ज्ञानाचा एका व नामाचा तुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 07:35 PM2021-07-01T19:35:10+5:302021-07-01T19:36:13+5:30
एकनाथांचा जन्म देशस्थी ऋग्वेदी कुटुंबात झाला दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण क्षेत्री झाला.
ज्ञानदेवांच्या संदर्भात एकनाथांचे महत्व अनन्यसाधारण आहे. 'ज्ञानाचा एका व नाम्याचा तुका' ही उक्ती प्रसिद्ध आहे. संत ज्ञानदेवांचा काळ इ. स. १२७५ ते इ. स. १२९६ तर एकनाथांचा काळ इ. स. १५३३ ते इ. स. १५९९. वास्तविक दोघांच्या कालात जवळ जवळ २५० वर्षांचा फरक आहे.
एकनाथांचा जन्म देशस्थी ऋग्वेदी कुटुंबात झाला दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पैठण क्षेत्री झाला. पैठणला दक्षिण काशी म्हणण्याचे कारण म्हणजे चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचा अभ्यास पैठण सोडून दक्षिणेत दुसरीकडे कोठे होत नव्हता. ह्यशुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटीह्ण हे जे तुकाराम महाराज म्हणतात ते यथार्थ आहे. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. भानुदासांची बरीच अभंगरचना उपलब्ध आहे. यांचे महत्वाचे कार्य म्हणजे कृष्णदेवरायाने नेलेली पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती पुन्हा पंढरपूरला आणून स्थापित करणे. तुंगभद्रेच्या काठी विजयनगर ऊर्फ अनागोंदी येथे कृष्णदेवराय राजा राज्य करत होता. विजयनगरच्या इतिहासात पराक्रमी, करारी, तेजस्वी, विद्यावंत व धर्मनिष्ठ असा दुसरा राजा झाला नाही. शके १४३० (इ. स. १५०८) ते शके १४५२ (इ. स. १५३०) हा याचा काळ.
हा राजा पंढरीस गेला असता तेथील वारकर्यांचा कीर्तन सोहळा, त्यांचे विठ्ठलावरील प्रेम पाहून भारावून गेला. ती विठ्ठलमूर्ती आपल्या राजधानीस नेण्याचे त्याने ठरवले. त्याप्रमाणे तो ती मूर्ती घेऊन गेला. तेथे त्याने देवाला सर्व भोग अर्पण केले. पण देवाला मात्र कडेकोट बंदोबस्तात ठेवले. इकडे पंढरपुरात देवळात देव नाही म्हणून सर्व वारकरी उदास झाले. आणि तिकडे भक्त नाहीत म्हणून पांडुरंगही उदास झाला. असंख्य भक्त नाराज झालेले पाहून भानुदासांनी त्यांना सांगितले की मी विठ्ठलास परत घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही येथेच नामघोष करत रहा.
भानुदास विजयनगरला गेले. देवाच्या शोधार्थ राजवाड्याजवळ गेले. तेव्हा तेथील कुलपे आपोआप गळून पडली व क्षणार्धात भानुदास विठ्ठलासमोर उभे राहिले. प्रेमाश्रूंनी त्यांनी विठ्ठलाच्या पायावर अभिषेक केला. देवाला म्हणाले
भक्त भागवत सकळ पारुषले ।
नि:शब्द ते ठेले तुजवीण ॥१॥
रखुमाई आई जालीसे उदास ।
कैसे पुंडलिकास मौन पडले ॥२॥
भानुदास म्हणे चाल आम्हांसवे ।
वाचाऋण देवें आठवावें ॥३॥
भानुदासांनी कळवळ्याने केलेली विनंती ऐकून देवालाही प्रेमाचा पाझर फुटला. देवाच्या गळ्यातला नवरत्नहार भानुदासांच्या हातात आला. हा महाप्रसाद मानून भानुदास राजवाड्याबाहेर पडले. सकाळी पुजार्यास देवाच्या गळ्यातील नवरत्नहार दिसला नाही. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. तेव्हा तुंगभद्रेच्या तीरी नि:शंकपणे गात नाचत असलेले भानुदास शिपायांच्या दृष्टीस पडले त्यांचाकडे नवरत्नहारही सापडला. तेव्हा क्रुद्ध झालेल्या राजाने शिपायांना त्यांना सुळावर चढवण्याची आज्ञा केली.
