Sankashti Chturthi 2023: संकष्टीनिमित्त 'अशी' करा उपासना; पितरांबरोबर बाप्पाचाही मिळेल आशीर्वाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 05:16 PM2023-10-02T17:16:36+5:302023-10-02T17:17:08+5:30
Pitru Paksha 2023: सध्या पितृपक्ष सुरू आहे, श्राद्धविधी करून पितरांची सेवा तर आपण करणार आहोतच, त्याला जोड देऊया बाप्पाच्या उपासनेची!
आज संकष्ट चतुर्थी आहे आणि पितृपक्षही सुरू आहे. पितरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण तिथीनुसार श्राद्धविधी करून त्यांचे कृपाशिर्वाद मिळवतो, तसेच संकष्टी निमित्त बाप्पाची उपासना दिलेल्या पद्धतीनुसार केली असता त्याचाही आशीर्वाद मिळेल.
अनेक गणेश उपासक मनोभावे बाप्पाची पूजा करतात आणि उपासना म्हणून संकष्टीचा उपास देखील करतात. संकटाचे निवारण करणारा, अशी बाप्पाची ओळख आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायावर आलेली गदा दूर व्हावी यासाठी संकष्टीपासून सलग महिनाभर पुढील उपासना करावी. त्यानंतरही उपासना सुरू ठेवली तरी काहीच हरकत नाही. मात्र, निदान महिनाभर हे व्रत आचरावे असे गणेश पुराणात सांगितले आहे.
आपल्या देशात आधीच सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न होता, त्यात कोव्हीड काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. कोणी रंकाचा राव झाला तर कोणी रावाचा रंक! तरीदेखील प्रत्येकाचे जगण्याचे युद्ध सुरूच आहे. रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नाला अध्यात्मिक शक्तीचे पाठबळ मिळावे, म्हणून संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर 'ॐ गं गौ गणपतये विघ्नविनाशने स्वाः' या गणेश मंत्राचा जप सुरू करा.
>> रोज सायंकाळी दिवेलागण झाल्यावर शांतचित्ताने बाप्पासमोर बसून मन एकाग्र करा. सांयकाळची वेळ शक्य नसेल तर जी वेळ तुमच्या सोयीची आहे ती एक वेळ ठरवून सलग महिनाभर ती वेळ उपासनेसाठी राखीव ठेवा.
>> बाप्पाला गंध लावून आणि फुल वाहून जपाला सुरुवात करा. महिलांना मासिक धर्म किंवा अन्य अडचणी असल्यास त्यांनी मनोमन गणेशाची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून उपासना सुरू करावी.
>> हा मंत्र रोज १००८ वेळा म्हणणे अपेक्षित आहे. परंतु वेळे अभावी ते शक्य नसेल तर किमान १०८ वेळा हा मंत्र जरूर म्हणावा.
>> मंत्र पठण झाल्यावर देवाला आपला मनोदय सांगून आपली मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी.
>> मंत्र पठण केल्यामुळे किंवा जपाची माळ नित्यनेमाने ओढल्यामुळे प्रापंचिक त्रासातून काही क्षण मन स्थिर होते, विसावते. शांत मन चांगल्या कामासाठी प्रेरित करता येते. म्हणून मंत्रजप करावा असे सांगितले जाते.