Sankashti Chaturthi 2022: संकष्टीला जुळून येत आहे सर्वार्थ सिद्धी योग; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 02:05 PM2022-06-16T14:05:44+5:302022-06-16T14:06:10+5:30
Sankashti Chaturthi 2022: संकष्टीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. या योगात केलेली पूजा आणि शुभ कार्य अनेक शुभ फळ देते.
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि मनोभावे गणपतीची पूजा केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. यंदा संकष्ट चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने संकष्टीचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.
संकष्ट चतुर्थी ही बाप्पाची आवडती तिथी! जून महिन्यात १७ तारखेला शुक्रवारी संकष्ट चतुर्थी येत आहे. बाप्पा हा सुखकर्ता आणि दुःखंहर्ता आहेच! म्हणून आपण त्याही उपासना करतो आणि यश मिळावे अशी प्रार्थना करतो. यासाठीच हे संकष्टीचे व्रतही मनोभावे केले जाते. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे या संकष्टीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. या योगात केलेली पूजा आणि शुभ कार्य अनेक शुभ फळ देते. बाप्पाकडून यश, सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो!. त्यासाठी आपण शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊ.
शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय :
संकष्ट चतुर्थी तिथी १७ जून रोजी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवार, १८ जून रोजी पहाटे २. ५९ मिनिटांनी समाप्त होईल. याच दिवशी म्हणजे, १७ तारखेला सकाळी ९.५६ ते १८ जून रोजी पहाटे ५.०३ पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल. १७ जून रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.२५ पर्यंत अभिजात योग आहे. या काळात केलेल्या पूजेला विशेष महत्त्व असते. तसेच या व्रताची पूर्तता चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय पूर्ण होत नाही. चंद्रोदयाची वेळ रात्री १०. ०३ मिनिटांची असेल.
पूजा विधी :
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर आंघोळ करून संकष्टी चतुर्थीचे व्रतसुरु करावे. उपास करावा देवपूजा करावी. त्यानंतर शुभ मुहूर्तावर बाप्पाला अभिषेक करावा. चंदन टिळा, मोदक, फळे, फुले, वस्त्र, धूप, दीप, गंध, अक्षत, दुर्वा इत्यादी अर्पण करा. अथर्वशीर्षाचे पठण किंवा श्रावण करा. चतुर्थीच्या व्रताची कथा ऐका. शेवटी गणेशाची आरती करा. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्ध्य देऊन गणपतीची आरती म्हणा आणि जेवणाच्या ताटाचा नैवेद्य दाखवून उपास सोडा.
सर्वार्थ सिद्धी योगाचा लाभ व्हावा म्हणून :
वर दिल्यानुसार दुपारी अभिजात मुहूर्तावर बाप्पाला अभिषेक घालणे शक्य नसल्यास निदान त्या तासाभरात 'ओम गं गणपतये नमः' हा जप करा. त्यासाठी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. ऑफिसमध्ये जपमाळ नेणे शक्य नसेल तर बोटाच्या पेरांवर मोजून जप करा. पण या सर्वार्थ सिद्धी योगाचा लाभ अवश्य घ्या! बाप्पा मोरया...