाधी स्थळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 07:59 AM2024-01-09T07:59:22+5:302024-01-09T08:03:41+5:30
सोपानदेवांच्या स्नानासाठी खुद्द पांडुरंगाने सर्व तीर्थ प्रगट केली, त्या समाधी सोहळ्याचे वर्णन करताना संत नामदेव लिहितात...
>> रोहन उपळेकर
आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे कनिष्ठ बंधू व शिष्योत्तम, साक्षात् ब्रह्मदेवांचे अवतार सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांची समाधी तिथी. श्रीसंत तुकोबारायांच्या चौदा टाळकऱ्यांपैकी त्यांचे एक शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे-तेली यांचीही आज पुण्यतिथी. श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्व महान शक्तिपाताचार्य योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांची आज जयंती. आजची तिथी मोठी पुण्यपावनच आहे !
सद्गुरु श्री सोपानदेव महाराज हे श्री माउलींचे धाकटे बंधू व शिष्य. त्यांचा जन्म इ.स. १२७७ मध्ये कार्तिक पौर्णिमेला आळंदीत झाला. त्यांनी देखील गीतेवर 'सोपानदेवी' या नावाची टीका रचलेली आहे. त्यांचे काही अभंगही उपलब्ध आहेत. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांचे स्वभाववैशिष्ट्य श्री नामदेवराय सांगतात, "न ये पां एकांत सोपानाचा ॥" सगळ्यांमध्ये राहूनही आंतरिक एकांत साधणे व त्या स्थितीत सदैव राहणे हे श्री सोपानदेवांचे वैशिष्ट्य होते.
आजच्याच तिथीला त्यांनी सासवड येथे क-हामाईच्या काठी सोमेश्वरांच्या मंदिरालगत समाधी घेतली. त्यांच्या समाधिवर्णनाच्या अभंगांमध्ये श्री नामदेवराय म्हणतात,
" निशिदिनी कीर्तन केले द्वादशी । वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष ॥३॥
भोगावती केले अवघ्यांनी स्नान । चालिले सोपान समाधीसी ॥ना.गा.११३२.४॥"
श्री सोपानदेवांच्या स्नानासाठी प्रत्यक्ष श्रीपांडुरंगांनी सर्व तीर्थांना आवाहन केले. त्यावेळी त्रैलोक्यातील यच्चयावत् सर्व तीर्थे कऱ्हेच्या काठावरील एका कुंडात प्रकटली व त्या पावन जलाने सोपानदेवांना स्वत: भगवंतांनी स्नान घातले. ते कुंड आजही सासवड येथे मंदिरासमोरच पाहायला मिळते. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांच्या चरणीं साष्टांग दंडवत.
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या थोर शिष्यांपैकी एक, देहूनजीकच्या सुदुंब्रे येथील तेली समाजातील श्री संताजी महाराज जगनाडे यांचीही आज पुण्यतिथी असते. संताजी महाराजांनी स्वहस्ते लिहिलेला श्री तुकोबारायांचा गाथा आजही पाहायला मिळतो. श्री तुकाराम महाराजांच्या चौदा निष्ठावंत टाळकरी मंडळींमध्ये संताजी महाराजही होते. त्यांच्याही श्रीचरणीं सादर दंडवत.