Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:44 AM2024-08-22T07:44:12+5:302024-08-22T07:48:25+5:30
Sankashti Chaturthi 2024: पुण्यसंचय व्हावा म्हणून श्रावणमासात दानधर्म सुचवला जातो; अशातच आज संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त चुकवू नका, राशीनुसार दान करा आणि कष्टमुक्त व्हा!
आज श्रावणातली संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024). आजच्या दिवशी संकष्टीचा उपास तर केला जातोच, शिवाय श्रावण मास सुरु असल्याने आजच्या दिवशी राशीनुसार पुढील वस्तूंचे दान केले असता अडलेली कामे मार्गी लागतात असे ज्योतिष तज्ज्ञांनी सुचवले आहे. सदर वस्तू या आपल्या घरातल्याच असल्याने त्यासाठी विशेष तयारीची आवश्यकता नाही. मात्र हे दान सत्पात्री अर्थात योग्य आणि गरजू व्यक्तीला करणे इष्ट ठरते.
श्रावणात (Shravan 2024) जशी शिवामूठ वाहिली जाते तसे संकष्टीलाही दानधर्म करा असे सांगितले आहे. शिवामूठ वाहताना आपण मूठभर धान्य शिवाला अर्पण करतो आणि तो आशुतोष प्रसन्न होतो. मात्र माणसाची भूक मोठी आणि कधीही न संपणारी असल्याने जेव्हा गरजू व्यक्तीला दान कराल तेव्हा ते त्याच्या संसाराला, जेवणाला पूरक असेल अशा बेताने करा, असेही सांगितले आहे. चला तर जाणून घेऊ, कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते दान केले असता, त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतात...
हे ही वाचा : Sankashti Chaturthi 2024: संकष्टीच्या मुहूर्तावर त्रिग्रही योगाचा शुभ संयोग; ५ राशींवर बापाच्या कृपेचा वर्षाव!
आजची श्रावणातली संकष्टी हेरंब संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हेरंब अर्थात अंबेचा-जगदंबेचा अंश आणि सांब सदाशिवाचा पुत्र, असा गणराज आपल्या अडचणी सोडवण्यास तत्परतेने पुढे येतो, म्हणून सुखकर्ता आणि दुःखहर्ता अशी त्याची ख्याती आहे. मात्र तो भक्तांची परीक्षा घेतो आणि त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भक्तावरच कृपावर्षाव करतो. त्याच्या कृपेस पात्र होण्यासाठी कोणी कोणत्या गोष्टींचे दान आज करायला हवे ते जाणून घेऊया.
>> मेष राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला गहू आणि गुळाचे दान करावे.
>> वृषभ राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तांदूळ आणि साखरेचे दान करावे.
>> मिथुन राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला मनी प्लांटचे रोप दान करावे.
>> कर्क राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे.
>> सिंह राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला गुलाबजल आणि मध दान करावे.
>> कन्या राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला लिंबू आणि बांबूचे रोप दान करावे.
>> तूळ राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे.
>> वृश्चिक राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला लाल रंगाचे वस्त्र दान करावे.
>> धनु राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला तुळशीचे रोप दान करावे.
>> मकर राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला शमीच्या रोपाचे दान करावे.
>> कुंभ राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला नीलकंठाचे अर्थात महादेवाचे चित्र दान करावे.
>> मीन राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला केळीचे रोप दान करावे.