जानेवारीत दुसऱ्यांदा आली आहे संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या, चंद्रोदयाची वेळ आणि व्रताची महती!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 30, 2021 06:44 PM2021-01-30T18:44:41+5:302021-01-30T18:45:04+5:30
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे लाडके दैवत. त्याची उपासना म्हणून अनेक जण कळत्या वयापासून संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा उपास भक्तीभावाने करतात. गणपतीची पूजा अर्चा करून, रात्री चंद्रोदय झाल्यावर आरती म्हणून, मोदकांचा नैवेद्य दाखवून उपास सोडतात.
यंदा वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २ जानेवारीला संकष्टी चतुर्थी होती आणि आता वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या अखेरीला अर्थात ३१ जानेवारीला पुन्हा संकष्टी चतुर्थी आली आहे. महिन्यातून दोनदा चतुर्थी क्वचितच येते. ही स्थिती तिथींचा क्षय झाल्यामुळे येते. याचा परिणाम असा, की फेब्रुवारी महिन्यात एकही संकष्टी येणार नसून थेट २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थी येणार आहे. दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जन्म असणार आहे.
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे लाडके दैवत. त्याची उपासना म्हणून अनेक जण कळत्या वयापासून संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा उपास भक्तीभावाने करतात. गणपतीची पूजा अर्चा करून, रात्री चंद्रोदय झाल्यावर आरती म्हणून, मोदकांचा नैवेद्य दाखवून उपास सोडतात.
पौष महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तिळकुटा चतुर्थीदेखील म्हटले जाते. याच मासात मकरसंक्रांतीचा उत्सव असल्याने रथसप्तमीपर्यंत तीळगुळाला विशेष महत्त्व असते. म्हणून संकष्टीच्या नैवेद्याला बाप्पाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच या निमित्ताने तीळ गुळाचे दानही केले जाते.
संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे आगळे वेगळे महत्त्व आहे.
- मुलांच्या प्रगतीसाठी, दीर्घायुष्यासाठी अनेक पालक संकष्टीचे व्रत करतात. एवढेच काय, तर खुद्द यशोदा मय्याने कृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्यात म्हणून संकष्टीचे व्रत केले होते.
- गणपती हा मंगलमूर्ती आहे. म्हणून त्याची उपासना करणाऱ्या व्यक्तीचे अमंगल होत नाही, अशी धारणा आहे.
- भावभक्तीने हे व्रत केल्यामुळे ग्रहदशा सुधारते व अनिष्ट ग्रहस्थिती असल्यास बाप्पाच्या कृपाशिर्वादाचे पाठबळ मिळते.
- संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे घरात मंगलमय वातावरण राहते. तसेच मंगल कार्यांना गती मिळते.
संकष्टी चतुर्थीची पूजा विधी
- ३१ जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी आहे. सकाळी लवकर उठून स्नान करावे.
- शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा.
- अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
- रात्री चंद्रोदयाची वेळ पहावी आणि धूप दीप लावून गणपतीच्या मूर्तीसमोर नैवेद्य आणि पाण्याचा पेला ठेवावा.
- चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाचे फुलं आणि दूर्वा वाहून उपास सोडावा.
संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ
मुंबई २१.०४ सोलापूर २०.५३
ठाणे २१.०३ नागपूर २०.३६
पुणे २१.०० अमरावती २०.४२
रत्नागिरी २१.०४ अकोला २०.४६
कोल्हापूर २१.०० औरंगाबाद २०.५३
सातार २१.०० भुसावळ २०.५०
नाशिक २१.०० परभणी २०.४८
अहमदनगर २०.५६ नांदेड २०.४५
पणजी २१. ०३ उस्मानाबाद २०.५२
धुळे २०.५५ भंडारा २०.३४
जळगाव २०.५१ चंद्रपूर २०.३७
वर्धा २०.३९ बुलढाणा २०.४९
यवतमाळ २०.४१ इंदौर २०.४९
बीड २०.५२ ग्वाल्हेर २०.३६
सांगली २०.५९ बेळगाव २१.००
सावंतवाडी २१.०३ मालवण २१.०४