Sankashti Chaturthi 2024: चतुर्मासातली शेवटची 'दाशरथी' संकष्टी; विधिवत गणेशपूजन करा, पुण्यफळ मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:40 PM2024-10-19T14:40:29+5:302024-10-19T14:41:06+5:30

Sankashti Chaturthi 2024: अश्विन मासातील संकष्टी दाशरथी करक चतुर्थी का म्हटली जाते? त्यानिमित्त गणेश उपासना कोणती व कशी करावी? सविस्तर जाणून घ्या!

Sankashti Chaturthi 2024: Last 'Dasarathi' Sankashti of Chaturmas; Do Ganesh Pooja properly and get the reward! | Sankashti Chaturthi 2024: चतुर्मासातली शेवटची 'दाशरथी' संकष्टी; विधिवत गणेशपूजन करा, पुण्यफळ मिळवा!

Sankashti Chaturthi 2024: चतुर्मासातली शेवटची 'दाशरथी' संकष्टी; विधिवत गणेशपूजन करा, पुण्यफळ मिळवा!

Ashwin Sankashti Chaturthi 2024: २० ऑक्टोबर रोजी चातुर्मासातील शेवटची संकष्टी (Sankashti Chaturthi 2o24)आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. चातुर्मास सुरू असून, अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी अनेकार्थाने विशेष मानली जाते. अश्विन संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, मान्यता, प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घेऊया... (Ashwin Sankashti Chaturthi 2024 Date And Time)

संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हनात अर्घ्य द्यावे. नंतर गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून उपास सोडावा. उपास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. हे एक काम्यव्रत आहे. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही ईच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. (Ashwin Sankashti Chaturthi 2024 Significance)

दाशरथी करक चतुर्थी

अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी दाशरथी चतुर्थी आणि करक चतुर्थी या नावानेही ओळखली जाते. दाशरथी चतुर्थीला दशरथ राजाचे स्मरण करून व्रत केले जाते. तर उत्तर भारतात या दिवशी करवा चौथ व्रत करण्याची परंपरा आहे. करवा चौथ व्रताला अतिशय महत्त्व असून, ते मोठ्या प्रमाणावर केले जाते. याच दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याचे त्याचे महत्त्वही वाढले आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय, चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले गेले आहे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. अश्विन महिन्याची संकष्ट चतुर्थी चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. यानंतर कार्तिक महिन्यातील एकादशीला चातुर्मासाची सांगता होत आहे. 

अश्विन संकष्ट चतुर्थी: रविवार २० ऑक्टोबर २०२४

अश्विन संकष्ट चतुर्थी प्रारंभ: रविवार, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.४६ मिनिटांनी. 

चंद्रोदयाची वेळ : रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी. 

‘असे’ करा गणेशपूजन, मिळेल व्रताचे पुण्यफल : 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. 

Web Title: Sankashti Chaturthi 2024: Last 'Dasarathi' Sankashti of Chaturmas; Do Ganesh Pooja properly and get the reward!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.