मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे; जाणून घ्या समर्थ रामदास स्वामींच्या श्लोकातले मर्म!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 11:50 AM2021-12-09T11:50:32+5:302021-12-09T11:50:51+5:30
आपल्या मरणाने कोणाच्या डोळ्यात आपसूक पाणी आलं, तर ती आपली खरी कमाई. ते वैभव बघायला आपले डोळे उघडे नसतील, पण जमलेले लोक आपली श्रीमंती बघून नक्कीच हेवा करतील.
मृत्यू, एक अटळ घटना. जी प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारच आहे, तरी आपण ती स्वीकारत नाही. उलट मरणाच्या भीतीने बऱ्याचदा जगणं सोडून देतो. याउलट जे लोक प्रत्येक दिवस शेवटचा असं समजून जगतात, ते आयुष्याचा भरभरून आनंद घेतात.
अर्थात, हे तत्वज्ञान वाचायला सोपं आणि जगायला कठीण आहे. नीट विचार केला, तर आपल्या लक्षात येईल, की आपण स्वतःच्या मृत्यूला जितके घाबरत नाही, तितके आपल्या आप्त जनांच्या मृत्यूला घाबरतो. त्यांच्या नंतर आपलं काय, हा विचार जास्त क्लेशदायक असतो. पण दुःखाचा आवेग ओसरला, की आयुष्य पूर्व पदावर येतं आणि पुढे मागे आपणही या प्रवासाचे प्रवासी होतो.
आपला मृत्यू आपण स्वीकारला नाही, तरी तो येणारच आहे, कधी ते माहीत नाही, पण येणार हे नक्की! ज्योतिष असो वा विज्ञान मृत्यूची पूर्वकल्पना देऊ शकत नाही. अशात आपल्या हाती राहतं, ते जीवनाचा भरभरून आस्वाद घेणं. दुःखं, संकटं येतच राहणार, वाईट घटना घडतच राहणार, पण खरा कस तेव्हा लागतो, जेव्हा आपण सहजतेने त्यांचा स्वीकार करतो. नव्हे, तो करावाच लागतो.
प्रत्येक कलाकार कार्यक्रमाआधी आपले सादरीकरण कसे होईल याचा पूर्व विचार करतो आणि त्यादृष्टीने तयारी करतो. तशी तयारी या शेवटच्या कार्यक्रमाची आपण केली पाहिजे. शेवटचा शो हिट झाला पाहिजे, असं वाटत असेल, तर संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचावं लागतं.
अंत्य यात्रेत किती गर्दी होती, यावरून गेलेल्या व्यक्तीची लोकप्रियता कळते. आता आपल्या वेळी किती डोकी जमतील, याचा हिशोब आपण करायला हवा. जसा कठीण पेपर गेल्यावर किमान पास होण्यापूरते मार्क आपल्याला मिळतील की नाही, याचा आपण हिशोब करतो, अगदी तसा! म्हणजे उर्वरित पेपरवर चांगला जोर मारता येतो.
आपल्या पश्चात कोणी चांगलं बोललं नाही, तरी चालेल, पण कोणी वाईट बोलता कामा नये, यासाठी आपली वागणूक आतापासून सुधारायला हवी. अशा वेळी बाबांचा मंत्र आठवतो, कोणी मित्र नसलं तरी चालेल, पण एकही शत्रू नको! मनुष्य चांगल्या चारित्र्याचे सर्टिफिकेट लोकांकडून मिळावे, यासाठीच आयुष्यभर खस्ता खात असतो.
आपण जे कमावतो, त्यापैकी आपल्या सोबत काहीच येणार नाही. हे सत्य स्वीकारून उर्वरित आयुष्यात लोकांसाठी किती आणि स्वतः साठी किती जगायचं, याचं गुणोत्तर ठरवायला हवं. आपल्या पश्चात आपण लोकांकडे फक्त चांगल्या आठवणींचा ठेवा देऊन जाऊ शकतो. बाकी गोष्टी चेक इन होताना यमराज काढून घेतात. त्यामुळे अपेक्षांचं लगेज वेळीच कमी केलेलं बरं!
लिहिण्यासारखं काहीतरी करून जा किंवा जाण्यापूर्वी काहीतरी लिहून जा, असं कोणीतरी म्हटलेलं आहे. यापैकी आपली कॅटेगरी लक्षात ठेवून कामाला लागायला हवं.
आपल्या मरणाने कोणाच्या डोळ्यात आपसूक पाणी आलं, तर ती आपली खरी कमाई. ते वैभव बघायला आपले डोळे उघडे नसतील, पण जमलेले लोक आपली श्रीमंती बघून नक्कीच हेवा करतील. प्रत्येकाला जायचं तर आहेच, मग मरेपर्यंत दिलखुलास जगा आणि जगू द्या!