Sankashti Chaturthi 2024: ज्यांचे मन अशांत आहे त्यांनी संकष्टीपासून सुरु करा अथर्वशीर्ष उपासना; वाचा नियम!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 02:55 PM2024-04-26T14:55:24+5:302024-04-26T14:55:47+5:30
Sankashti Chaturthi 2024: अथर्वशीर्ष हे अतिशय प्राचीन आणि प्रभावी स्तोत्र आहे; हा उपासना मंत्र जपून त्यांचे फायदे अनुभवा; तत्पूर्वी जाणून घ्या नियम!
२७ एप्रिल रोजी मराठी नववर्षातील पहिली संकष्टी आहे, त्यानिमित्त बाप्पाच्या आवडत्या स्तोत्राचे पठाण, कधी, कसे करायचे ते जाणून घेऊ.
गणक ऋषींनी लिहिलेले गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र हा एक सिद्ध मंत्र आहे. या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केले आहे. अर्थात आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही, तर तो चराचरात, कणाकणात सामावला आहे. हे सांगताना गणक ऋषी म्हणतात तू ब्रह्म, तू विष्णू, तू रुद्र, तू इंद्र... एवढेच काय तर आमच्या मूलाधार चक्राशी तुझा नित्य वास असतो. असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सन्निध असतो. त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरुपाची प्रचिती देणारे आहे. ते रोज म्हटल्यामुळे होणारे लाभ जाणून घेऊ.
अथर्व या शब्दाचा अर्थ आहे, थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे जे चंचल नाही ते. शीर्ष म्हणजे डोकं. आपलं डोकं शांत असेल तर आणि तरच आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे अथर्वशीर्षाचा पहिला लाभ म्हणजे आपले चित्त शांत होते, ज्या डोक्यात विचारांचे वादळ सुरु असते ते वादळ या स्तोत्रपठणाने स्थिर होते. यासाठी ते स्तोत्र शांतचित्ताने म्हटले पाहिजे. उरकून टाकल्यासारखी घोकमपट्टी केली तर त्याचा उपयोग नाही. त्याचे उच्चार, अर्थ समजून उमजून म्हटले तर त्याचा प्रभाव पडेल आणि त्याचा लाभ जाणवेल.
हे स्तोत्र अथर्ववेदाशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. त्यात ''गं'' चा उच्चार वारंवार आढळतो. गं हा शब्द नसून हा महामंत्र आहे. त्यात ताकद एवढी आहे, की गणपती अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन केले असता इप्सित मनोकामना पूर्ती होते असे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे. यासाठी अनेक जण संकष्टीच्या निमित्ताने पुरोहितांकडून सहस्रावर्तन करवून घेतात. त्यासाठी काही नियम प्रकर्षाने पाळले पाहिजेत. ते पुढीलप्रमाणे-
- स्तोत्राचे उच्चार स्पष्ट हवेत.
- काम करता करता म्हणण्याचे हे स्तोत्र नाही. देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे.
- पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे.
- स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत.
- स्तोत्राचे पावित्र्य जपण्यासाठी शुचिर्भूतता पाळावी.
- गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी.
- स्तोत्र पाठ नसेल तर स्तोत्र श्रवण करा, डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवा. जेणेकरून मन भटकणार नाही आणि पठणाचा उद्देश पूर्ण होईल.
- स्तोत्राची आवर्तने करताना फलश्रुती सर्वात शेवटी एकदाच म्हणावी.
- सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर ३,७,९,११, २१ वेळा आवर्तने करावीत. मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणा, तरच लाभ होईल.