Samudrik Shastra: हात-पायाला सहा बोटं असणारे दुर्मिळ तरी असतात खूपच भाग्यवान!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 03:40 PM2023-06-05T15:40:42+5:302023-06-05T15:41:06+5:30
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हाताला किंवा पायाला असलेले अतिरिक्त बोट भाग्याचे लक्षण मानले जाते, कसे ते जाणून घ्या!
'कहो ना प्यार है' हा सिनेमा आला तेव्हा ह्रितिक रोशनच्या अभिनयापेक्षा त्याच्या सहाव्या बोटाचीच जास्त चर्चा झाली होती. वास्तविक पाहता सबंध सिनेमाभर ते बोट लपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर ह्रितिकच्या चाहत्यांना त्याच्या सहाव्या बोटाबद्दल कधीच वावगे वाटले नाही. समुद्र शास्त्र देखील हेच सांगते. हाताला किंवा पायाला सहावे बोट असणे यात वेगळे वाटून घेण्याचे कारण नाही, उलट अशा लोकांबद्दल समुद्र शास्त्राचे भाकीत काही वेगळेच सांगते.
सामुद्रिक शास्त्रानुसार सहावे बोट असणारे लोक बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तीक्ष्ण बुद्धीचे मानले जातात. असे लोक सर्व क्षेत्रात यश मिळवतात. या लोकांची काम करण्याची क्षमता इतरांपेक्षा अधिक असते. शिकण्याची, समजून घेण्याची क्षमता त्यांच्याकडे जास्त असते. त्यामुळे या लोकांना करिअर मध्ये खूप फायदा होतो.
या लोकांना एकापेक्षा अधिक क्षेत्रात काम करायची आवड असल्याने त्यांची द्विधा मनःस्थिती असते. मात्र हे लोक हाती घेतलेल्या कामाला पूर्ण न्याय देतात. त्यांचे काम लोकांकडून वाखाणले जाते.
या लोकांना प्रवासाची आवड असते. त्यांना मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने पैसे कमवायला आवडतात. असे लोक चांगले खेळाडू आणि कलाकार देखील सिद्ध होतात. त्यांच्यात अभिनयाचे गुण अंगभूत असतात.
सामुद्रिक शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्या लोकांच्या हाताच्या किंवा पायाच्या करंगळीजवळ अतिरिक्त बोट असते, त्यांच्यावर बुध पर्वताचा प्रभाव जास्त असतो. याउलट ज्या लोकांच्या अंगठ्याजवळ अतिरिक्त बोट असते, त्यांच्यावर शुक्र पर्वताचा प्रभाव जास्त असतो. यामुळे यांच्या बाबतीत बुद्धी, कला, गुण यांचा अजिबात अभाव नसतो.
म्हणून तुमच्या ओळखीत कोणाला सहावे बोट असेल तर त्याला उपेक्षू नका किंवा चिडवू नका. उलट ते वैगुण्याचे कारण नसून नशीबवान असण्याचे लक्षण आहे असे समजा.