Chaitra Sankashti Chaturthi April 2023: ९ एप्रिलला चैत्र संकष्ट चतुर्थी: ‘या’ शुभ योगात करा बाप्पाची पूजा; चिंतामणी चिंतामुक्त करेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 06:04 AM2023-04-06T06:04:23+5:302023-04-06T06:04:23+5:30
Chaitra Sankashti Chaturthi April 2023: मराठी नववर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि श्रीगणेश पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या...
Chaitra Sankashti Chaturthi April 2023: चैत्र महिन्याच्या वद्य पक्षात चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंतीनंतर संकष्ट चतुर्थी येत आहे. मराठी नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी असून, ही चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. श्रीगणेशाच्या अनेकविध व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचा क्रम वरचा आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत अतिशय शुभ फलदायी मानले गेले आहे. यंदा चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी ०९ एप्रिल २०२३ रोजी येत असून, शुभ योगात आणि शुभ मुहुर्तावर बाप्पाची पूजा केल्यास अनेक प्रतिकूल प्रभावापासून बचाव होण्यास मदत होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो. कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय असतात. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर एकवेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा.
चैत्र संकष्ट चतुर्थी: रविवार, ०९ एप्रिल २०२३
चैत्र वद्य चतुर्थी प्रारंभ: रविवार, ०९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०९ वाजून ३५ मिनिटे.
चैत्र वद्य चतुर्थी समाप्ती: सोमवार, १० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०८ वाजून ३७ मिनिटे.
बाप्पाच्या पूजनाची शुभ वेळ: ०९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०९ वाजून ३५ मिनिटांपासून ते १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत.
अमृत योगातील पूजनाची वेळ: ०९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन रविवार, ०९ एप्रिल २०२३ रोजी करावे, असे सांगितले जाते.
संकष्ट चतुर्थीला श्रीगणेश पूजनाचे महत्त्व
संकष्टी चतुर्थीला उपवास करून श्रीगणेश पूजन केले जाते. यामुळे भक्तांची सर्व दुःख दूर होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. या व्रताचे पालन केल्याने अडचणींपासून मुक्ती मिळू शकते. रखडलेली कार्ये पूर्ण होऊ शकतात. या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने श्रीगणेशाचे शुभाशिर्वाद तसेच पूजेचे पुण्य फळ मिळू शकते. शनीची साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू असलेल्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रत अवश्य ठेवावे, असे सांगितले जाते.
गणपती बाप्पाच्या पूजनाची सोपी पद्धत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"