डोळे उलगडतात आयुष्यातील अनेक रहस्यं; असं ओळखा समोरच्या व्यक्तीचं खरं चरित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 11:16 PM2022-03-29T23:16:58+5:302022-03-29T23:24:46+5:30
हृदयातील अनेक गोष्टी डोळे सहज पणे बोलत असतात. चला तर सामुद्रिक शास्त्रानुसार, जाणून घेऊयात की, डोळे माणसांची कोण कोणती रहस्यं उलगडतात.
सामुद्रिक शास्त्रानुसार (Samudrik shastra), डोळे हे हृदयातील सर्व रहस्ये उघड करत असतात. एखाद्या व्यक्तीचे डोळे पाहून त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते. डोळ्यांच्या आकारांबरोबरच त्यांच्या रंगांवरूनही माणसाचे चरित्र ओळखता येते. हृदयातील अनेक गोष्टी डोळे सहज पणे बोलत असतात. चला तर सामुद्रिक शास्त्रानुसार, जाणून घेऊयात की, डोळे माणसांची कोण कोणती रहस्यं उलगडतात.
काळे डोळे -
काळे डोळे असलेल्या लोकांचा आत्मविश्वास अत्यंत मजबूत असतो. असे लोक कुणाचीही फसवणूक करत नाहीत. तसेच अशा डोळ्यांच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्वही काहीसे वेगळे असते. याशिवाय, काळे डोळे असलेले लोक आपली जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडतात. आपल्या मेहनतीने ते उच्च पदेही मिळवतात.
तपकिरी डोळे -
तपकिरी डोळे असलेल्या लोकांना त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगायला आवडते. त्यांना त्यांच्या आयुष्यात इतरांची ढवळाढवळ आवडत नाही. खरे तर हे लोक खूप उदार मानले जातात. असे डोळे असलेले फार चटकन लोकांत मिसळून जातात. त्यांना दरवेळी काहीतरी नवीन करावेसे वाटते. असे लोक अत्यंत आकर्षक असतात. मात्र, विषय जेव्हा प्रेमाचा येतो, तेव्हा यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. याशिवाय, या लोकांना कुठल्याही स्थितीत आनंदी राहायला आवडते.
हिरवे डोळे -
ज्या लोकांचे डोळे हिरवे असतात ते अतिशय गंभीर स्वभावाचे असतात. असे लोक नेहमी फिट आणि फ्रेश असतात. हे लोक आपल्या मनातील गोष्टी लवकर कुणालाही सांगत नाहीत. महत्वाचे म्हणजे, अशा लोकांत हुशारीने निर्णय घेण्याची क्षमता असते.
निळे डोळे -
असे डोळे असलेले लोक आयुष्यात अत्यंत स्थिर असतात. हे लोक इतरांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात. अशा लोकांना शांत जीवन जगायला आवडते.