Sankashti Chaturthi 2022 : संकष्ट चतुर्थीला दुर्वांचे 'हे' उपाय आर्थिक अडचणींवर नक्की प्रभावी ठरतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:52 PM2022-05-19T12:52:25+5:302022-05-19T12:53:33+5:30
Sankashti Chaturthi 2022: दुर्वा असो नाहीतर, तुळशी, बिल्व पत्र; परमेश्वाराला ठराविक संख्येत ते वाहिले जातात आणि त्यामुळे काय परिणाम साधतो ते जाणून घ्या!
गुरुवार, १९ मे रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक प्रार्थना करतात. तसेच उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात. तसेच बाप्पाच्या आवडत्या वस्तू, पदार्थ अर्पण केल्या जातात. या सर्व उपचारामुळे बाप्पा प्रसन्न होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
बाप्पाच्या आवडत्या दुर्वांशिवाय गणेश पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून जेव्हा जेव्हा गृहप्रवेश, मुंज, विवाह इत्यादी शुभ कार्य केली जातात तेव्हा गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात. याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेतही दुर्वा वापरतात. या दिवशी दुर्वाचे काही उपाय खूप चमत्कारिक ठरतात. चला जाणून घेऊया या चमत्कारिक उपायांबद्दल.
उपाय जाणून घेण्याआधी दुर्वा वाहण्याबद्दल थोडेसे: गणेश पूजेत दुर्वा, विष्णू पूजेत तसेच सत्य नारायण पूजेत तुळशी दल, शंकराला बिल्व पत्राचा अभिषेक कशासाठी? तर त्यानिमित्ताने पूजेत आपले लक्ष केंद्रित व्हावे आणि मन स्थिर व्हावे. आपण गवताला दुर्वा म्हणत नाही, तर गवतातून निवडलेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला अर्पण करतो. याचाच अर्थ हे काम अतिशय मन लावून करायचे आहे. मन एकदा का शांत आणि एकाग्र झाले की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि चमत्कारही आपोआप घडतात. यासाठीच हे पुढील उपाय...
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरण्याच्या पद्धती:
- जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दूर्वामध्ये दोऱ्याला ११ गाठी घालून तो दुर्वांचा छोटासा हार बाप्पाला अर्पण करावा. असे केल्याने आर्थिक संकटातून लवकर सुटका होते.
- आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला लावा. असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.
- ज्योतिष शास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गायीला चारा तसेच दुर्वा खाऊ घाला. असे केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेमभावना वाढते.
- गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला २१ दुर्वांचे त्रिदल अर्पण करा. त्याबरोबर अथर्व शीर्षाची २१ आवर्तने म्हणा किंवा श्रवण करा. त्यामुळेदेखील गणेशकृपा प्राप्त होते.
- गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही. उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते, असे मानले जाते.
- बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात ११ दुर्वांच्या जुडी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो आणि गणेश कृपा होते.