सुळापाशी नेताच भानुदास म्हणाले
भलतैसे पडो जडभारी । परी नाम न सांडी निर्धारी ।
पतिव्रता जेंवि प्राणेश्वरी । भानुदास म्हणे निर्धारी गा विठोबा ॥
भनुदासांची एकनिष्ठ भक्ती पाहून देवालाही पाझर फुटला. त्या सुळाचे तात्काळ एका वृक्षात रूपांतर झाले. भानुदास चोर नसून एक भगवद्भक्त आहे हे राजाला कळून आले. त्याने भनुदासांना विठ्ठलमूर्ती पंढरीस नेण्याची परवानगी दिली. भानुदास कार्तिकी एकादशीला विठ्ठलमूर्ती पंढरपुरास घेऊन आले. तेव्हा भक्तांनी देवाची रथातून मिरवणूक काढली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ आजही पंढरपूरला कार्तिकी एकादशीला देवाची रथातून मिरवणूक काढली जाते.
अशा या थोर वैष्णवाच्या कुळात एकनाथांचा जन्म झाला होता. त्यामुळेच आपल्याला हरिभक्तीचा छंद लागला असे एकनाथ अभिमानाने सांगतात. एकनाथ महाराजांच्या जन्मवेळी मूळनक्षत्र होते. त्यामुळे नाथांचा जन्म झाल्यावर काही कालावधीतच त्यांच्या आई वडिलांचा मृत्यु झाला. तेव्हा नातवाच्या सांगोपनाची जबाबदारी त्यांच्या आजोबांवर आली. नाथांची बुद्धी तीव्र होती. उपनयन संस्कार झाल्यावर त्यांचे वेदाधयन सुरू झाले. सर्व लौकिक विद्याभ्यास संपादन करून झाला. पण तेवढ्याने त्यांचे समाधान होईना. एक दिवस शिवालयात एकटेच हरिगुण गात उदास बसले असता आकाशवाणी झाली की ह्यदेवगडावर जनार्दन स्वामींकडे जा.ह्ण
आकाशवाणी ऐकताच ते तडक देवगडास जाण्यास निघाले ते तिसरे दिवशी तेथे येऊन पोचले व गुरुचरणी आपला देह अर्पण केला. सहा वर्षे त्यांनी गुरूंची सेवा केली.
अविरत गुरुसेवा व साधना ह्यामुळे त्यांना प्रत्यक्ष दत्तांनी दर्शन दिले व ह्यहा भागवतावर अपूर्व ग्रंथ लिहीलह्ण असे दत्तांनी भाकित सांगितले. नंतरही नाथांची देवगिरीवर तपश्चर्या चालू होती. साधनापर्व पूर्ण झाल्यावर जनार्दन स्वामींनी त्यांना चतुश्लोकी भागवतावर टीका लिहिण्यास सांगितले.
चार श्लोकांमधे आदिनारायणांनी ब्रह्मदेवाला अध्यात्मरहस्य सांगितले आहे. ब्रह्मदेवाने नारदांना, नारदांनी व्यासांना, व व्यासांनी बारा स्कंधात त्याचा विस्तार करून शुकाला सांगितले. व तेच रहस्य शुकाने परीक्षितीला सांगितले. भागवत ग्रंथाचे बीज ह्या चतुश्लोकीत आहे. भागवताचे सार असे चार श्लोक भागवताच्या दुसर्या सर्गातील ९ व्या अध्यायात आलेले आहेत. त्या श्लोकांना चतुश्लोकी भागवत असे म्हणतात. परंतु त्या सर्व अध्यायावर नाथांनी आपले गुरु श्रीजनार्दन ह्यांच्या आज्ञेने १०३६ ओव्यांचा ग्रंथ लिहिला. तेच नाथांचे चतुश्लोकी भागवत.
नाथांनी लहान वयात लिहिलेला हा प्रथम ग्रंथ. १००० च्या आसपास याची ओवीसंख्या आहे. नाथांनीही पुष्कळ ग्रंथरचना केली आहे. एकनाथी भागवत ही भागवताच्या अकराव्या स्कंधावरील टीका, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, हस्तामलक, शुकाष्टक, स्वात्मसुख, आनंद लहरी, चिरंजीवपद, गीतासार, त्याशिवाय पाच हजारांवर अभंग आहेत. ओवीसंख्या सुमारे ७५००० च्या आसपास होते.
नाथांचे महत्वाचे कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करणे. एके दिवशी त्यांचा घसा दुखू लागला. त्यावर औषधोपचार झाले. पण गुण येईना. तिसर्या दिवशी ज्ञानदेव त्यांच्या स्वप्नात आले. त्यांना म्हणाले, ह्यमाझ्या मानेस अजानवृक्षाच्या मुळीचा गळफास बसला आहे. तो तू स्वत: येथे येऊन काढ. म्हणजे तुझा घसा बरा होईल. म्हणून समुदाय बरोबर घेऊन कीर्तन करीत नाथ शके १५०५ मधे नाथ आळंदीस आले. याविषयी नाथांच अभंग प्रसिद्ध आहे.
