सन २०२१ मधील पहिली संकष्ट चतुर्थी : 'असे' करा व्रतपूजन; चंद्रोदय वेळ जाणून घ्या
By देवेश फडके | Published: January 2, 2021 02:28 PM2021-01-02T14:28:07+5:302021-01-02T14:35:25+5:30
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संकष्ट चतुर्थी येणे उत्तम योग मानला जात आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रतपूजन, विविध राज्यांतील चंद्रोदय वेळ जाणून घेऊया...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संकष्ट चतुर्थी येणे हा अद्भूत योग जुळून असून, गणपती उपासकांसाठी ही एक पर्वणी मानली जात आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि व्रत-वैकल्यांमध्ये गणपती पूजन, आराधना, उपासना, नामस्मरण यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपती बाप्पाच्या उपासनेत संकष्ट चतुर्थी व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते, अशी मान्यता आहे. सन २०२१ मधील पहिल्या संकष्ट चतुर्थीचे व्रतपूजन, विविध शहरांतील चंद्रोदय वेळ जाणून घेऊया...
संकष्ट चतुर्थी : शनिवार, ०२ जानेवारी २०२१
मार्गशीर्ष वद्य चतुर्थी प्रारंभ : शनिवार, ०२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०९ वाजून १० मिनिटे.
मार्गशीर्ष वद्य चतुर्थी समाप्ती : रविवार, ०३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०८ वाजून २२ मिनिटे.
संकष्ट चतुर्थीचे व्रत आणि पूजनविधी
प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. शूचिर्भूत होऊन एका चौरंगावर गणपतीची स्थापना करावी. यानंतर गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखावावा. दिवसभर उपास केल्यानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे. चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्त्वाचा भाग आहे.
मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. तसेच मार्गशीर्ष महिना लक्ष्मी देवीचा महिना म्हणूनही ओळखला जातो. 'मासांना मार्गशीर्षोऽहम्' या वचनाने भगवद्गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे. यामुळे मार्गशीर्ष मासाच्या वद्य पक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीलाही वेगळे महत्त्व प्राप्त होते. गणपती पूजनासह लक्ष्मी देवीचे नामस्मरण करणे शुभ आणि लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जाते.
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे |
ठाणे | रात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे |
पुणे | रात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून १० मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून ०१ मिनिट |
वर्धा | रात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून १६ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०८ वाजून ५२ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे |
औरंगाबाद | रात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजता |
परभणी | रात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे |
उस्मानाबाद | रात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून १७ मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे |