जयंती विशेष: ज्ञानेश्वरीचा अमृतानुभव देत विश्वकल्याणाचे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर माऊली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 07:19 AM2024-08-26T07:19:25+5:302024-08-26T07:19:25+5:30

Sant Dnyaneshwar Mauli Jayanti 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा जन्मोत्सव साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन व कार्य याचा अगदी थोडक्यात घेतलेला आढावा जाणून घ्या...

sant dnyaneshwar birth anniversary 2024 know dnyaneshwari life and work information in marathi on sant dnyaneshwar mauli jayanti 2024 | जयंती विशेष: ज्ञानेश्वरीचा अमृतानुभव देत विश्वकल्याणाचे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर माऊली

जयंती विशेष: ज्ञानेश्वरीचा अमृतानुभव देत विश्वकल्याणाचे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर माऊली

Sant Dnyaneshwar Mauli Jayanti 2024: मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचे दैवत, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची आज जयंती. श्रीकृष्ण जन्माष्टमीला संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा २०२४ मध्ये २६ ऑगस्ट रोजी माऊलींचा जन्मोत्सव साजरा होत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन व कार्य अगदी अफाट आहे. जीवनाच्या अवघ्या २० वर्षांमध्ये ज्ञानेश्वरांनी केलेले कार्य व्यापक आहे. माऊलींनी केवळ १६ व्या वर्षी भगवद्गीतेवरील भाष्यग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त व्यापक, विस्तृत कार्याचा घेतलेला संक्षिप्त स्वरुपातील आढावा...

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।, संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत, असे कधी होत नाही. श्रावण वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या आपेगाव या छोट्या गावी झाला. संत ज्ञानेश्वरांच्या जन्मवर्षाबाबत मात्र एकवाक्यता दिसून येत नाही. काही अभ्यासकांच्या मते संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला. तर, काहींच्या मते संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इ.स. १२७१ मध्ये झाला, असे सांगितले जाते. विशेष योगायोग म्हणजे श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोघांचाही जन्म श्रावण वद्य अष्टमीला झाला आहे. 

संघर्षातून सिद्धीकडे नेणारे बालपण

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे. ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे. आदिनाथ-मत्स्येंद्रनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्तिनाथ-ज्ञानेश्वर. आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बापविठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव अशी नावेही वापरल्याचे आढळून येते, असे म्हटले जाते. 

विश्वकल्याणासाठी ज्ञानेश्वरी अन् अनुभवामृत

पुढे संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत रचना केल्या. निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. याच ग्रंथाला 'ज्ञानेश्वरी' किंवा 'भावार्थदीपिका' असे म्हटले जाते. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. ज्ञानेश्वरांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ म्हणजे 'अनुभवामृत' किंवा 'अमृतानुभव' होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. या ग्रंथात दहा प्रकरणांमध्ये विभागलेल्या सुमारे ८०० ओव्या आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.

हरिनामाचे महत्त्व सांगणारा हरिपाठ अन् चांगदेव पासष्टी

संत ज्ञानेश्वरांनी काही अभंग, विराण्या आदी स्फुटकाव्येही रचली आहेत. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा नामपाठ आहे. हरिपाठात २८ अभंग आहेत. हरिपाठात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले, असे मानले जाते. मात्र, त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. 

अखिल विश्वाची जणू काळजी माऊली

संत नामदेव महाराजांच्या 'तीर्थावली'त संत ज्ञानेश्वरांच्या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. यानंतर ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या 'समाधीच्या अभंगां'मध्ये याचे काही संदर्भ सापडतात. अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून ज्ञानेश्वरांनी धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाड्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८ रोजी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. आषाढ महिन्यात आळंदीहून दरवर्षी पंढरपूरकडे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होते. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही प्रथा आहे. मंदिराचा कळस हलल्याशिवाय माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत नाही, असे सांगितले जाते. 
 

Web Title: sant dnyaneshwar birth anniversary 2024 know dnyaneshwari life and work information in marathi on sant dnyaneshwar mauli jayanti 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.