Sankashti Chaturthi 2024: ॐकार साधनेने मन खरंच शांत होते का? लाभ वाचून चकित व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 07:00 AM2024-10-19T07:00:00+5:302024-10-19T07:00:02+5:30

Sankashti Chaturthi 2024: 20 ऑक्टोबर रोजी संकष्टी आहे, त्यानिमित्त ॐकार साधनेचे लाभ आणि ती अनुसरण्याचे विधी जाणून घ्या.

Sankashti Chaturthi 2024: Does Omkar sadhana really calm the mind? You will be surprised to read the benefits! | Sankashti Chaturthi 2024: ॐकार साधनेने मन खरंच शांत होते का? लाभ वाचून चकित व्हाल!

Sankashti Chaturthi 2024: ॐकार साधनेने मन खरंच शांत होते का? लाभ वाचून चकित व्हाल!

घरी सत्यनारायणाची पूजा असो, गणपतीचा अभिषेक असो नाहीतर कोणत्याही स्तोत्राचे सामुहिक पठण असो, सुरुवात 'हरि ॐ' नेच केली जाते. याचे कारण धार्मिक विधींच्या सुरुवातीला ॐ चे उच्चारण करणे, ही वैदिक परंपरा आहे. वेद पठणाच्या वेळी अशुद्ध उच्चारण होत असेल, तर ते पातक आहे. या दोषांचे निवारण व्हावे, या हेतूने सुरुवातीलाच देवाची क्षमा मागून हरि ॐ चे उच्चार करतात. २० ऑक्टोबर रोजी संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024)आहे. त्यानिमित्त याचे बहूविध लाभ जाणून घेऊया. 

एवढी कोणती ताकद आहे ॐकार च्या उच्चारणात?

सर्व वेद ज्या वेदाचा उद्घोष करतात, सर्व तपे ज्याचे चिंतन करतात, ते रूप, ध्यान म्हणजे ऊँ हे होय. ओम एक उद्गारवाचक वर्ण आहे. यालाच प्रणव असेही म्हणतात. यज्ञाप्रसंगी होकार दर्शवण्यासाठी सूचकदर्शक म्हणून शतपथ ब्राह्मणात याचा उल्लेख केला जातो. 

वेद, छंद, पुराणे, इतिहास, नृत्य, गीत यांची उत्पत्ती ॐकारातून झाली. अ-उ-म व अर्धमात्रा मिळून ओंकार साकार होतो. ओंकाराचे हे चार विभाग जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या या चार अवस्थांचे आणि विश्व, तेजस, प्राज्ञ व आत्मा अशा चार आत्मस्वरूपांचे निदर्शक मानलेले आहेत.

'अ'कार हा विष्णू, `उ'कार महेश, `म'कार हा ब्रह्मा असे तिन्ही देवांचे दर्शन आहे. अकार मात्रा विश्वाची व्याप्ती करून देते. उकार तेजाची व मकार ज्ञानाची प्रचीती घडवते. या तिन्ही  मात्रा मानवी शक्तीचे प्रतीक आहेत. इंद्रियांकडून होणारी कर्मे मनाकडून होणारी कर्मे व बौध्दिक कर्मे या तीनही कर्मांना ओंकार प्रभावी व तेजस्वी बनवते. अर्धी मात्रा `अ'कार, `उ'कार, व `म'कार यांच्या सहयोगाची सूचक आहे. 

हिंदू समाजजीवनातील सर्व वैदिक व लौकिक धर्मकृत्यांत मंत्राबरोबर ओंकाराचा उच्चार आवर्जून केला जातो. जैन व बौध्द धर्मियांनीदेखील ओंकाराचा स्वीकार केला आहे. `ॐ मणिपद्मे हुम' या अवलोकितेश्वराच्या मंत्राच्या आरंभी ओंकाराचे दर्शन घडते. बौद्ध दर्शनात शून्यापासून प्रणवाची उत्पत्ती व त्यापासून विश्वाची उत्पत्ती झाल्याचे उल्लेख आहेत.

शिवपुराणात ओंकाराला पंचमुखी शिवाचे प्रतीक मानले आहे. वैष्णव पुराणात प्रणवाला त्र्यक्षरात्मक प्रणव श्रीविष्णु व भक्त यांचे द्योतक मानले जाते. माणसाच्या जीवनाला आवश्यक अशी उब प्राणापासून मिळते विश्वाच्या क्रियेला उर्जा सूयापासून प्राप्त होते. सूर्य हा विश्वाचा प्राण आहे. अशा दृष्टीने अमृत्वाच्या सिद्धीची कामना करणाऱ्याने प्राण व सूर्य यांची उपासना ओंकार रूपात केली पाहिजे.

वेदांच्या आरंभी प्रणव होता. वेदांचे पर्यवसानही प्रणवातच होते. सर्व वाङमय म्हणजे प्रणव होय असे याज्ञवल्क्याने म्हटले आहे. ॐ हे अनुभूतिसूचक प्रतीक असून ॐकार परब्रह्माचे तेजस्वी प्रतीक आहे. ब्रह्मविद्येचा समग्र भावार्थ ॐकारात अविष्कृत झाला आहे. 

स्वामी विवेकानंद यांनी असे उद्बोधित केले आहे, की 'ॐकार म्हणजे ईश्वर होय. म्हणून त्याचा नित्य नेमाने जप करावा. त्याचे स्मरण, ध्यान करावे, त्याच्या अद्भुत स्वरूपाचे व अपूर्व अर्थाचे चिंतन करावे. सर्वदा ॐकाराचा जप करणे हीच खरी उपासना होय. ॐकार हा काही सर्वसाधारण शब्द नाही, तो स्वयं ईश्वरस्वरूप आहे.

ॐकार, वेडा आशावाद व दुर्बल निराशावाद यात संतुलन ठेवायला शिकवतो. ॐकार उच्चार व ध्वनीकंपनाने वायुशुद्धी व आरोग्य लाभते, असेही जाणकार सांगतात. शारीरिक व मानसिक सुधारणा व संतुलन साधले जाते. अशा ॐकार या एकाक्षरी महामंत्रात दिव्य शक्ती आहे. म्हणून आयुष्याची नवीन सुरुवात करतानाही आपण पुनश्च 'हरी ओम' असेच म्हणतो.

Web Title: Sankashti Chaturthi 2024: Does Omkar sadhana really calm the mind? You will be surprised to read the benefits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.