Sankashti Chaturthi 2023: संकष्टीच्या उपासाला जोड द्या उपासनेची, आवर्जून म्हणावेत असे खास 'गणेश मंत्र!'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 01:12 PM2023-02-09T13:12:46+5:302023-02-09T13:13:12+5:30
Sankashthi Chaturthi 2023: बाप्पाची आपण भक्ती भावाने पूजा करतोच, पण त्याच्या चरणी काही क्षण मन एकाग्र व्हावे यासाठी पुढील मंत्रांची मदत होईल हे नक्की!
आज ९ फेब्रुवारी, गुरुवार आणि संकष्ट चतुर्थी आहे. अनेक गणेश उपासक मनोभावे बाप्पाची पूजा करतात आणि उपासना म्हणून संकष्टीचा उपास देखील करतात. संकटाचे निवारण करणारा, अशी बाप्पाची ओळख आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायावर आलेली गदा दूर व्हावी यासाठी संकष्टीपासून सलग महिनाभर पुढील उपासना करावी. त्यानंतरही उपासना सुरू ठेवली तरी काहीच हरकत नाही. मात्र, निदान महिनाभर हे व्रत आचरावे असे गणेश पुराणात सांगितले आहे.
आपल्या देशात आधीच सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न होता, त्यात कोव्हीड काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कोणी रंकाचा राव झाला तर कोणी रावाचा रंक! तरीदेखील प्रत्येकाचे जगण्याचे युद्ध सुरूच आहे. रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नाला अध्यात्मिक शक्तीचे पाठबळ मिळावे, म्हणून संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर 'ॐ गं गौ गणपतये विघ्नविनाशने स्वाः' या गणेश मंत्राचा जप सुरू करा.
>> रोज सायंकाळी दिवेलागण झाल्यावर शांतचित्ताने बाप्पासमोर बसून मन एकाग्र करा. सांयकाळची वेळ शक्य नसेल तर जी वेळ तुमच्या सोयीची आहे ती एक वेळ ठरवून सलग महिनाभर ती वेळ उपासनेसाठी राखीव ठेवा.
>> बाप्पाला गंध लावून आणि फुल वाहून जपाला सुरुवात करा. महिलांना मासिक धर्म किंवा अन्य अडचणी असल्यास त्यांनी मनोमन गणेशाची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून उपासना सुरू करावी.
>> हा मंत्र रोज १००८ वेळा म्हणणे अपेक्षित आहे. परंतु वेळे अभावी ते शक्य नसेल तर किमान १०८ वेळा हा मंत्र जरूर म्हणावा.
>> मंत्र पठण झाल्यावर देवाला आपला मनोदय सांगून आपली मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी.
>> मंत्र पठण केल्यामुळे किंवा जपाची माळ नित्यनेमाने ओढल्यामुळे प्रापंचिक त्रासातून काही क्षण मन स्थिर होते, विसावते. शांत मन चांगल्या कामासाठी प्रेरित करता येते. म्हणून मंत्रजप करावा असे सांगितले जाते.