श्रीज्ञानदेवें येऊनी स्वप्नात ।
सांगितली मात मजलागी ॥१॥
दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा ।
परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥
अजानवृक्षाची मुळी कंठास लागली ।
येऊनी आळंदी काढी वेगे ॥३॥
ऐसें स्वप्न होता आलो अलंकापुरी ।
तंव नदी माझारी देखिले द्वार ॥४॥
एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले ।
श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥
स्वप्नातील दृष्टांतानुसार नाथ आळंदीस आले. आळंदीस सिद्धेश्वराचे स्थान प्राचीन होते. ते स्थान गर्द झाडीने वेढलेले होते. बरोबरच्या मंडळींना बाहेर बसवून नाथ समाधिस्थानाच्या शोधार्थ निघाले. दूरूनच त्यांना अजानवृक्ष दिसला. समाधीचे दार उघडून ते आत शिरले. तेथे त्यांना वज्रासन घालून बसलेले ज्ञानराज दिसले. त्यांचे दर्शन होताच एकनाथांनी त्यांच्या पायी दंडवत घातले. तीन अहोरात्र त्यांना ज्ञानराजांचा सहवास लाभला असे केशवांनी नाथचरित्रात लिहीले आहे. अजानवृक्षाची मुळी मस्तकाला लागल्याचे निमित्त करून ज्ञानदेवांनी नाथांना प्रत्यक्ष दर्शन दिले व ज्ञानेश्वरीचा लोकात प्रसार करण्यची आज्ञा केली. नाथ समाधीच्या बाहेर आल्यावर लोकांनी पूर्ववत समाधीस्थानावर दगड रचून टाकले.
पैठणला परतल्यावर नाथांनी ज्ञानेश्वरीच्या संशोधनाचे कार्य हाती घेतले. लोकांच्या व पाठकांच्या चुकीमुळे काही अशुद्ध व अबद्ध पाठ त्यात घुसडले गेलेले होते. ते त्यांनी काढून टाकले व ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत वाचकांच्या हाती दिली. नाथांना ज्ञानदेवांचे दर्शन शके १५०५ मधे ज्येष्ठात झाले व ज्ञानेश्वरी संशोधनाचे काम शके १५०६ मधे तारण नाम संवत्सरी संपले. ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्यांनी हा ज्ञानेश्वरी शु्द्धिकरणाचा काळ नोंदवला आहे. तो ग्रंथ मूळचा अतिशय शुद्ध असून लोकांच्या पाठभेदामुळे अशुद्ध झाला होता तो संशोधित करून आपण ही प्रत तयार केली आहे असे त्यांनी सांगितले आहे.
आज आपण वाचतो ती एकनाथांनी तयार केलेली ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत. भाद्रपद वद्य षष्ठीला हे काम पूर्ण झाले. म्हणून तो दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून मानण्यात येतो.
ज्ञानदेवांच्या वाङ्मयाची छाप त्यांच्या लिखाणावर दिसून यते. ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान, माया, चिद्विलासवाद, गुरुभक्ती,
काही ओव्यांमधेही साम्य दिसून येते. ज्ञानेश्वरीशी साम्य दाखवणार्या अशा काही ओव्या पाहिल्यावर त्याची खात्री पटते.
हृदया हृदय एक जाले । ये हृदयीचे ते हृदयी घातले ।
यापरी न बोलता बोलें । पूर्णत्व दिधले प्रजापतीसी ॥७१४॥
जेवीं दीपे दीप लावला । तेथे न कळे वडील धाकुला ।
तेवी चिद्रुपें समत्वा आला । हरिरूप जाला प्रजापती ॥७२३॥
परिस लोहाचे करी सुवर्ण । परी लोहाचा परिस नव्हे जाण ।
श्रीजनार्दनाचे चरण मी पाषांडचि पूर्ण । तो मज परिस केला ॥७३९॥
जे जे श्रेष्ठ आचरती । ते ते कर्म इतर करिती ।
यालागी यमनियम प्रजापती । आचरे अनहंकृती लोकसंग्रहार्थ ॥७७९॥
चतुश्लोकी भागवताप्रमाणे एकनाथी भागवतातूनही आपल्याला अशी साम्यस्थळे दिसून येतात. त्यामुळेच ह्यज्ञानाचा एकाह्ण अशी उक्ती रूढ झाली आहे.
-जगदीश रायणे
खामगाव.